Goa Cabinet Reshuffle
पणजी: गोवा मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत गेल्या काही महिन्यांपासून हालचाली सुरु आहेत. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामुळे विस्ताराच्या चर्चा काही काळासाठी थांबल्या पण, या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. अलिकडेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री, नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. दिल्लीतील झालेल्या घडामोडींनंतर गोवा मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चित मानला जात असून, येत्या महिन्यात दोन मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या दोघांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात गोवा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यात विद्यमान दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असून, नव्या दोघांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. विधानसभेचे सभापती रमेश तवडकर आणि काँग्रेसमधून पक्षांतर करुन भाजप प्रवेश केलेल्या माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
कामत आणि तवडकर यांना संधी देताना गेल्या वर्षीच मंत्रिपदाची माळ गळ्यात पडलेल्या पर्यावरण आणि बंदर खात्याचे मंत्री आलेक्स सिक्वेरा आणि मत्स्यउद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना मंत्रिमंडळातून नारळ मिळण्याची शक्यता आहे. आलेक्स सिक्वेरा यांचा काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आठ आमदारांमध्ये समावेश होता. गेल्या वर्षी तत्कालीन बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांचा तातडीने राजीनामा घेऊन आलेक्स यांना शपबद्ध करण्यात आले होते.
नीलेश काब्राल यांच्याकडे आसणारे बांधकाम खाते मुख्यमंत्री सावंत यांनी स्वत:कडे ठेवत आलेक्स सिक्वेरा यांना कायदा, पर्यावरण आणि बंदर खात्याची जबाबदारी दिली होती. पक्षांतर केलेल्या एका आमदाराला मंत्रीपद देण्याचे ठरले होते, त्यानंतर सिक्वेरा यांच्या मंत्रिपदाची घाई करण्यात आली. दरम्यान, सिक्वेरा यांना मंत्रीपद देऊन फार काळ झाला नसताना त्यांच्यावर मंत्रिपद सोडण्याची वेळ आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महाराष्ट्र सत्ता स्थापनेच्या विलंबाने गोवा मंत्रिमंडळा विस्तारालाही विलंब
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेला विलंब होत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदापासून लांब राहण्याचे संकेत दिल्यानंतर देखील महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि खाते वाटपाबाबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत खलबंत सुरु आहेत. महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते गुंतले आहेत त्यामुळे गोवा मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडतोय असा कयास बांधला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.