फोंडा: येत्या काळात पाण्याला सोने आणि हिरे-मोत्यांचे मोल येणार असून, भारतात पर्यायाने गोव्यात पडणारा मुबलक पावसाचा पाणीसाठा आपण जपून ठेवला, तर हेच पाणी इतरांना विकणे शक्य आहे. विशेषतः अरब राष्ट्रात ज्याप्रमाणे इंधन विकले जाते, जेथे पाण्याचा तुटवडा आहे, तेथे भविष्यात पाणी घ्या, इंधन द्या, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे उद्गार कृषिमंत्री रवी नाईक यांनी काढले.
कोडार-बेतोडा, फोंडा येथील कृषी खात्याच्या प्रशासकीय वास्तूचे उद्घाटन आज (मंगळवारी) नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिरोड्याचे आमदार तथा जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, फोंडा नगराध्यक्ष रितेश नाईक, नगरसेवक आनंद नाईक, बेतोडा-कोडार पंचायतीचे सरपंच सुशांत गावकर, पंचसदस्य विशांत गावकर तसेच कृषी खात्याचे संचालक नेव्हिल आफोन्सो, माजी संचालक सतीश तेंडुलकर आदी उपस्थित होते.
रवी नाईक म्हणाले, गोव्यात दरवर्षी किमान सव्वाशे इंच पाऊस कोसळतो, त्यामुळे पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कृषी खात्याच्या लागवडीसाठी पाण्याची आज गरज असून जलस्त्रोत खात्याने हे पुरेसे पाणी उपलब्ध करावे, असे सांगताना अमेरिकासारख्या राष्ट्राने पाण्याच्या दुर्भिक्ष्यासंबंधी जागृती केली आहे. पाणी हे सोन्यापेक्षाही महाग होण्याची शक्यता व्यक्त केल्याने आपल्या देशाकडून पाण्याची निर्यात शक्य आहे, असे रवी नाईक म्हणाले.
जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, कृषी खात्याने विविध तऱ्हेच्या रोपट्यांची लागवड करून ती जर लोकांना विकली तर त्यातून हरित क्रांती येणे शक्य अाहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले तर देशाचे भवितव्य उज्ज्वल होऊ शकते.
यावेळी नेव्हिल आफोन्सो, सरपंच सुशांत गावकर, पंचसदस्य विशांत गावकर यांनी विचार मांडले. पांडुरंग देसाई यांनी सूत्रसंचालन केले; तर राजेश डिकॉस्ता यांनी आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.