Smriti Irani : सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजत असलेल्या आसगाव येथील सिली सोल्स कॅफे अँड बार रेस्टॉरंटबाबत काँग्रेसने आज बुधवारी नवे पुरावे सादर केले. काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेवर आक्रमक होत केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यावर कोर्टाने काँग्रेस नेत्यांना फटकारले होते. मात्र, आता काँग्रेसने सादर केलेले नवे पुरावे इराणी यांना अडचणीत आणू शकतात.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पणजीत पत्रकार परिषद घेऊन स्मृती इराणी यांच्या कथित ‘सिली सोल्स’ रेस्टॉरंटबाबत अनेक पुरावे माध्यमांसमोर मांडले. ‘या कागदपत्रांद्वारे प्रथमदर्शनी सदर हॉटेल इराणी यांच्या कुटुंबीयांकडून चालवले जाते असे स्पष्ट होते. कारण मंत्री इराणी यांनी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला शपथपत्र सादर करताना दिलेली माहिती हे स्पष्ट करते की त्यांच्या कुटुंबीयांकडून चालवलेल्या कंपन्यांचे पत्ते हे गोव्यातील ‘सिली सोल्स’ पत्त्यावरचे आहेत. या शिवाय जीएसटीला सादर केलेला पत्ताही तोच आहे. यावरून ‘सिली सोल्स’ हे इराणी कुटुंबीयाचेच आहे हे सिद्ध होते’ असे चोडणकर पत्रपरिषदेत म्हणाले.
काँग्रेस नेत्यांची आक्रमक भूमिका तर भाजप बॅकफूटवर
गोव्यातील हॉटेलबाबत देशपातळीवर चर्चा होत आहे. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर काँग्रेसने ‘सिली सोल्स’ प्रकरणात आक्रमक भूमिका घेत मुद्दा लावून धरला आहे. युवक आणि महिला कार्यकर्त्यांनी हॉटेलसमोर आंदोलन केले. मात्र, मुख्यमंत्र्यांसह राज्यातील भाजप नेते यावर मौन बाळगून आहेत. ‘सिली सोल्स’ प्रकरणात राज्यातील भाजप बॅकफूटवर गेल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.
इराणी या ‘पॅथेटिक लायर’
चोडणकर यांनी यावेळी इराणी या दांभिक आणि रेटून खोटे बोलणाऱ्या म्हणजेच पॅथेटिक लायर आहेत, असा उल्लेख वारंवार केला. इराणी या सुरवातीपासून खोटे बोलण्यात तरबेज आहेत. या प्रकरणात स्वतःच्या मुलीचा समावेश असूनही, त्या आत्मविश्वासाने खोटे बोलतात असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्री सावंत गप्प का?
इराणींच्या कुटुंबियांविरोधात पुरावे उघड करूनही मुख्यमंत्री सावंत यांनी एक शब्दही काढलेला नाही. अबकारी परवाना नूतनीकरण करण्यासाठी सर्वसामान्याची फरफट केली जाते. पण एका मृत व्यक्तीच्या नावाने परवाना कसा देण्यात आला, यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी चोडणकर यांनी केली.
चोडणकर यांनी दिलेले पुरावे कोणते?
1 स्मृती इराणी यांचे पती झुबिन, मुलगी झोईश, मुलगा झोहर आणि झुबिन यांची मुलगी शानेल इराणी यांच्याकडे दोन कंपन्या आहेत.
2 उग्रया मर्कंटाइल प्रायव्हेट लिमिटेड व उग्रया ॲग्रो फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांची एट ऑल फुड अँड बेव्हरेजेस एलएलपीत गुंतवणूक आहे.
3 एट ऑल फुड अँड बेव्हरेजेस एलएलपी व दोन्ही कंपन्यांचा पत्ता जीएसटी विभागाला दिला असून तो पत्ता ‘सिली सोल्स’चाच आहे.
4 आयोगच्या शपथपत्रात स्मृती यांनी दोन्ही कंपन्याचा पत्ता व प्राप्तिकर विभागाला दिलेल्या आयकर देयचा पत्ता हा ‘सिली सोल्स’चा आहे.
5 अबकारी खात्याचा बारसाठी घेतलेला परवाना हा ‘सिली सोल्स’ या पत्त्यावरचा असून तो मृत व्यक्तीच्या नावाचा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.