Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: दक्षिणेत भावी खासदाराच्या चर्चेला रंग! 'खरी कुजबूज'

Goa BJP: लोकसभेच्या निवडणुकीला अजून वेळ असला, तरी दक्षिण गोव्यात भाजपचा खासदार निवडून येणार असे भाजपावाले छातीठोकपणे सांगायला लागले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa BJP: ‘शिताफुडें मीठ खावपाक जायना’ अशी कोकणीत एक म्हण आहे. लोकसभेच्या निवडणुकीला अजून वेळ असला, तरी दक्षिणेचा भावी खासदार कोण बनणार? यावर आतापासूनच चर्चेत रंग भरायला लागला आहे. यावेळी दक्षिण गोव्यात भाजपचा खासदार निवडून येणार असे भाजपावाले छातीठोकपणे सांगायला लागले आहेत.

आता भाजपचे उमेदवार नरेंद्र भाई, बाबू कवळेकर की दामू असणार हे केंद्रीय नेते ठरविणार असले, तरी फिल्डिंग लावणे सुरू झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस दक्षिण गोव्यात नवीन चेहरा देणार अशी चर्चा आहे. काँग्रेसचा खासदार उमेदवार व्हिरियातो असणार की एल्विस असणार? यावर शिक्कामोर्तब व्हायचे आहे. एक मात्र खरे दक्षिणेला नवीन खासदार मिळणार अशी चर्चा सध्या जोर धरू लागले आहे.

टॉवरांमुळे यंत्रणेची अडचण

दक्षिण गोव्याची व तेथील जनतेची खासियत म्हणजे उठसुठ कोणत्याही गोष्टीला विरोध करणे व त्यामुळेच गोवा स्वतंत्र होऊन साठ वर्षे उलटली, तरी या भागात अनेक पायाभूत प्रकल्प रखडून आहेत. संपर्कासाठी प्रभावी साधन म्हणून भ्रमणध्वनीचा उल्लेख केला जातो.

सर्वजण ते मान्य करतात, पण त्याच्या मनोऱ्यांना कडाडून विरोध करतात. त्यासाठी त्याद्वारे किरणोत्सर्जन होते असे कारण पुढे केले जाते. प्रत्यक्षात त्याला वैद्यकीय आधार नाही असे डॉक्टर मंडळी सांगते. सरकारने या समस्येवर तोडगा काढताना नवे टेलिकॉम धोरणही संमत केले.

आता विरोधक सरकारी इमारतीऐवजी दुसऱ्या ठिकाणी मनोरे उभारावेत असे म्हणू लागले आहेत. या एकंदर घोळात सरकारी यंत्रणेची कुचंबणा होऊ लागली आहे. त्याऐवजी मनोऱ्यांमुळे किरणोत्सर्जनाचा धोका नाही हे स्पष्ट का केले जात नाही अशी लोक चर्चा करू लागले आहेत.

त्यांच्या भांडणाची चर्चा

मडगाव पालिकेचा एक माजी नगरसेवक आणि एक माजी सोपो कंत्राटदार यांच्यात दोन दिवसांपूर्वी झालेले भांडण सध्या पालिका वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. वास्तविक हा सोपो कंत्राटदार पूर्वीपासून तसा वादग्रस्त. मात्र, मडगाव पालिकेच्या सोपोचे कंत्राट आपल्याला मिळावे यासाठीच म्हणे ते दोघे एकत्र आले होते.

त्यांचे पैशावरून भांडण झाल्याचे सांगितले जाते. कारण हा कंत्राटदार त्या माजी नगरसेवकाला आपले दोन लाख रुपये परत कर असे सांगताना कित्येकांनी ऐकले होते. आता त्यांच्यात झालेल्या या भांडणामुळे त्यांनी जी सोप्यासाठी युती केली होती, ती संपुष्टात आल्यात जमा आहे. त्यामुळे आता सोप्याच्या कंत्राटासाठी कोण पुढे येणार याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली आहे.

नक्की कुणाचा आशीर्वाद?

कळंगुटमध्ये कथितरित्या डान्स बार सुरू असल्याचे स्थानिक पंचायत व आमदारांकडून सांगितले जाते. मात्र, या डान्स बारना नक्की कोणाचा आशीर्वाद आहे? असा प्रश्न विचारला जातोय! एरवी पंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधी हे कुठल्याही बेकायदा गोष्टी सहज येऊन बंद करतात, मग हे डान्स बार कायमचे का बंद होत नाहीत! असा सवाल विचारला जातोय! फक्त आवाज आणि कारवाई शून्य असे काहीसे दिसते!

आता हे डान्स बार खरेच बंद केले जाणार आहेत की आपल्या कथित हप्त्याचा दर वाढविण्यासाठी हा सगळा खटाटोप आणि नाटकं आहेत का? असा सवाल आता स्थानिकच सध्या विचारताहेत! त्यामुळे गावांतील हे कथित डान्स बार खरोखर बंद होणार की ही फक्त कारवाईची धूळफेक आहे? हे येणाऱ्या काळात सर्वांना समजेलच!

गोविंदरावांची चांगली योजना, पण..!

राज्याचे कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे तसे एक उत्कृष्ट कलाकार. त्यामुळे कलाकारांच्याप्रती नेहमीच त्यांना सहानुभूती असल्याचे दिसले. कलाकारांसाठी त्यांनी अनेक योजनाही राबवल्या आहेत.

विशेष म्हणजे सरकारी खात्याच्या एखाद्या पुरस्कारासाठी कलाकारांना अर्ज करावा लागतो, माहिती द्यावी लागते, पण हे गैर असल्याचे गोविंदराव काल फोंड्यातील कलामंदिरच्या एका कार्यक्रमात स्पष्टपणे बोलले. कलाकाराने दुसऱ्याच्या पुढे हात करणे गैर आहे, असे सांगून बऱ्याचदा अनेकांच्या शिफारशीही येतात हेही त्यांनी सांगितले.

त्यामुळे हे टाळण्यासाठी राज्यातील सर्व कलाकारांची एक सूची तयार करून त्यात सर्व माहितीसह ही सूची सरकार दरबारी उपलब्ध करून त्यातीलच एखाद्या गुणी कलाकाराला पुरस्कार देण्याची योजना कला व संस्कृती खात्याने आखल्याचे गोविंदराव म्हणाले. योजना तशी चांगली आहे, स्तुत्य आहे, पण यातही माझे तुझे असे होता कामा नये, असे कलाकारांचे स्पष्ट मत आहे.

आता करमलघाटाकडे लक्ष द्या

मोपाचे मनोहर झाले, लोकोत्सवही थाटात पार पडला. आता तरी सवड काढून लोकप्रतिनिधींनी सर्व शक्ती पणाला लावून करमल घाटातील रस्त्यावर लक्ष केंद्रित करावी अशी मागणी काणकोणात जोर धरू लागली आहे. सरकारच्या मनात असेल, तर डबल इंजिन सरकारला काहीच कठीण नाही, फक्त इच्छाशक्तीचा अभाव आहे.

करमलघाटातील वळणावळणांच्या व अरुंद रस्त्याची चर्चा पुन्हा पुन्हा वळणे घेत सुरू झाली आहे. नेमेची येतो मग पावसाळा अशी म्हण आहे, परंतु यंदा अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे ही म्हणही सध्या कालबाह्य ठरू लागली आहे. मात्र, करमलघाट रस्त्याचा प्रश्न शाश्वत आहे, त्या प्रश्नाला पूर्णविराम केव्हा मिळेल याचीच सध्या चर्चा सुरू आहे.

त्यावेळीच सतर्कता का दाखविली नाही?

वास्को येथे आलेल्या अमेरिकन पर्यटकांना तेथील स्थानिक टॅक्सीवाल्यांनी दाखविलेली मुजोरी हा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर मुद्दा बनल्याने सर्व पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी वास्को शहराला भेट देऊन ही दादागिरी यापुढे खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम दिला आहे.

ही बाब इतर पर्यटकांना दिलासा देणारी असली तरी ज्यावेळी ही दादागिरी चालू होती, त्याचवेळी पोलिसांनी कारवाई का केली नाही हा प्रश्न मात्र अजून अनुत्तरित आहे. कारण ही दादागिरी चालू असताना तिथे एक पोलिस निरीक्षक हजर होता असे सांगण्यात येते. त्या निरीक्षकाने त्याचवेळी पावले उचलली असती, तर गोव्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर खराब झालेच नसते. या अशा निष्क्रिय पोलिसांवर कुणी कारवाई करणार का?

गोवा युवा महोत्सव कधी?

आलाबामा अथवा पेनसिल्वानिया विद्यापीठाची डॉक्टरेट असल्यासारखे उपदेश कोकणी वर्तुळातील काही “अडेचे” लोक इतरांना करत असतात. ग्रॅज्युएट असल्याच्या पदव्या तपासणार कोण? गगनभेदी आवाज करत होणारा गोवा युवा महोत्सव यंदाही नाही असं वाटतं.

कोविडनंतर गोव्यात महोत्सव, संमेलनं, कार्यक्रम यांची रेलचेल सुरळीतपणे सुरू झाली, पण इतर कार्यक्रमांचा फोग काढणाऱ्या मंडळींनी प्राप्त परिस्थितीत अजून तरी युवा महोत्सवाची घोषणा केलेली नाही. कोकणीचं एक बरं, अखिल भारतीय संगीत संमेलन, अखिल भारतीय कोकणी नाट्यसंमेलन ही प्रत्येकी दोनदा झाली.

नंतर विझली म्हणजे मान टाकली. त्या मानाने युवा महोत्सव युवा वृत्तीच्या नेत्यांमुळे तरला असे म्हटले जात होते. लग्नं जुळणं हाही एक चांगला साइड इफेक्ट या मंचाचा होताच. आलाबामा विद्यापीठात शिकून आल्यासारखं मिरवणाऱ्या काही जाकीटकारांनाही तो उत्सव खुणावत असतो. बघू, आठवड्याला एक पुस्तक प्रकाशित होतं तिथं कोकणीत काहीही होऊ शकतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT