पाळी: आज, उद्या करीत अखेर राज्यातील शाळा, विद्यालये सुरू झाली. मात्र खाण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय मात्र दूर झालेली नाही. खाण भागातील विद्यार्थ्यांनी शाळा, विद्यालयात हजेरी लावली खरी पण दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना खाण कंपन्यांनी पुरवलेली वाहने बंद केल्याने या विद्यार्थ्यांना खाजगी बसगाड्यांतून विद्यालय गाठावे लागले. विशेष म्हणजे शहर परिसरात उच्च माध्यमिक त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही वाहतुकीचा अतिशय मनस्ताप सहन करावा लागला. (students in the mining area are getting affordable)
राज्यातील शाळा, विद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थी व पालकांनी या निर्णयाचे स्वागतच केले आहे. खाण भागात असलेल्या शाळा विद्यालयांत विद्यार्थ्यांनी सकाळी हजेरी लावली. जवळच्या विद्यार्थ्यांनी पायी चालत शाळा गाठली. मात्र उच्च माध्यमिक विद्यालयाची सोय दूरवर असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना खाजगी बसगाड्यांचा आधार घ्यावा लागला. दुपारी विद्यालय सुटल्यानंतर उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाजगी बसची वाट पाहत तिष्ठत रहावे लागल्याचे निदर्शनास आले.
कोविडमुळे (Covid-19) शाळा विद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे बहुतांश बालरथ एकाच जागी आहेत. त्यामुळे अचानक शाळा, विद्यालये सुरू झाल्याने या बालरथांची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. काही बालरथ वाहतूकयोग्य करण्यात आले आहेत, त्यांचा वापर करण्यात आला, पण अन्य काही बालरथांची दुरुस्ती सध्या सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खाण कंपन्यांनी मागच्या काही वर्षांपूर्वी ग्रामीण खाणव्याप्त भागातील विद्यार्थ्यांसाठी खाजगी वाहतूक सेवा सुरू केली होती. ही मोफत वाहतूक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली होती. मात्र दुसऱ्यांदा खाणी बंद झाल्यानंतर 2018 मध्ये खाण कंपन्यांनी ही वाहतूक सेवा बंद केली, त्यामुळे विद्यार्थ्यांची अतिशय गैरसोय झाली आहे. निदान आता सत्तारूढ होणाऱ्या सरकारने ही वाहतूक सेवा पुन्हा एकदा सुरू करण्याची जोरदार मागणी खाण अवलंबितांकडून करण्यात येत आहे.
खाण कंपन्यांनी जबाबदारी झटकली
वास्तविक गेली साठ सत्तर वर्षे खाणींचा (Goa Mining) व्यवसाय सुरू आहे. या खाण व्यवसायातून खाण मालकांनी बक्कळ पैसा कमावला. खाणी सुरू होत्या त्यावेळेला या खाण कंपन्यांच्या व्यवस्थापनांनी खाण भागात काही तुटपुंज्या सुविधा उपलब्ध केल्या. त्यातीलच एक म्हणजे काही ठिकाणी विद्यार्थ्यांची (Goa Studetnt) ने आण करण्यासाठी मोफत वाहने पुरवली. स्थानिक लोकांच्या बसगाड्या, जीपगाड्या त्यासाठी खाण कंपन्यांनी भाडेपट्टीवर घेतल्या. मात्र दुसऱ्यांदा खाणी बंद झाल्यानंतर ही विद्यार्थ्यांची वाहतूक सेवा या खाण मालकांनी त्वरित बंद केली, ती आजतागायत बंदच आहे. मध्यंतरीच्या काळात लिलावाचा खनिज माल तसेच स्वामित्व धन अदा केलेल्या खनिज मालाची वाहतूक करून या खाण कंपन्यांनी मोठा पैसा कमावला. पण खाण अवलंबितांसाठी कोणतीही सुविधा पुरवली नाही. बक्कळ पैसा कमवूनही सामाजिक बांधिलकी विसरलेल्या या खाण मालकांना खरे म्हणजे सरकारनेच चपराक द्यायला हवी होती, पण दुर्दैवाने तसे झालेले नाही.
खाणी बंद झाल्यानंतर परवडत नसल्याचे कारण देऊन खाण कंपन्यांनी विद्यार्थी वाहतूक सेवा बंद केली. वास्तविक करोडो रुपये कमावलेल्या खाण मालकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून निदान शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा द्यायला हवी होती. पण नंतरच्या काळात लिलाव व अन्य तऱ्हेच्या खनिज मालाची वाहतूक करून या खाण मालकांनी बक्कळ पैसा कमावला. पण सामाजिक सेवांकडे दुर्लक्ष केले. सरकारनेही अशा प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष केले, त्यामुळे या खाण मालकांचे फावले आहे.
- दिनेश यशवंत नाईक (डिगणे - होंडा)
खाण कंपन्यांनी काही तुटपुंजी सुविधा खाण अवलंबितांसाठी सुरू केल्या होत्या, पण त्या लगेच बंद करण्यात आल्या. आता शाळा, विद्यालये सुरू झाल्याने निदान विद्यार्थी वाहतूक सुविधा तरी सुरू करण्याची खरी गरज आहे.
- निरंजन राया उसगावकर (तिस्क - उसगाव)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.