South Goa  Dainik Gomantak
गोवा

South Goa : दक्षिणेत भाजपचा डंका; ‘रोड शो’नंतर कुंकळ्ळीतही गाजली सभा

South Goa : मडगावातील रोड शोमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह उमेदवार पल्लवी धेंपे, मडगावचे आमदार दिगंबर कामत, माजी आमदार दामू नाईक, माजी उपमुख्‍यमंत्री बाबू आजगावकर, नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर आणि अन्‍य नगरसेवकांनी भाग घेतला.

गोमन्तक डिजिटल टीम

South Goa :

सासष्टी, लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यास २४ तास बाकी असतानाच आज भाजपने दक्षिण गोव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मडगाव आणि फातोर्डा येथील ‘रोड शो’नंतर मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी उशिरा कुंकळ्ळीत सभा घेतली.

आजवर कुंकळ्ळीतील राजकीय सभेला एवढी गर्दी कधीच झाली नव्हती, असे जाणकारांचे म्हणणे होते. विशेष म्हणजे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा हा मतदारसंघ. गेल्या रविवारी कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची सभा कुंकळ्ळीत झाली होती. त्या सभेच्या किमान पाचपट गर्दी भाजपच्या सभेला होती, असे सांगण्यात आले.

मडगावातील रोड शोमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह उमेदवार पल्लवी धेंपे, मडगावचे आमदार दिगंबर कामत, माजी आमदार दामू नाईक, माजी उपमुख्‍यमंत्री बाबू आजगावकर, नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर आणि अन्‍य नगरसेवकांनी भाग घेतला. त्‍यानंतर फातोर्डा येथेही असाच दणदणीत रोड शो झाला.

कुंकळ्ळीतील सभेत माजी मंत्री आरेसियो डिसोझा, माजी आमदार क्लाफास डायस, दीपक खरंगटे, सुदेश भिसे, संतोष फळदेसाई यांची भाषणे झाली. व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंच, नगरसेवक व इतर नेते उपस्थित होते.

राम मनोहर लोहिया यांच्‍या पुतळ्‍याला पुष्‍पहार अर्पण करून रोड शाेला सुरवात झाली. नंतर मडगाव मार्केट परिसरात पल्‍लवी धेंपे यांनी पदयात्रा काढली. यावेळी कार्यकर्त्यांनी उत्‍स्‍फूर्तपणे घोषणा दिल्‍या. यात महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. ‘अबकी बार ४०० पार’ या घोषणेने मडगावचे रस्‍ते दणाणले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्यघटनेविरोधी विरियातो यांनी जे वक्‍तव्‍य केले होते, त्याचा धसका राहुल गांधी, प्रियांका वाड्रा यांनी घेतला आहे. विरोधी वक्‍तव्‍याची झळ बसणार, यामुळेच राहुल, प्रियांका यांच्यासह कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्‍यांनी गोव्‍याकडे पाठ फिरविली. कॉंग्रेसने राज्यघटनेचा जो अवमान केला, त्याचा त्रास त्यांना भोगावा लागणार आहे.

यावेळी मुख्‍यमंत्री सावंत म्हणाले, संविधानविरोधी पक्षाला लोक अजिबात थारा देणार नाहीत. यावेळी विक्रमी मतदान होणार असून भाजपचे दोन्‍ही उमेदवार आघाडीने जिंकून येतील. भाजपच्‍या गोव्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा झाल्या; पण काँग्रेसने गोव्याला कधीच गंभीरपणे घेतले नाही. दोन्ही मतदारसंघांत निभाव लागणार नाही, हे

लक्षात आल्यानेच काँग्रेसच्‍या स्टार प्रचारकांनी गोव्याकडे पाठ फिरविली, असे ते म्‍हणाले.

...हा स्‍वातंत्र्यसैनिकांचा अपमान

काँग्रेस उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी संविधानाचा अपमान करत देशाचा, तसेच स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला.

चंद्र, सूर्य असेपर्यंत हे संविधान राहील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाबाबत सर्वांना आदर आहे. त्यामुळे केवळ गोव्यातच नाही, तर देशभरात याचा परिणाम होईल. गोव्यात जास्तीत जास्त मतदान होईल व मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी जनता पुढे येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

संतोष फळदेसाई भाजपमध्ये दाखल

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले समाजसेवक तथा उद्योजक संतोष फळदेसाई यांनी कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी संतोष फळदेसाई यांच्या गळ्यात पक्षाचा शेला घालून तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

दक्षिण गोव्यातील प्रचारावेळी लोकांचा चांगला प्रतिसाद आणि प्रेम मिळाले. दक्षिण आणि उत्तर गोव्याची जागा भाजपच जिंकेल. राज्यात तसेच देशात भाजपने केलेल्या विकासकामांना लोक मतदान करतील आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, याची मला खात्री आहे.

- पल्लवी धेंपे, भाजप उमेदवार, द. गोवा मतदारसंघ.

दीपक पाऊस्करांचे पक्षात स्वागत :

सावर्डेचे माजी आमदार दीपक प्रभू पाऊस्कर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत प्रमुख कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. दीपक पाऊसकर हे चांगले व्यक्ती असून लोकांच्या कल्याणासाठी ते कार्यरत असतात.

काही कारणामुळे ते आमच्यापासून दूर गेले; पण आता त्यांनी भाजपला पूर्ण पाठिंबा देणार असल्याचे सांगून पक्षात प्रवेश केला असून त्यांचे आम्ही स्वागत करतो, असे डॉ. सावंत म्हणाले. आमदार गणेश गावकर आणि आपण मिळून सुमारे १५ हजार मतांची आघाडी भाजपला मिळवून देणार असल्याचे पाऊस्कर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT