
बदल्यांचे आदेश निघूनही नव्या जागी रुजू न झालेल्या हजारावर पोलिसांना त्वरित कामावर हजर होण्याची तंबी ज्याअर्थी पोलिस महानिरीक्षकांना द्यावी लागली त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावणे साहजिकच आहे. आजवर विशिष्ट जागी पोस्टींग मिळावी म्हणून प्रयत्न होत होते, पण बदली झालेल्या ठिकाणी न जाणारे इतक्या संख्येतील पोलिस असावेत यावरून या एकंदर प्रकरणात बरेच पाणी मुरते. एवढेच नव्हे तर पोलिसांना मूळ जागेवरून पदमुक्त न करणारेही कोणीतरी असावेत असे बोलले जात आहे. काही पोलिस स्टेशनवर म्हणे वर्षानुवर्षे पदाला चिकटून बसणारे जसे पोलिस आहेत तसेच दक्षिण गोव्यातील एका पोलिस ठाण्यावर या खात्यात रुजू झाल्यापासून त्याच ठिकाणी असलेले पोलिसही आहेत. तेवढ्यावर भागत नाही, तर दुसऱ्या ठिकाणी जावे लागणार म्हणून बढती नाकारणारे महाभागही आहेत. ∙∙∙
गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी पक्ष विस्तार करण्यासाठी आपण संपूर्ण गोव्यात फिरणार असे यापूर्वी जाहीर केले होते. आता विजय अन्य कुठे फिरले की नाही ते माहीत नाही. मात्र, कुडचडे मतदारसंघात भेट देण्याचे प्रमाण हल्लीच्या दिवसात भलतेच वाढलेले दिसते. काल कुडचडे येथे साईबाबा मंदिरात एक कार्यक्रम झाला होता. तेथे विजय सरदेसाई यांचा केपेचे आमदार बाबू कवळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा सोहळा जरी धार्मिक स्वरूपाचा असला तरी त्यातूनही लोक राजकीय अर्थ काढू लागले आहेत. हल्लीच केपेचे काँग्रेस आमदार भाजपच्या जवळ अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर विजय सरदेसाई यांचा बाबूंच्या हस्ते झालेला हा सत्कार चर्चेत आला नसता तरच नवल. कालच विजय यांची माजी मंत्री दयानंद मांद्रेकर आणि किरण कांदोळकर यांनी भेट घेतली होती. त्यानंतर संध्याकाळी बाबूंच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. या सर्व घटनांमागे काही वेगळे राजकारण तर लपलेले नाही ना? ∙∙∙
मडगाव नगरपालिकेने विविध शुल्क वा करांत शेकडोपटींनी वाढ केली म्हणून तेथील काही संघटनांनी व नेत्यांनीही बरेच अकांडतांडव केले व ती करवाढ मागे घ्यावी म्हणून मागणीही केली, पण सर्वसामान्यांना या कर वा शुल्कवाढीचे काहीच पडून गेलेले नाही असे एकंदर वातावरण आहे व त्यामुळे अनेकजण चकीतही झाले आहेत. कारण १ एप्रिलपासून शुल्क व कर भरणा करण्यासाठी लोकांची नगरपालिकेत एकच गर्दी उसळत असून नगरपालिकेत लक्षणीय प्रमाणात महसूल जमा होताना दिसत आहे. त्यामुळे ही करवाढ लोकांना जाचक दिसत नाही. ही अशी वाढ त्यांनी अपेक्षीत धरलेली आहे असा प्रश्न या वाढीविरुध्द आवाज उठविलेल्यांना पडला आहे. नगरपालिका निवडणूक लवकरच होणार असून त्या निवडणुकीत हा करवाढीचा मुद्दा उपस्थित करून त्याचा लाभ उठवू पाहणाऱ्यांच्या प्रयत्नांना त्यामुळे हादरा बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः शॅडो कौन्सिलने या करवाढीचा बागुलबुवा उभा करण्याचा प्रयत्न केला आहे, पण प्रत्यक्षात तो पोकळ शो ठरला आहे. ∙∙∙
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदासाठी एका मंत्र्याने एका अधिकाऱ्याच्या नावाची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी एका जागेवरून त्या अधिकाऱ्याला हटवले होते. काही दिवस कार्मिक खात्याची हवा घेतल्यावर त्याला पणजीपासून दूरवर नियुक्ती दिली होती. त्या अधिकाऱ्याचे नाव मंत्र्याने मंडळाच्या अध्यक्षपदासाठी पुढे केल्यावर मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सफाईदारपणे तो विषय हाताळला. तो अधिकारी सध्या असलेल्या ठिकाणी असणे का योग्य आहे हे मंत्र्याला पटवून दिले. ∙∙∙
बार्देशमधील आसगाव पुन्हा चर्चेत आले आहे. रस्त्यालगतच्या बांधकामांचे सर्वेक्षण पंचायतीने शनिवारी केले. मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचा आदेश दिल्यानंतर रस्त्यालगतची बेकायदा बांधकामे हटवावीच लागतील अशी सरकारने भूमिका घेतल्यानंतर पंचायत पातळीवर कारवाईची तयारी केली जात आहे. दिल्लीवाल्यांची बांधकामे वाचवली जातील. मात्र, रस्त्याशेजारी उपजीविकेसाठी गाडा घालणाऱ्यांवर सरकार कारवाई करेल अशी चर्चा तेथे सुरू झाली आहे. ∙∙∙
राज्यात सरकार केवळ इव्हेंट करतात असे एकेकाळी विरोधक बोलताना दिसत होते. आता हा सूर लोकांनी लावायला सुरवात केली आहे. आता जर हा लोकांनी लावलेला सूर लोकांच्या मनात उतरून त्यांनी अंगीकारला, तर बहुतेक इव्हेंटवाल्यांना धक्का बसू शकेल. इव्हेंट विरोधात सूर कुणी तयार केला की तो आपोआप झाला याचा शोध म्हणे सत्ताधारी घेत आहेत. आता त्यांना शोध लागला तर त्यांनी लोकांना पत्रकार परिषद घेऊन सांगावे, जसे इतर गोष्टी सांगतात. आता लोकांची इच्छा सत्ताधारी पूर्ण करेल का हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.∙∙∙
पेडण्याच्या भाजप मंडळ समितीने माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी असा ठराव संमत केला आहे. नव्याने प्रदेशाध्यक्षपदी आलेल्या दामू नाईक यांच्यासमोर निर्माण झालेला हा पहिला पेच आहे. आजगावकर हे आपण पेडण्यातूनच विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांनी भाजपचे पेडण्यातील आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यावर टीका केल्याचे निमित्त साधत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.