अधिवेशनादरम्यान विरोधक आमदार आले सभापतींच्या हौदात
पणजी : गोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. एकीकडे काँग्रेस आमदारांचं बंड शमतं ना शमतो तोच सर्वच विरोधी आमदारांनी मंत्र्यांकडून प्रश्नांची उत्तरं मिळत नसल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर हे सर्व आमदार विधानसभा सभापतींच्या हौदातही उतरले. त्यामुळे विधानसभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. युरी आलेमाव, संकल्प आमोणकर यांच्यासह विजय सरदेसाई आज विधानसभेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
दरम्यान एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज गोवा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या नियोजित दौऱ्यामुळे विधानसभा सभापतींकडून अधिवेशनाचं कामकाज 1 तास अगोदरच स्थगित करण्यात आलं. यावरुनही विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अधिवेशन वेळेपूर्वी स्थगित करणं हा लोकशाहीचा किंबहुना गोमंतकीयांचा अपमान असल्याचा निशाणा काँग्रेस आमदार संकल्प आमोणकर यांनी केला आहे. त्यामुळे विधानसभेत विरोधकांची आपल्या विरोधाची धार आणखी तीव्र केल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.
दरम्यान गोवा सरकारकडे कुंकळ्ळी लढा स्मृतीदिनाच्या पत्रिका छापण्यास पैसे नाहीत. पत्रिकेत आमदार आणि नगराध्यक्षांचा उल्लेख नाही. हा कुंकळ्ळीवासियांचा अपमान असल्याची घणाघाती टीका युरी आलेमाव यांनी केली आहे.
दुसरीकडे ओल्ड गोव्यातील वादग्रस्त बंगल्याच्या प्रकरणाबाबत उच्च न्यायालय आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून सुनावण्या सुरु आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार योग्य तो निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलं आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.