Goa Congress
Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Mormugao News : मुरगाव तालुक्यात काँग्रेस पक्षाला ‘अच्छे दिन’ येण्‍याचे संकेत; निवडणुकीत चांगली कामगिरी

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

Mormugao News :

फोंडा, लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात आघाडी मिळवण्याच्या दृष्टीने फोंड्यानंतर भाजप मुरगाव तालुक्यावर विसंबून होता. या तालुक्यातून भाजपला कमीत कमी दहा ते बारा हजारांची आघाडी मिळेल अशी अपेक्षा ते बाळगून होते.

पण ती अपेक्षा फोल ठरली. या तालुक्‍यातून भाजपला केवळ साडेचार हजार मतांची आघाडी मिळाली.

मुरगाव तालुक्यात वास्को, मुरगाव, दाबोळी व कुठ्ठाळी असे चार मतदारसंघ येतात. यापैकी तीन मतदारसंघांत भाजपचे आमदार असल्यामुळे तसेच कुठ्ठाळीचे अपक्ष आमदार आंतोनियो वाझ यांचा भाजप सरकारला पाठिंबा असल्यामुळे या तालुक्यातून भरीव आघाडी मिळेल असे सर्वांना वाटत होते.

त्यातच गेल्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे रिंगणात उतरलेले कार्लुस आल्मेदा हे भाजपच्या छावणीत परत आल्यामुळे या पक्षाचे वजन वाढल्यासारखे वाटत होते. पण हे वाटणे फसवे ठरले आणि भाजपला या चार मतदारसंघांत फक्त साडेचार हजार मतांची आघाडी मिळाली.

वास्को मतदारसंघात भाजपचे दाजी साळकर आमदार असल्यामुळे तसेच माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी ‘घरवापसी’ केल्यामुळे तेथे काँग्रेसला कोणीच वाली दिसत नव्हता. असे असूनसुद्धा या पक्षाला १०,५२३ मते मिळाली आणि १३,१५४ मते प्राप्त केलेल्या भाजपला फक्त २६३१ मतांच्‍या आघाडीवर समाधान मानावे लागले.

मुरगाव मतदारसंघात मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे संकल्प आमोणकर यांना ९०६७ तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे मिलिंद नाईक यांना ७१२६ मते मिळाली होती. आता आमोणकर भाजपमध्ये आल्यामुळे या दोघांच्या मतांची बेरीज केल्यास ती जवळजवळ १६,००० भरते. पण प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात भाजपला मते पडली ८२६९ आणि आघाडी २००० एवढीच सीमित राहिली. त्यामुळे आमोणकरांचा भाजपला विशेष फायदा झाला आहे असे दिसले नाही.

दाबोळीत मंत्री माविन गुदिन्हो हेसुद्धा विशेष करिष्मा दाखवू शकले नाहीत. त्यांच्या मतदारसंघात भाजपला आघाडी मिळाली फक्त २७२४ मतांची. कुठ्ठाळीत तर काँग्रेस पक्ष बाजी मारून गेला. तेथे गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार आंतोनियो वाझ यांना मिळाली होती ५५२२ मते तर काँग्रेसला प्राप्त झाली होती ४३४४ मते. पण यावेळी आमदारासह अनेक रथी-महारथी भाजपच्या दिमतीला असूनही मते मिळाली ९४५४. उलट काँग्रेसने १२,३७७ मतांवर झेप घेतली.

आमोणकर, वाझ यांचे भवितव्‍य टांगणीला

कुठ्ठाळी मतदारसंघात काँग्रेसला मिळालेली ३००० मतांची आघाडी भाजपला मिळालेल्या ७४१९ मतांतून वजा केल्यास मुरगाव तालुक्यातील भाजपची आघाडी फक्त साडेचार हजार मतांपर्यंतच मर्यादित राहते आणि त्यातून संकल्प आमोणकर तसेच आंतोनियो वाझ यांचे भवितव्य टांगणीला लागले असल्याचे संकेत मिळत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shirgao Panchayat: शिरगाव पंचायतीत सत्ताबदल अटळ; सरपंच, उपसरपंचांविरुद्धचा अविश्वास ठराव संमत

Margao: कामतांचे हेतुपुरस्‍सर दुर्लक्ष, मुद्दाम कामे अडवतात; मडगावात कुरतरकर बहीण- भावाचा भाजपला रामराम

Pakistan Car Blast: पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तान सीमेजवळ मोठा कार स्फोट; माजी खासदारासह 4 जण जागीच ठार

Goa Todays Live Update: सरदेसाईंच्या मडगावातील जनता दरबारला मोठा प्रतिसाद!

NEET Exam: गोव्यातील चार हजार विद्यार्थ्यांवर अन्याय, ‘नीट’ परीक्षा पुन्हा घेण्याची NSUI ची मागणी

SCROLL FOR NEXT