पणजी: कारापूर येथील ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ यांच्या ‘वन गोवा’ प्रकल्पातील सुरुवातीच्या चार इमारतींच्या बांधकामाला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे स्थगिती दिली आहे. तसेच, या प्रकल्पासाठी नगरनियोजन विभागाने यापूर्वी दिलेले तांत्रिक दाखले आणि बांधकाम परवानेही स्थगित करण्यात आले आहेत, अशी माहिती गोवा फाउंडेशनचे सचिव क्लाॅड अल्वारीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रवीणसिंग शेटगावकर यांनी दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. शेटगावकर यांनी यापूर्वी दाखल केलेली याचिका निकाली काढताना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. राज्य सरकारने नगरनियोजन कायद्याच्या कलम १७(२) अंतर्गत दिलेल्या मंजुरीशी संबंधित असलेल्या या बांधकामांना नगरनियोजन विभागाने तांत्रिक परवानगी दिल्याबाबत याचिकादाराने आक्षेप घेतला होता.
या कायदेशीर लढ्याची पार्श्वभूमी जुलै २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात आहे. त्यावेळी न्यायालयाने संबंधित मंजुरीच्या प्रकरणात नगरनियोजन विभागासह सर्व संबंधितांना ''जैसे थे'' परिस्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले होते. असे असतानाही प्रकल्पाला तांत्रिक परवानग्या देण्यात आल्याचा आरोप याचिकादाराने केला आहे.
अधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका
दरम्यान, या प्रकरणी शेटगावकर यांनी मुख्य नगरनियोजक वर्तिका डागूर आणि डिचोलीचे नगरनियोजक शिवप्रसाद मुरारी यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. जुलै २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ''जैसे थे'' आदेशाचे उल्लंघन करून संबंधित अधिकाऱ्यांनी तांत्रिक परवानग्या दिल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. या अवमान याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.