Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज, सुदिन-विनोद एकत्र?

Khari Kujbuj Political Satire: पणजीतील कार्यक्रमाला पणजीचे आमदार तथा महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली होती.

Sameer Panditrao

सुदिन-विनोद एकत्र?

माजी झेडपी विनोद नागेशकर हे पूर्वी वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या गोटातले. मात्र मध्ये काय झाले कोणास ठाऊक पण ते सुदिनांपासूनच नव्हे तर राजकारणापासूनच अलिप्त झाले. आता परत ही ‘दरी’ मिटतेय, असे वाटू लागले आहे. कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी ‘मगो’ वर केलेल्या आरोपात नाव गोवले गेल्यामुळे संतप्त झालेल्या नागेशकरांनी पत्रकार परिषद घेऊन याचे खंडन केलेच, त्याचबरोबर त्यात त्यांनी ढवळीकर कुटुंबाशी आपले चांगले संबंध असल्याचेही सांगितले. आता ही नव्या नात्याची ‘नांदी’ आहे का, हे कळायला मार्ग नसला तरी बांदोडा परिसरात तशी चर्चा सुरू झालीय. ∙∙∙

बाबूश यांनी दामूला पाडले तोंडावर!

भाजपच्या स्थापना दिनाचा कार्यक्रम पणजीच्या मुख्यालयात रविवारी झाला. या कार्यक्रमाला तिसवाडी तालुक्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी तीन ठिकाणचे आमदार उपस्थित होते. त्यात ताळगावच्या जेनिफर मोन्सेरात, सांताक्रूझचे रुडाल्फ फर्नांडिस आणि कुंभारजुवेचे राजेश फळदेसाई यांचा समावेश होता. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या सांगण्याप्रमाणे भाजपात आलेल्या आमदारांमध्ये पक्षाची विचारधारा रुजत आहे, ते शिस्त पाळत आहेत. परंतु पणजीतील कार्यक्रमाला पणजीचे आमदार तथा महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली होती. परवा इन्स्टिट्यूट ऑफ मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या हॉलमध्ये भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला बाबूश व्यासपीठावर होते. परंतु भाजपच्या स्थापना दिनाला ते आले नसल्याने त्याची विचारणा अध्यक्षांकडे पत्रकारांनी केली. त्यावर गोव्याबाहेर असल्याचे बाबूश यांनी आपणास सांगितल्याचे प्रदेशाध्यक्षांचे उत्तर. मात्र, काही वेळातच बाबूश यांनी आपल्याच फेसबूक पेजवर भाजप पणजी मंडळाचे अध्यक्ष, उपमहापौर, नगरसेवक व इतरांबरोबर मिरामार येथील कार्यालयात पक्षाचा स्थापना दिन साजरा केल्याची छायाचित्रे अपलोड केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना मात्र बाबूश यांनी तोंडावर पाडले एवढे नक्की..! ∙∙∙

रवी नाईक ‘शिक्षण तज्ज्ञ’?

कृषिमंत्री रवी नाईक यांना राजकारणातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जाते. पण त्यांचे एक वेगळेही रूप आहे. आणि ते म्हणजे शिक्षण क्षेत्रातील वर्चस्वाचे. सध्या फर्मागुडी- फोंडा येथील फोंडा एज्युकेशन सोसायटीतर्फे ते पाच शैक्षणिक आस्थापने चालवितात. त्यातल्या तीन संस्थांना तर सरकारी अनुदानही मिळत नाही. आणि याचकरता ते शिक्षण क्षेत्रातील नसूनही त्यांना फोंड्यात ‘शिक्षण तज्ज्ञ’ म्हणून संबोधले जाते. आता ही उपाधी किती संयुक्तिक आहे, हे सांगणे कठीण असले तरी त्यांच्या शैक्षणिक संस्थेमुळे हजारो विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व इतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळत आहे, एवढे मात्र नक्की. आहे की नाही, पात्रावांची कमाल... ∙∙∙

वेध निवडणुकांचे!

निवडणुका जवळ आल्याचे संकेत कसे मिळतात? जे इच्छुक उमेदवार आपला वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करतात. वर्तमानपत्रांवरत मोठ-मोठ्या जाहिराती देतात. काही इच्छुक उमेदवार आपापल्या मतदारांना जागृत करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू करतात, लोकांच्या गाठीभेटी घेतात. घरी जातात, वाटेत दिसल्यावर हस्तांदोलन करतात. हे सर्व आता सुरू झाले आहे. मडगावातही इच्छुक उमेदवारांनी कामे सुरू केली आहेत. मडगावला आधी पालिका निवडणुकीचे व नंतर विधानसभा निवडणुकीचे वेध लागतील. इच्छुक उमेदवारांनी फुटसाल स्पर्धा, शरीरसौष्ठव तसेच इतर स्पर्धा. आरोग्य शिबिरे, समाज माध्यमावरून विरोधकांवर टीका, आधार कार्ड अपडेशन सारखे उपक्रम सुरू झालेत. मात्र, या सर्वाला मडगावकर कसा प्रतिसाद देतात, हे नंतर कळेलच. अजून तसा वेग आला नसला तरी निवडणुकांचे संकेत मिळू लागलेत. मतदारांनो सावध रहा! ∙∙∙

खासदारांची कामगिरी

लोकप्रतिनिधीचे काम लोकांच्या समस्या सोडविणे व त्यांचे प्रश्न योग्य ठिकाणी मांडणे, हे असते. खासदार म्हटले की, राज्यसभेत किंवा लोकसभेत समस्या मांडतात. गोव्यात तीन खासदार आहेत. मात्र, त्यांच्या कामगिरीचा उहापोह होताना दिसत नाहीत. कदाचित ते भूमिगत पद्धतीने लोकांचे प्रश्न मांडत असतील. पण सध्या स्पर्धा आहे, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे व लोकसभा खासदार विरियातो फर्नांडिस यांच्यात. गत अधिवेशनात कोणी किती प्रश्‍न मांडले यावर सध्या चर्चा जोरात होतेय. विरियातो यांनी तर आपले ‘सोशल मीडिया’ अकाऊंट योग्य प्रकारे हाताळले असून त्यांचे प्रत्येक भाषण ‘सोशल मीडिया’त ‘अपलोड’ होताना दिसतात. तानावडे यांनी १०० पेक्षा जास्त तर विरियातो यांनी म्हणे केवळ ३६ प्रश्न मांडले पण ते सर्व लोकांच्या जिव्हाळ्याचे होते. प्रश्न किती मांडले, किती चर्चा केली याहून लोकांच्या समस्या किती सुटल्या; हे महत्त्वाचे आहे ना?. ∙∙∙

शेतजमिनी उरल्यात कुठे?

शनिवारी मडगावांत झालेल्या बहुद्देशीय आपत्ती व्यवस्थापन निवारा प्रकल्पाच्या उद्‍घाटन समारंभात बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शेतजमिनी तसेच विकास निषिद्ध विभाग जपण्याचे व त्यांचे रक्षण करण्याचे आवाहन केले खरे. पण त्यामुळे अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या. त्यामागील कारणही तसेच आहे. कारण केवळ मडगाव सारख्या शहरांतच केवळ नव्हे तर त्या लगतच्या भागांतही अशा जमिनी शिल्लक राहिलेल्या नाहीत, असे लोक म्हणतात. मडगावात तर केवळ जमिनीच नव्हेत तर जुनी पुरानी घरेही म्हणे उरलेली नाहीत.आता तर जुन्या एक वा दोन-तीन मजली इमारतींच्या जागी त्यांच्या पुनर्विकास योजनेखाली आठ ते दहा मजली इमारती उभ्या रहात आहेत व त्यामुळे बैठी घरे ही केवळ इतिहासात रहातील, असे म्हटले जाऊ लागले आहे. ∙∙∙

भाग्यवंतच हो...

बदलीचा आदेश येऊनही अनेक पोलिस बदलीच्या ठिकाणी काही केल्या रुजूच होत नाहीत. तर काही पोलिस अहो आमची बदली करा, अशी विनवणी करूनही थकतात ,मात्र त्यांच्या नशिबी बदलीचा योग मात्र जुळून येत नाही. काहींची विनासायास ट्रान्सफर होते. सासष्टीतल्या एका पोलिसाचे नशीब असेच फळफळले आहे. साहेबाला हफ्ता आणून देणाऱ्या या पोलिसाची अवघ्या सहा महिन्यांत पसंतीच्या जागी बदली झाली आहे. दुर्गारूपी हा पोलिस माझी बदली नक्की असे आपल्या सहकाऱ्यांना सांगतही होता. खरोखरच त्यांनी काय जादू केली बुवा असे आता अन्य पोलिस आपसात बोलतात.सायबाचा आशीर्वाद असला तर सर्व काही शक्य आहे, हे पोलिसांना कुणी दुसऱ्याने सांगावे लागते का?∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT