मडगाव, गोव्यातील टॅक्सींचे स्पीड गव्हर्नर बदलण्याच्या नावाखाली वाहतूक विभागाकडून टॅक्सीवाल्यांची सतावणूक केली जाते, असा आरोप करून शुक्रवारी बाणावली टॅक्सी असोसिएशनच्या सदस्यांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याकडे त्यांच्या तक्रारी मांडल्या.
टॅक्सी चालकांवर त्यांच्या टॅक्सीचा स्पीड गव्हर्नर बदलण्यासाठी दबाव टाकला जातो. यासाठी टॅक्सीवाल्यांना सहा हजार रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड बसत असल्याचा दावा त्यांनी केला.
गोव्यातील हमरस्त्यावर पुरेसी शौचालये नसल्याने कित्येकवेळा प्रवाशांना वाटेत उघड्यावर आपले नैसर्गिक विधी करावे लागतात. मात्र, अशा प्रवाशांना दंड आकारला जातो. त्यामुळे गोव्यात येणारे पर्यटक नाराज होतात.
यावर उपाय म्हणून सरकारने हमरस्त्यावर जागोजागी सार्वजनिक शौचालये उभारावीत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
टॅक्सी चालक आणि त्यांच्या ग्राहकांच्या होत असलेल्या दुरवस्थेची दखल घेत विजय सरदेसाई यांनी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्याची तयारी दाखविली आहे.
रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने स्पीड गव्हर्नरवर भर न देता त्याऐवजी पणजी शहरात कार्यरत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणारे स्पीड कॅमेरे राज्यभर बसवावेत. शिवाय लोकांच्या मुलभूत सुविधांची गरज लक्षात घेऊन सरकारने महामार्गांलगत सार्वजनिक शौचालये बसवावीत, ज्यामुळे प्रवाशांना सन्मान, आराम मिळेल आणि टॅक्सी चालकांसमोरील आव्हाने कमी होतील.
- विजय सरदेसाई, आमदार
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.