Sunburn Festival 2024 Proposal To Dhargalim Panchayat Meeting
पेडणे: धारगळ येथे सनबर्न होणार की नाही, हे येत्या सोमवारी (ता.१) ठरणार आहे. सनबर्न आयोजकांनी धारगळ पंचायतीकडे परवानगीसाठी केलेल्या अर्जावर विचार करण्यासाठी पंचायत मंडळाची खास बैठक सोमवारी सकाळी १०.३० वाजता बोलाविली आहे.
तथापि, यापूर्वी सनबर्नला विरोध करणारे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आपल्या भूमिकेत बदल करत, लोकांना हवा असेल तर सनबर्न होण्याच्या बाजूने मी असेन. लोकांना नको असेल तर माझा विरोध असेल, असे त्यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले. विरोध करणारे जास्त की समर्थन करणारे जास्त आहेत हे कसे ठरवणार या प्रश्नावर ‘वेळ आल्यावर ते समजेल’ असे उत्तर त्यांनी दिले. धारगळ येथे सनबर्न होणार की नाही, याकडे पेडणेवासीयांचेच नव्हे, तर तमाम गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
माजी जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत तोरस्कर म्हणाले की, गेली वीस - पंचवीस वर्षे भाजपशी एकनिष्ठ राहून आम्ही कार्य केले. पेडणे मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. सरकारने सनबर्नसारखा लोकांना नको असलेला कार्यक्रम आमच्या माथ्यावर लादण्याचा प्रयत्न करून आमची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये. तसे केल्यास याची किंमत मोजावी लागेल. माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ म्हणाले की, आम्ही जरी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असलो तरी अशा प्रकारे आमच्या सरकारने आमच्यावर सनबर्न लादण्याचा प्रयत्न केल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल.
माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनीही सनबर्न लोकांना नको असेल तर त्याला विरोधच आहे, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे सनबर्नला पेडण्यात पाठिंबा देणारे कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपचे कार्यकर्ते असलेले उगवेचे सरपंच सुबोध महाले, पोरस्कडेच्या सरपंच सिद्धी गडेकर, धारगळचे पंच भूषण नाईक, पंच प्रार्थना मोटे, उत्तम वीर, रमेश बुटे, पूजा साटेलकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, सूर्यकांत तोरस्कर, कार्यकर्ते गिरीश कामत आदींनी विरोधात झेंडा फडकावला आहे.
धारगळ येथे जमिनीचे सपाटीकरण करणे सुरू झाले आहे. धारगळचे पंचायत सदस्य अनिकेत साळगावकर यांना सनबर्न आयोजकांच्या पत्राची प्रत न दिल्याने त्यांनी पंचायत संचालकांकडे दाद मागण्यासाठी तक्रार टंकलिखित केली असून सोमवारी ती आपण सादर करणार असल्याचे ‘गोमन्तक’ला सांगितले.
सनबर्न विरोधकांनी पेडण्यात पत्रकार परिषद घेतली. विशेष म्हणजे, आमदार आर्लेकर यांनी ही पत्रकार परिषद बोलावली होती. परंतु आमदारांना पणजीत तातडीचे काम आल्याने ते आले नाहीत. मात्र, त्यांचा सनबर्नच्या आयोजनाला विरोध आहे, असे या पत्रकार परिषद घेतलेल्यांचे म्हणणे होते.
धारगळ येथे सनबर्न महोत्सव आयोजित करण्याच्या नावाखाली सरकारची परवानगी नसताना ‘बुक माय शो’ या संकेतस्थळावरून तिकीट विक्री सुरू केल्याबद्दल आयोजकांवर गुन्हा नोंदवावा, अशी तक्रार ‘मिशन फॉर लोकल’चे संस्थापक राजन कोरगावकर यांनी आज सायबर विभागाकडे दाखल केली आहे. सरकारी परवानगी न मिळवताच सनबर्न आयोजकांनी ऑनलाईन तिकीट विक्री करण्याचा प्रकार हादेखील सायबर गुन्हाच ठरतो. या महोत्सवाला परवानगी दिली नसल्याचे प्रतिज्ञापत्र सरकारने न्यायालयात सादर करूनही सरकार हा प्रकार कसा काय सहन करते, असा सवाल कोरगावकर यांनी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.