मडगाव: दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्याजागी अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस अधीक्षक टीकम सिंग यांची वर्णी लागली आहे. सावंत यांच्या अचानक बदलीच्या मागील विविध कारणे समोर येत आहेत. यात हिंदू संघटना बजरंग दलाबाबत देखील एक कारण समोर आले आहे.
सुनीता सावंत यांनी हिंदू संघटना बजरंग दलाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांची माहिती गोळा करुन त्यांच्याकडे जमा करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी सावंत यांच्या बदलीसाठी दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, एका वायरलेस मेसेजद्वारे सावंत यांना कार्यालय सोडण्याचे आदेश देण्यात आले, असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे.
सुनीता सावंत यांना कार्यालय सोडून पणजी पोलिस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. सावंत यांनी देखील वायरलेसद्वारे कार्यालय सोडल्याची माहिती दिली. सुनीता सावंत यांच्या बदलीमागे विविध तर्क लावले जात आहेत. यात त्या काही आमदारांना सहकार्य करत नसल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकपद आयपीएस दर्जाचे असल्याने ही बदली आवश्यक होती असेही कारण सांगण्यात येत आहे. दरम्यान, अधीक्षकांच्या बदलीचा आदेश राज्य सरकारच्या वतीने न काढता एका वायरलेस मेसेजद्वारे हा आदेश दिल्याने देखील प्रश्न उपस्थित होत आहेत.
बजरंग दल संघटना गेल्या काही काळापासून गोव्यात फारच सक्रिय झाली आहे. कळंगुट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन झालेल्या आंदोलनात दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच, मडगावात राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन देखील त्यांनी केले होते. तसेच, कुडचडे येथे तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंग यांच्या सहभागाने शौर्य यात्रा आयोजित करण्यात आली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.