sange
sangeDainik Gomantak

Goa Tourism: सांगे शहराचा कायापालट; 'या' गोष्टी असतील पर्यटकांसाठी खास आकर्षण

Goa Tourism: पर्यटकांसाठी आकर्षण : साळावली धरण, बॉटॅनिकल गार्डनमध्ये सुविधांना गती

Goa Tourism: सांगे शहराचा खऱ्या अर्थाने आर्थिक विकास होण्यासाठी पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या साळावली धरणाचा चेहरामोहरा बदलणे आवश्यक असून त्यादृष्टीने सरकारची पावले पडू लागली आहेत.

गत पंधरवड्यात समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि वन विकास महामंडळाच्या चेअरमन दिव्या राणे यांनी संयुक्तरित्या साळावली धरण आणि बॉटॅनिकल गार्डनला भेट दिली. या भेटीत अनेक विकासाभिमुख प्रकल्प सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

नजीकच्या काळात सर्व गोष्टी सत्यात उतरल्या तर सांगे शहराचा आर्थिक विकास कोणीच रोखू शकणार नाही. साळावलीच्या पायथ्याशी बॉटॅनिकल गार्डनमध्ये आज साधनसुविधा उभ्या राहू लागल्या आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कुटिरे उभी केली आहेत.

साळावली हे जरी पावसाळी डेस्टिनेशन केंद्र असले तरी त्याला जोडून असलेल्या बॉटॅनिकल गार्डनमुळे बारमाही पर्यटकांची वर्दळ सुरूच असते. आता पाहिल्यास साळावली धरणापेक्षा बॉटॅनिकल गार्डनचा विकास झपाट्याने होत आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा प्रकल्प आता हळू हळू मार्गी लागत आहे. वन विकास महामंडळाने गांभीर्याने या प्रकल्पाकडे लक्ष दिल्यास चांगला महसूल मिळू शकतो. कारण आज दर दिवशी किमान पंचवीस ते तीस बसगाड्या पिकनिकसाठी येतात.

प्रकल्प पाहिल्यास वृंदावन गार्डनसारखा आहे. पण आता तशा कोणत्याही योजना कार्यान्वित नसल्या तरी भविष्यात त्या साकारणे शक्य आहे. सायंकाळी त्यात आता रेजरलाईट शो सुरू केल्यास व सोबतीला उघड्या गार्डनमध्ये लहान सहान कार्यक्रम, वाढदिवस असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खास व्यासपीठ उपलब्ध केल्यास नक्कीच आर्थिक महसूल प्राप्त होऊ शकतो.

sange
Kerim-Sattari: चांगले संस्कार देणारे वाचन करा -राजेंद्र केरकर

साळावली ‘पर्यटन हब’ बनावे

गार्डनमधील लहान मुलांसाठी टॉय ट्रेन हे आकर्षण ठरणार आहे. त्यासोबतीला रंगीत कारंजे, रोप-वे ही अपूर्ण कामे मार्गी लावण्याचा विचार दिव्या राणे यांनी आपल्या सांगे भेटीत व्यक्त केला नाहे. सतत पाठपुरावा केल्यास नजीकच्या काळात साळावली पर्यटन हब म्हणून नावारूपाला येणार असल्याची आशा सांगेवासीय व्यक्त करत आहेत. दोन्ही ठिकाणे पर्यटन स्थळे म्हणून विकसित केल्यानंतर सांगेतील इतर पर्यटनस्थळांना चांगले दिवस येतील.

गर्दी खेचणारे प्रकल्प

सांगे शहरात गर्दी खेचणारे साळावली धरण आणि बॉटॅनिकल गार्डन हे प्रकल्प आहेत. गार्डनमध्ये सुविधा उभारल्यास व त्याच तोडीला साळावली धरणावर पर्यटन कुटिरे सुरू केल्यास आणखी रोजगार संधी उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुट्टी घालविण्यासाठी चांगले ठिकाण म्हणून साळावलीकडे लोक पाहात होते. तीच वेळ पुन्हा यावी, असा प्रयत्न सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com