साखळी: न्यायालयीन लढ्यानंतर मिळालेली, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तांत्रिक अडचणींमुळे सरकारदरबारी रखडलेली सुर्ल येथील शेतकऱ्यांची नुकसानभरपाई अखेर त्यांच्या हाती पडली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे ७० शेतकऱ्यांना तब्बल २ कोटी ९० लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली. गणेश चतुर्थीपूर्वी धनादेश मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
सुर्ल येथील श्री सिद्धेश्वर मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे धनादेश वितरित करण्यात आले. गेल्या १९ ते २२ वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांना मुख्यमंत्री सावंत यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रशासनाने आवश्यक कागदोपत्री सोपस्कार आणि पाठपुरावा केला.
नुकसानभरपाई मिळविण्यासाठी सुर्ल येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात विशेष सुविधा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रक्रिया पूर्ण केलेल्या सुमारे ७० शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांनीही संबंधित कागदपत्रे सादर करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी आणि नुकसानभरपाईचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले. शेतकऱ्यांनी विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता संबंधित कागदपत्रे सादर करावीत.
आपापसांतील तंटे मिटवून आवश्यक सोपस्कार पूर्ण केल्यास उर्वरित नुकसानभरपाईही लवकर मिळवून देता येईल, असे सावंत यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमास डिचोली उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, ॲड. जोशी, सरपंच सुचीता गावकर, उपसरपंच सुभाष फोंडेकर, भाजप महिला प्रभारी सुलक्षणा सावंत, पंचसदस्या विश्रांती सुर्लकर, भोला खोडगीणकर, साहिमा गावडे, शाणू सुर्लकर, ग्रामकृती समिती सदस्य नारायण सोननाईक, प्रकाश फोंडेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मंगलदास उसगावकर यांनी केले व त्यांनीच आभार मानले.
पुढील हप्ता पुन्हा मुख्यमंत्री बनल्यावर!
साखळी मतदारसंघातील जनतेने आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाच्या बळावरच आपण मतदारसंघातील विकास व सर्व घटकांच्या कल्याणाचे कामे करू शकलो. आज मुख्यमंत्री असल्याने या कामाला गती देऊन ते यशस्वी करण्यात आपणास यश आले. आज ७० शेतकऱ्यांना धनादेश वाटप केले. येणाऱ्या निवडणुकीत निवडून येऊन पुन्हा मुख्यमंत्री बनल्यावर लगेच दुसरा नुकसानभरपाईचा हप्ता शेतकऱ्यांना वितरीत करू, असा विश्वासही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.