वाळपई : वाळपई मतदारसंघात एकमेव असलेल्या वाळपई सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाची दयनीय अवस्था झाली असून गुरुवारी विद्यालयाचा एका ठिकाणी असलेल्या स्लँबचा तुकडाच कोसळला. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यालयात मुले शिकवणी घेत असतानाच ही घटना घडली आहे. त्यामुळे विद्यालयाची इमारत धोक्याची घटका मोजत असल्याचे सिद्ध झाले आहे.
‘गोमन्तक ’ने इमारतीच्या समस्येविषयी यापूर्वी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. तरीही वेळीच संबंधित यंत्रणेने लक्ष न दिल्याने विद्यालयाच्या इमारतीला धोका पोहोचला आहे. उच्च माध्यमिक ही शाळा ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत जवळचे असे विद्यालय वाळपईत स्थित आहे. पण, सध्याच्या घडीला इमारतीची परिस्थिती पहाता ती केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. भविष्यात विद्यार्थ्यांच्या जीवावरही बेतू शकते, अशी भीती विद्यालयाच्या पालक संघटनेने व्यक्त केली आहे.
विद्यालयाचा हॉर्टिकल्चर विभागाच्या वेगळ्या बाजूला स्वतंत्र वर्ग आहे. तो अगदी कोसळण्याच्या स्थितीत आहे. छपर नळांचे असल्याने पावसात अधून-मधून पाणी झिरपते. एखादा अगदी जुनाट वाडा किंवा एखादा गोदाम असावा असेच काही बाहेरून वर्गाची पहाणी केल्यावर भासून येते. शौचालयांची चांगली स्थिती नाही.
दुरुस्ती प्रस्तावाची फाईल खितपत
विद्यालयाची तत्काळ दुरुस्ती करावी या हेतूने एक दोन वर्षाअगोदर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारत विभागात नवीन दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविला होता. पण, अजूनही सरकारने विचार केलेला नाही. दुरुस्ती प्रस्तावाची फाईलही शासन दरबारी खितपत आहे. सरकारला आता तरी जाग येऊन दुरुस्ती करेल काय? असा प्रश्ना पालकांनी उपस्थित केला आहे.
इमारत 36 वर्षांची, देखभालीकडे दुर्लक्ष
विद्यालयाच्या इमारतीला अगदी उतरती कळा लागली आहे. त्यामुळे वर्गात बसून अकरावी, बारावीचे शिक्षण घेणे विद्यार्थांसाठी अगदी धोकादायक ठरत आहे, असे पालक-शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे. 14 ऑगष्ट 1986 साली विद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते करण्यात आले होते. आज इमारतीला 36 वर्षे होत आली आहेत. तरीही देखभाल करण्यात न आल्याने सध्याच्या घडीला वर्गात पावसाचे पाणी झिरपत आहे, असे पालकांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत
गुरुवारी सकाळी बारावी वाणिज्य शाखेत हिंदी विषयाचा वर्ग सुरू असताना नऊच्या सुमारास विद्यार्थी अमेय सांगेलकर व श्रीकांत गावस यांच्या अंगावर छपरावरील स्लॅबचा तुकडा अंगावर पडला. त्यामुळे अमेय याचा पाठीला किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच त्याचा बाजूला बसलेला श्रीकांत या विद्यार्थ्याला थोडेफार लागले आहे. स्लॅबचा तुकडा अचानक अंगावर पडल्याने सर्व मुले भयभीत झाली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.