मांडवी नदीच्या खाडीत आखाडा-जुवे येथे गुजरातचा तरुण बासुदेव भंडारी हा मध्यरात्रीच्या सुमारास रस्ता चुकल्याने सरळ गाडीसह खाडीत गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता आहे. तो स्वतः जिवंत किंवा मृतदेह सापडलेला नाही. पोलिसांनी त्याचा शोध घेतला तसेच त्याच्या कुटुंबियांनीही महिनाभरात गोव्यात राहून सर्व पर्याय शोधून काढले, मात्र अखेर नाईलाजाने त्यांना परतावे लागले. त्याचा मृतदेहही पाण्यात सापडला नाही, त्यामुळे जिवंत आहे की मृत झाला याच्या निष्कर्षाप्रत पोलिसही येऊ शकलेले नाही. जोपर्यंत त्याचा पत्ता लागत नाही किंवा मृतदेह सापडत नाही, तोपर्यंत तो बेपत्ता अशीच नोंद पोलिसांना ठेवावी लागली आहे. पोलिसांनीही ही शोधमोहीम तूर्त स्थगित ठेवली आहे. त्याच्या बेपत्ता होण्यामागील अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात होते. मात्र त्याचा शोधच लागला नसल्याने पोलिसही बुचकळ्यात पडले आहेत. पोलिसांनीही तपासाचा नाद सोडला आहे. जोपर्यंत त्याचा पत्ता लागत नाही, तोपर्यंत त्याच्या कुटुंबीयांनी दिलेली बेपत्ता प्रकरण बंद करता येत नाही. त्यामुळे पोलिसांची तळ्यात - मळ्यात अशी स्थिती झाली आहे. अखेर बासुदेव भंडारी गेला कोठे? हा प्रश्नच अनुत्तरित आहे.∙∙∙
कला अकादमीच्या नाट्य स्पर्धेत संहिता तपासायला सेन्सॉर समिती नाही. सर्व राज्यांत ती आहे. अगोदरच भावना दुखावल्याचे प्रकार राज्यात घडत असतात. उद्या जर कुणी व्यक्तिगत स्तरावर शिंतोडे उडवणारे नाटक सादर केले तर ते होऊन जाणार. कला अकादमीला त्याचे सोयर सुतक नाही. हा सेन्सॉर नियम ताबडतोब कार्यान्वित करावा; कारण वेळप्रसंगी राजकीय नेते, पक्ष, इतर नाजूक घटक यांच्यावर व्यक्तिगत टीका केली गेली तर ‘सेन्सॉर’ नावाचा विषयच नसल्याने कला अकादमीला आणखीन एका विषयाला तोंड द्यावे लागेल. नाटकाच्या मूळ लेखकाची वा अनुवादकाची अनुमती सुद्धा गांभीर्याने पाहिली जात नाही. हे काम आमचे नाही म्हणून ‘खाके वरशे’ करून विषय संपत नाही.∙∙∙
कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सने आपल्या मतदारसंघातील विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी जो माहोल तयार केला, ते पाहता कोणालाही वाटले असेल, की रेजिनाल्डचा तर वाढदिवस नसेल ना! ही शंका जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सुद्धा व्यक्त केली. रोहनबाबने तर सांगितले, की आपल्याला रेजिनाल्डचा वाढदिवसच असल्यासारखे वाटले. रोहनने पुढे सांगितले, की काही आमदार विकास कामांचा शुभारंभ स्वतःच्या वाढदिनी करतात. आपणही सुरुवातीला एकदा असा प्रयत्न केला होता. मात्र वाढदिनी सुरू केलेली आपली सर्व विकास कामे थांबली. तेव्हापासून आपण आपल्या वाढदिनी विकास कामांचा शुभारंभ करीत नसल्याचे रोहनबाबने स्पष्ट केले. उपस्थितांची मात्र त्यामुळे करमणूक निश्र्चितच झाली. ∙∙∙
कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांना राज्य मंत्रिमंडळातून डिच्चू दिल्यापासून ते भाजपच्या नेत्यांवर नाराजच आहेत. ते भाजप कार्यक्रमांमध्ये क्वचितच सहभागी होताना दिसतात. जेथे संधी मिळेल, तेथे ते आपली नाराजी अप्रत्यक्षपणे दाखवून देतात. भाजपच्या मंडळ अध्यक्षांची निवडणूक हे निमित्त होते. या कार्यक्रमात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मंत्री असताना त्यांनी कुडचडे मतदारसंघात अनेक कामे हाती घेतली होती. ही कामे गेल्या काही महिन्यांपासून पूर्ण न होता पडून आहेत. मुख्यमंत्र्यांनी ‘भिवपाची गरज ना’ अशी घोषणा केली होती, मात्र आता जर मतदारसंघातील कामांचा आढावा घेतला, तर ‘भिवपाची गरज आसा’ असे दिसून येऊ लागले आहे, असे सांगत त्यांनी आपली भीती प्रत्यक्षपणे व्यक्त केली. नीलेश काब्राल यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आल्यापासून त्यांचे येथील भाजप ज्येष्ठ नेत्यांशी असलेले जवळचे संबंध कमी झाले आहेत. २०१७ मध्ये भाजपकडे पुरेसे आमदार नसताना सरकार बनवण्यासाठी विरोधी आमदारांना भाजपला पाठिंबा देण्यास वळवण्याची महत्वाची भूमिका आमदार मायकल लोबो व आमदार काब्राल यांनी बजावली होती, मात्र भाजपला त्याचा विसर पडला आहे.∙∙∙
२०२२च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांची मोठी पंचाईत झाली होती. कॉंग्रेसची उमेदवारी मिळत नाही, म्हणून त्यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र केवळ एक- दोन दिवसच ते त्या पक्षात राहिले. त्यांनी लगेच पक्षाचा राजिनामा दिला आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. आपण अपक्ष उमेदवारी का भरली, या मागील कहाणी त्यांनी शुक्रवारी कुडतरीवासियांच्या समक्ष सांगितली. आपण त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आभारी आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे उपस्थितांची उत्सुकता आणखी वाढली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी त्यांना सांगितले, की गुप्तचर माहिती प्रमाणे तृणमूल कॉंग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविल्यास ते निवडून येणार नाहीत. त्यामुळे आपण पक्ष सोडला आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजयप्राप्त झाला. ∙∙∙
२० वर्षांपूर्वी एका नृत्य कार्यक्रमात देशातील कर्नाटकी नृत्त्यातील महान गुरु पद्मविभूषण बाल मुरली कृष्णन हे मडगावात आले होते. तेव्हा त्यांनी एका मुद्द्यावर बोलताना सध्याचे मंत्रिपद किंवा कसलीही पदवी ही जाऊ शकते पण माजी ही पदवी कायमची राहते. शनिवारी फातोर्डा भाजप मंडळाच्या अध्यक्ष नियुक्ती कार्यक्रमात एका वक्त्याने मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना माजी आमदार म्हटले. तेव्हा लगेच सर्वांनाच हसू आले. दिगंबरबाबांनी तर तत्काळ सांगितले, की आपल्याला एवढ्यात माजी व्हायचे नाही. मात्र दिगंबरबाब एक विसरले, की माजी ही उपाधी त्यांना यापूर्वीच लागलेली आहे आणि ती म्हणजे माजी मुख्यमंत्री. ∙∙∙
शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर सदानंद शेट तानावडे हेच हवेत, ते सर्वांना बरोबर घेऊन जातात. ते प्रदेशाध्यक्ष न झाल्यास भाजपला त्रास होऊ शकतो, असे मंत्री गुदिन्हो यांना वाटत आहे. गुदिन्हो यांनी आपले मत जाहीरपणे व्यक्त केले आहे. परंतु त्यासाठी म्हणे पडद्याआड हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्यांच्या एका गटाला तानावडे हेच प्रदेशाध्यक्ष व्हावेत, असे वाटत आहे. सध्या जी नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत, त्यात ‘केडर''च्याच नावाचा विचार होणार असे स्पष्ट दिसत आहे. मात्र, प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री झाल्यापासून तानावडे यांचे पद अधिक भक्कम झाले आहे आणि त्यांनी आमदारांमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. तानावडे यांनाही आपण पुन्हा प्रदेशाध्यक्ष व्हावे, याची चर्चा पक्ष कार्यालयात गुप्तपणे सुरू झाली आहे. त्यामुळेच कदाचित माविन यांनी तानावडेंविषयी उमाळा दाखविला असावा. ∙∙∙
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत कधी कधी आपल्या भाषणातून अनेक गोष्टी सांगतात. फातोर्डा भाजप मंडळाच्या अध्यक्ष नियुक्ती कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज कपूर व माला सिन्हा यांचा अभिनय असलेल्या ‘फिर सुबह होगी’ चित्रपटाची आठवण करून दिली. कला अकादमीत लता दीदीच्या सत्कार समारंभात लालकृष्ण आडवाणी यांनी एक किस्सा सांगितला, की तेव्हा जनता पार्टीचा भरपूर प्रयत्न करुन पराभव त्यांच्या वाट्याला आला होता. संध्याकाळी मन शांत करण्याकरीता अडवाणीसह, अटलजी, मोदी व इतर काही प्रमुख कार्यकर्ते ‘फिर सुबह होगी’ चित्रपट पहाण्यास गेले. आता तर भाजप दोन खासदारांवरुन भक्कम सत्ताधारी पक्ष झाला आहे. तरीसुद्धा हे सर्व सांगण्याचा कामत यांचा हेतू काय होता? तीन निवडणुकांत पराभव पत्करावा लागलेल्या भाजपला फातोर्डात २०२७ साली ‘फिर सुबह होगी’ हे तर त्यांना सांगायचे नसेल ना! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.