Krishna Mandrekar Dainik Gomantak
गोवा

Goa Jatra: फुल ते गोबी मंचुरियन विक्रेता... 32 वर्षांपासून गोव्यातील एकही जत्रा न चुकवलेला 60 वर्षांचा तरुण

Vinayak Samant

Goa Jatra: सडपातळ बांधा, चेहऱ्यावर सुरकुत्या, डोळ्यांवर चष्मा आणि थरथरत्या हातांनी भजी तळणाऱ्या एक आजोबांवर जत्रेत नजर गेली आणि पावलं थबकली. जत्रेत मध्यभागी असलेल्या गोबी मंचुरियनच्या गाड्यावर ते आपल्या कामात व्यस्त होते. कुतूहल म्हणून जवळ गेलो तरी ते कामात व्यस्तच.

आपसूकच त्यांच्याशी चर्चा सुरू झाली आणि कळालं की 60 वर्षे वयाचे हे गृहस्थ गोव्यातल्या प्रत्येक जत्रेत असतात. नानाविध प्रकारच्या गोष्टींनी सजलेल्या गोव्यात जत्रेला खूप महत्व आहे. इथल्या प्रत्येक मंदिरातील देविदेवतांची जत्रा भरते. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने तर काही ठिकाणी त्याला भव्य स्वरूप असते. पण जत्रा हा इथल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय.

Krishna Mandrekar

आता गोव्यातील जत्रा म्हटले की फेरी आणि सोबत फेरीवाले आलेच. आपण सर्वजण तिथे जाऊन आपल्याला आवडणाऱ्या वस्तु खरेदी करतो. परंतु या फेरीवल्यांबद्दल सहसा विचार आपल्या मनात येतो का? की कुठून येत असतील हे? कसा सांभाळत असतील हा व्यवसाय ? कुठल्या अडचणी असतील त्यांच्यासमोर?

जत्रेत भेटलेल्या त्या आजोबांशी आम्ही संवाद साधला तेव्हा त्यांच्या खडतर प्रवासाबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या. तर, या वृद्ध बाबांचे कृष्णा मांद्रेकर असे नाव असून, ते भटवाडी मये येथील रहिवासी आहेत. लहानपणापासूनच परिस्थिती बेताची त्यामुळे लहान वयातच त्यांना कष्ट आणि जबाबदारीची जाणीव होती. आर्थिक चणचण असल्याने सातवी नंतर शाळा सोडावी लागली पण काहीतरी करण्याच्या जिद्धीने फुले विकण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला.

Goa Jatra

जबाबदारीच्या ओझ्याखाली बालपण गेले आणि त्या वयात सुरू केलेला व्यवसाय सात आठ वर्षे चालविल्यावर त्यांनी मोटरसायकलने भाडे मारण्यास सुरवात केली. काही काळ ते झाल्यावर त्यांनी वडापावची गाडी सुरू केली, मग जत्रेमध्ये प्लास्टिक विकणे, खेळणी विकणे, विविध खेळांचे दुकान असे करत आता गोबी मंचुरियनच्या दुकानपर्यंत त्यांचा व्यवसाय आला आहे.

गेली 32 वर्षे अखंडीतपणे चालू असलेल्या ह्या व्यवसायाची सुरवात त्यांनी 1990 मध्ये केली आणि तेव्हा पासून गोव्यातील प्रत्येक जत्रेत ते सहभागी होतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वास्को येथील दामोदर सप्ताहापासून जत्रेचे वेध सर्वांना लागतात. त्यानंतर होणारी नार्वे गावातील मसणदेवीची जत्रा, गोकुळाष्टमी असे करत हळू हळू राज्यात सर्वत्र जत्रांना प्रारंभ होतो.

दिवाळीनंतर येणाऱ्या एकादशीला मांद्रे गावातील भगवती देवीच्या होणाऱ्या सप्ताहानंतर वेगवेगळ्या गावात नियमितपणे जत्रा होतच असतात. काणकोण, कुर्टी, फोंडा, पेडणे, हरमल, केरी, कोरगाव असे करत गोव्यातील सर्वात शेवटची जत्रा ही शिरगावच्या श्री देवी लाइराईची जत्रा असते. आणि या सर्व जत्रामध्ये हा अवलिया त्याच्या गाड्यासह हजेरी लावत असतो.

पुर्वी जत्रांना म्हणावी तशी गर्दी होत नसत पण आता बऱ्यापैकी गर्दी जमते आणि त्यातून कमाई देखील चांगली होते असे कृष्णा मांद्रेकर सांगतात. व्यवसायात गुंतवलेलं भांडवल वसूल तर होतेच पण वरती फायदा देखील बराच होतो, असे त्यांनी सांगितले.

Goa Jatra

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT