आसावरी कुलकर्णी
पर्पल फेस्टिवल मोठ्या उत्साहात सुरु झालंय. विशेष मुलांना व्यासपीठ देणार अश्या प्रकारचं हे पहिलच संमेलन आहे. मात्र या संमेलनात प्रसिद्ध गायक श्री शंकर महादेवन यांनी केलेल्या वक्तव्यावरून थोडस वेगळ्या विषयाकडे लक्ष वेधलं गेलंय. मनशांती मिळविण्यासाठी देशात पहिलं नाव येत ते गोव्याच. इथं येणं मला खूप आवडतं अस म्हणतांनाच, गोव्यात संगीत शिकण्यासाठी पुरेश्या साधन सुविधा नाहीत आणि गोवा हे संगीत शिकण्यासाठीचे आंतरराष्ट्रीय स्थान बनलं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलं.
अर्थात त्यातला सूर तसा अगदीच नकारात्मक नसून, फक्त सुचनात्मक होता असंही दिसत. पण ज्या भूमीत घराघरातून संगीतच आहे अश्या ठिकाणी येऊन काहीसं अनभिज्ञ अस वक्तव्य करणं हे काहीसं खटकणार होत. पर्यटक म्हणून गोव्यात येणारे असे अतिमहानिय सेलेब्रिटी गोव्याचा फक्त 10 टक्के भाग बघतात आणि स्वतःला हवं ते आणि हवं तसं गोव्याला मांडतात हा अनुभव जुना आहे. (Shankar Mahadevan Statement on Music in Goa)
महादेवन यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया म्हणून नव्हे तर या निमित्ताने गोव्यातील संगीत क्षेत्रातील सुविधा आणि संधी यावर चर्चा किंवा संवाद करावासा वाटला. गोव्याच्या संगीताला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या आणि संगीता साठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या दिगग्ज कलाकारांशी आम्ही संवाद साधला
या संवादाचा मूळ विषय महादेवन यांच्या वक्तव्यावरूनच सुरू झाला ज्यावरती संवादात सहभागी सगळ्याच कलाकारांनी थोडी नाराजी व्यक्त केली. अर्थात त्यांचे हे वैयक्तिक मत असून, ते एक चांगले कलाकार आहेत पण त्यांना कदाचित गोव्याच्या संगीत क्षेत्राबद्दल माहिती नसावी, आयोजकांनी किंवा त्यांच्या जवळच्या माणसांनी त्यांना ती दिली नसावी अस सगळ्यांनीच व्यक्त केलं.
स्वतःचा डेस्टिनी म्युसिक अकडेमी असलेले श्री पेटरिसन आंद्रद म्हणाले की या वक्तव्याला मी एक कलाकार म्हणून सकारत्मक पद्धतीने घेईन. पूर्वी बॉली वुड मध्ये वेस्टर्न संगीत देणारे किंवा वादक हे गोव्यातलेच होते. माझे विद्यार्थी आंतराष्ट्रीय स्तरावर जाऊनही कार्यक्रम सादर करतात. पण हल्ली मूल फक्त छंद वर्ग म्हणून संगीता कडे बघतात, मुख्य उपजीविका म्हणून संगीत शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल नसतो.
गोव्यात सुविधा नाही असं नाही, पण संगीत हे करिअर म्हणून निवडण्यासाठी लागणार ग्लॅमर कदाचित गोव्यात नाहीत. गोवा संगीत महाविद्यालया मध्ये वेस्टर्न संगीत फक्त छंद वर्ग म्हणून शिकवले जातात. एखादी मोठी संस्था किंवा कॉलेज येणं गरजेचं आहे, सरकारने तसा प्रयत्न केला पाहिजे असं ते म्हणाले.
जेष्ठ शास्त्रीय गायिका प्रचला ताई आमोणकर म्हणाल्या एखाद्या विद्यार्थ्याला संगोत शिकण्यासाठी आवश्यक सगळ्या सुविधा गोव्यात आहेत. कलाअकडेमी , बालभवन, संगीत महाविद्यालय असोत किंवा खाजगी संगीत संस्था असोत शिकणाऱ्या मुलांना सुविधांची ही कमी नाही. पण मुंबई पुण्यात संगीत शिकल्यानंतर मिळणार वलय इथे मिळत नसल्यामुळे काही मुलं तिथे जाऊन शिकतात. गोव्यात कार्यक्रम आयोजित करणारे आयोजक गोव्यातल्या कलाकारापेक्षा या वलय असलेल्या कलाकारांना बोलावणं पसंत करतात त्यामुळेच मूल बाहेर जातात अस त्या म्हणाल्या.गोवा सरकारने सुविधाच नव्हे तर नोकरीच्या संधीही उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे हे वक्तव्य चुकीचे आहे असं त्या म्हणाल्या. इतर राज्यातून कितीतरी मूल आपल्या कडे शिकून महादेवन यांच्याच अकडेमित किंवा इतर संस्थेत शिक्षक म्हणून काम करतात अस त्या आवर्जून म्हणाल्या.
दीपा मिरिंगकर या अश्याच संगीत प्रेमी. त्यांचा मुलगा पुणे इथे संगीत शिकतो. त्या म्हणाल्या की गोव्यात संगीत शिकण्यासाठीच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. शिकण्यासाठी लागणारी चिकाटी आणि आवड असणाऱ्या मुलांना सर्व संधी उपलब्ध आहेत.
स्वतः आयटी इंजिनियर असलेले पण संगीतासाठी जीवन वाहून घेतलेले श्री नितिन ढवळीकर म्हणाले की सुविधा सगळ्या आहेत, पण गुण ग्राहकतेची उणीव आहे. राज्याबाहेरच्या तज्ञ शिक्षकांना आणून तश्या प्रकारचे वातावरण तयार करणे खरतर सरकारला शक्य आहे. पण सरकार या बाबतीत हात आखडता घेतात, त्यामुळे सुविधा आहेत पण अजूनही बरच काही करता येण्याजोग आहे असं ते म्हणाले.
प्रसिद्द अकॅम्पनिस्ट आणि लेखक श्री दीपक मणेरीकर म्हणाले काही अंशी महादेवन यांचं वक्तव्य बरोबर आहे, कारण संगीत म्हणजे फक्त एक खोली, पेटी तबला आणि शिक्षक एवढेच नसून, आपण जेव्हा मोठमोठ्या शहरात जातो तेव्हा आपल्याकडे असलेल्या उणिवा लक्षात यायला लागतात. संगीत साथ करणारे अकॅम्पनिस्ट , सतार वादक, असे तांत्रिक लोक उपलब्ध नाहीयेत. शास्त्रीय संगीत विद्यार्थी शिकतात त्याबद्दल काही प्रश्न नाही पण मोठं मोठ्या कन्सर्ट साठी लागणारे तांत्रिक साथीदार निर्माण करण्याची सोय गोव्यात नाहीत
अरविंद सायनेकर हेही असे एक पालक ज्यांची दोन्ही मूल संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. ते म्हणाले की काही अंशी हे खरं आहे की उचच शिक्षण घेण्याची सोया, किंवा तश्या सुविधा गोव्यात उपलब्ध नाहीत.मुळात कला अकादमीची पदवी बाहेर ग्राह्य धरली जात नाही, त्यामुळे गांधर्व महाविद्यालाय किंवा अश्या इतर मोठ्या विद्यापीठाशी संलग्नता करणे गरजेचे आहे, संगीतात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना याच कारणा मुळे बाहेर गावी जावं लागत अस ते म्हणाले.
काही विद्यार्थ्यांशी बोलल्या नंतर त्यांचाही सूर होता की गोव्यात सुविधा आहेत, शिक्षण घेता येत पण त्यांनतर करिअर म्हणून करण्यासाठी बाहेर गावी जावं लागत. कला अकादमी चे वर्ग कोव्हिडं काळानंतर विस्कळीत झाल्या सारखे झाले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्या मध्ये नाराजी आहे. तांत्रिक गोष्टी शिकण्यासाठी बाहेर जावं लागत असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी संगीत हे करिअर म्हणून निवडायला जात नाहीत असं त्यांचं मत आहे.
गोव्यातले आघाडीचे संगीतकार आणि शास्त्रीय गायक श्री प्रवीण गावकरजी म्हणाले की असे वक्तव्य करण्यामागे नेमकं काय कारण आहे ते कळल नाही. कारण गोव्यात संगीत शिकण्यासाठीच्या सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत. पन्नास हुन जास्त संगीत संमेलन होतात, नृत्य, संगीत, संमेलने संगीत कलेचा प्रचार करत आहेत.पारंपरिक भजन कला किंवा घुमट वादन इत्यादी कलेकडे तरुण वर्ग पुन्हा एकदा वळतो आहे. गरज आहे ती सरकारने अर्थपूर्ण नियोजन होणे गरजेचे आहे. या क्षेत्रात असलेली आर्थिक तरतूद वाढविणे गरजेचे आहे. जेष्ठ कलाकारांच्या निवस्थानाचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
प्रसिद्ध संगीतकार मुकेश घटवळ म्हणाले की हे वक्तव्य करण्याआधी महादेवन यांनी पुरेसा अभ्यास करण गरजेचं आहे. गोव्यात संगीत शिकण्यासाठीच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कला अकादमी, रवींद्र भवन, प्रत्येक शाळेतील संगीत शिक्षक, खाजगी वर्ग, तसेच चर्च मधूनही संगीताचे शिक्षण दिले जाते. अद्यावत असे स्टुडिओ सुद्धा आता उपलब्ध होत आहेत. गोव्यातील विदयार्थी मुंबईला जात असतील कारण तेथे मिळणारी प्रसिद्धी आणि पैसा मात्र गोव्यात नाही. गोवा हे छोटेसे राज्य असल्या मुळे एखाद्या व्यक्तीस प्रसिद्ध होण्यासाठी मर्यादित क्षेत्र उपलब्ध आहे.तेच मोठ्या शहरात गेल्यानंतर बॉली वुड आणि इतर व्यासपीठ उपलब्ध आहेत. कितीतरी विदेशी विद्यार्थी गोव्यात येऊन शिक्षण घेताहेत हे कदाचित महादेवन याना माहीत नसावे असे ते म्हणाले. हल्लीच प्राची जठार यांना महाराष्ट्रात पुरस्कार मिळाला. दक्षिण गोव्यातल्या एका विद्यार्थिनीला व्हायोलिन वाजविण्यासाठी, आंतरराष्ट्रीय कार्यक्रमत बोलविण्यात आले.त्यामुळे सुविधा आहेत परीघ वाढण्याची गरज आहे असं ते पुढे म्हणाले.
एकूणच गोव्याला आपले दुसरे घर म्हणणाऱ्या या सेलेब्रिटी कलाकारांना गोवा कळलाच नाही, असे असले तरी सुविधा आहेत पण अजून काहीतरी करण्याची गरज आहे असाच सूर संगीत क्षेत्रातून उमटलेला दिसला. गोव्याच्या कणा कणात वसलेल्या संगीताला मना मनात नेण्यासाठी थोडा है थोडे की जरूरत है असच म्हणावं लागेल...
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.