Panaji Bhatale Murder Case
पणजी: भाटले - पणजी येथील राम मंदिराजवळ एका गेस्ट हाऊसच्या बाजूला नव्याने बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत जॉन नामक याचा गळा चिरून खून करणारा त्याचाच मित्र संशयित अरविंद तिवारी याला मध्यरात्री दोन तासातच योग सेतू येथून पणजी पोलिसांनी अटक केली.
खून करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकू संशयिताने वाटेत टाकला त्याचा शोध घेण्यात येत आहे. त्याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. दारूच्या नशेत दोघांमध्ये जेवणावरून झालेल्या भांडणाचे पर्यवसान खुनात झाल्याचे चौकशीत समोर आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक विजय चोडणकर यांनी दिली.
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर रात्री ८.३० च्या दरम्यान ४८ वर्षीय जॉन व अरविंद तिवारी हे दोघेही मद्यप्राशन केलेले होते व ते जेवण करत होते. या जेवणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली व अरविंद तिवारी याने स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या चाकूने जॉन याच्या गळ्यावर वार केला व त्यानंतर त्याच्या छातीवर व पोटावर चाकूने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात जॉन बेशुद्ध पडल्याने तिवारीने तेथून पळ काढला. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर इतर कामगार काम करत होते. त्या ठिकाणी अंधार असल्याने कोणाचे तेथे लक्ष गेले नाही. एका कामगाराने जॉन याला रक्ताच्या थारोळ्यात पाहिल्यावर या घटनेची माहिती कंत्राटदाराला तसेच पणजी नियंत्रण कक्षाला देण्यात आली. घटनेचा पंचनामा करून पणजी पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला.
जॉन याचा मृतदेह गोमेकॉ इस्पितळातील शवागारात पाठवण्यात आल्यानंतर घटनास्थळावरून गायब असलेल्या संशयित अरविंद तिवारी याचा शोध घेण्यासाठी तीन वेगवेगळी पथके स्थापन केली. पणजी बसस्थानक, मार्केट तसेच मिरामार व कांपाल येथे पोलिसांनी शोध सुरू केला. आयनॉक्स समोरील योग सेतूच्या ठिकाणी कठड्यावर एक तरुण झोपलेला दिसला. पोलिसांनी त्याला हटकले असता तो भेदरलेल्या स्थितीत होता. त्याची चौकशी सुरू करताच तो काहीही सांगण्याच्या स्थितीत नव्हता. त्यामुळे त्याला पोलिस स्थानकात आणून चौकशीस सुरुवात करताच त्याने भाटले येथे खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. जॉन याने शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले.
शव चिकित्सा अहवालात जॉन याचा मृत्यू तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून झाल्याचे नमूद केले आहे. जप्त करण्यात आलेल्या चाकूवरील रक्ताचे डाग याचेही नमुने घेण्यात आले आहेत. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विजय चोडणकर हे करत आहेत. घटनास्थळावरून पळताना तिवारी याला पाहिलेल्या काही साक्षीदारांच्या जबान्या नोंदवण्यात येत आहेत.
जॉन हा गेल्या दहा वर्षापासून गोव्यातच असून तो सायकलने रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या जमा करण्याचे काम करत होता. भाटले येथे नजीर मुल्ला याच्याशी त्याची ओळख झाली होती. त्यामुळे तो अधूनमधून तेथे येत असे व कंत्राटदाराला कामात मदत करत होता. यावेळी तेथे काम करणाऱ्या अरविंद तिवारी याच्याशी त्याची मैत्री झाली होती. हे दोघेही या इमारतीच्या तळमजल्यावरच राहायचे व एकत्र जेवण करायचे. त्यांच्यात यापूर्वी अधूनमधून दारूच्या नशेत वाद व भांडणे सुरू होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.