
पणजी: भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सुरू असलेले राष्ट्रीय पातळीवरील वाद आता गोव्यातही चर्चेचा विषय ठरणार आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार रोहित चावला यांच्या ‘रेन डॉग्स’ या छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० वाजता गोवा संग्रहालयात होणार असून, या कार्यक्रमात रस्त्यावरील प्राण्यांच्या परिस्थितीवर सखोल चर्चा होईल.
सध्या देशभरात रस्त्यावरील कुत्र्यांबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दिल्ली-एनसीआर परिसरातील सर्व भटक्या कुत्र्यांना आश्रयगृहात हलवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पाळीव प्राणीप्रेमी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील आपला अंतिम निर्णय राखून ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात होणारे ‘रेन डॉग्स’ प्रदर्शन आणि चर्चा विशेष ठरणार आहे.
या चर्चासत्रात रोहित चावलासोबत कॅथरीना कक्कर, अतुल सरीन आणि हेमाली सोधी सहभागी होणार आहेत. गोवा तसेच भारतातील भटक्या प्राण्यांची सद्यस्थिती, सरकारी नियम, समाजाची मानसिकता आणि शहरीकरणामुळे वाढणाऱ्या आव्हानांवर यावेळी चर्चा होईल.
विकसित होत असलेल्या समाजात भटक्या प्राण्यांची उपेक्षा का होते, आणि या समस्येकडे गांभीर्याने का पाहायला हवे?” या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न या चर्चेत केला जाईल.
कोविडकाळात रोहित चावलाने गोव्यात पावसाळ्याच्या दिवसांत समुद्रकिनाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांचे जीवन जवळून पाहिले. निर्जन समुद्रकिनाऱ्यावर त्याच्या मागे येणाऱ्या या कुत्र्यांचे फोटो त्याने टिपायला सुरुवात केली. रस्त्यावर मिळणाऱ्या अन्नावर जगणारे हे कुत्रे लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे उपेक्षित झाले होते. या दृश्यांनी त्याला चटका लावला आणि त्यातून ‘रेन डॉग्स’ या प्रदर्शनाची निर्मिती झाली.
यावर आधारित ‘रेन डॉग्स’ हे पुस्तक तयार करण्यात आले, ज्यामध्ये रोहित व्यतिरिक्त सुमारे ३० लेखकांनी आपले अनुभव कोणतेही मानधन न घेता शेअर केले. या पुस्तकाची रॉयल्टी प्राणी कल्याणासाठी कार्यरत संस्थांना दिली जाणार आहे.
२०२३ मध्ये कान्समध्ये इंडस्ट्री क्राफ्ट गोल्ड लायन पुरस्कार आणि २०२४ मध्ये स्पाइक्स एशिया व एबीज ग्रँड प्रिक्स पुरस्कार जिंकलेल्या रोहित चावला यांचे हे कार्य रस्त्यावरील प्राण्यांच्या प्रश्नांबाबत नवी जाणीव निर्माण करणारे ठरू शकते. ‘रेन डॉग्स’ हे प्रदर्शन आणि चर्चा सत्र हे प्राणीप्रेमी, कार्यकर्ते आणि धोरणकर्त्यांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.