Goa Crime News
Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: वडिलांकडूनच आठ बालिकांचा लैंगिक छळ

दैनिक गोमन्तक

सुशांत कुंकळ्येकर

Goa Crime News: अविश्वसनीय वाटले तरी गोव्‍यातील पोलिस दफ्‍तरातून मिळालेल्‍या माहितीनुसार, गोव्‍यात मागच्‍या साडेदहा महिन्‍यांत किमान आठ बालिकांवर त्‍यांच्‍या वडिलांकडूनच लैंगिक अत्‍याचार घडण्‍याच्‍या घटना घडल्‍या असून सुसंस्‍कृत गोव्‍यासाठी ही धक्‍कादायक बाब आहे.

गोव्‍यात जवळच्‍या माणसांकडून बालकांवर लैंगिक अत्‍याचार होण्‍याच्‍या घटना वाढत असून घरच्‍या माणसांबरोबरच शाळांतील शिक्षकांचाही त्‍यात समावेश आहे. एवढेच नव्‍हे, तर ज्‍या पोलिसांकडून या बालकांचे रक्षण होणे अपेक्षित आहे ते पोलिसही अल्‍पवयीन मुलांवर लैंगिक अत्‍याचार करण्‍यास मागे राहिलेले नाहीत.

18 नोव्‍हेंबर हा दिवस संपूर्ण जगात ‘जागतिक बाल लैंगिक शोषण प्रतिबंध आणि उपचारदिन’ म्‍हणून पाळत असताना गोव्‍यातील हे विदारक चित्र पुढे आले आहे. 1 जानेवारी ते 15 नोव्‍हेंबर या साडेदहा महिन्‍यांच्‍या कालावधीत गोव्‍यात अल्‍पवयीन बालकांवर लैंगिक अत्‍याचार होण्‍याच्‍या 85 घटनांची नोंद झाली असून त्‍यातील आठ घटनांत वडिलांनीच आपल्‍या मुलींवर अत्‍याचार केल्‍याचे उघडकीस आले आहे.

तीन प्रकरणात शिक्षकांनी विद्यार्थिनींवर अत्‍याचार केल्‍याची नोंद पोलिस दफ्‍तरी आहे, तर एका प्रकरणात अल्‍पवयीन मुलीवर झालेल्‍या बलात्‍कारात एका पोलिसाचाच हात असल्‍याचे उघड झाले आहे.

गोवा बाल अधिकार आयोगाचे अध्‍यक्ष पीटर बॉर्जिस यांनीही याबाबत चिंता व्‍यक्‍त केली आहे. गोव्‍यात इन्‍सेस्‍ट (जवळच्‍या माणसांकडून) अत्‍याचाराच्‍या तसेच शाळेत होणाऱ्या लैंगिक अत्‍याचाराच्‍या घटना वाढल्‍या असून ही चिंतेची बाब आहे.

याची दखल बाल अधिकार आयोगाने घेतलेली असून हे प्रकार कसे थांबविता येतील यासाठी सरकारी यंत्रणा, कायदा व सुव्‍यवस्‍था सांभाळणारी यंत्रणा, शाळा व्‍यवस्‍थापने आणि सामाजिक संस्‍था यांच्‍यात संवाद सुरू केला आहे. शाळांत होणारे विद्यार्थ्यांवरील अत्‍याचार बंद व्‍हावेत यासाठी सर्व शिक्षकांना याबाबतीत संवेदनशील बनण्‍यासाठी कार्यक्रम आखला असून आत्तापर्यंत मुलींच्या स्‍वसंरक्षणासाठी चार हजार शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे. पॉक्‍सो प्रकरणे कशी हाताळावीत यासाठी सहाशेपेक्षा अधिक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे, अशी माहिती त्‍यांनी दिली.

1 जानेवारी ते 15 नोव्‍हेंबर 2023 या कालावधीत लहान मुलांवर जे लैंगिक अत्‍याचार झाले आहेत ते पाहिल्‍यास प्रत्‍येक तिसऱ्या दिवशी गोव्‍यात एका मुलावर लैंगिक अत्‍याचार होत असल्‍याचे उघड झाले असून आत्तापर्यंत अल्‍पवयीन मुलांवर जे अत्‍याचार झाले आहेत त्‍यात ३५ प्रकरणे बलात्‍काराची असून २५ प्रकरणे अपहरणाची आहेत. एकूण २३ अल्‍पवयीन मुलींचा विनयभंग करण्‍यात आला असून दोन प्रकरणात लहान मुलांवर समलिंगी लैंगिक अत्‍याचार करण्‍यात आल्‍याचे उघड झाले आहे.

गोव्‍यातील ही स्‍थिती पाहिल्‍यास गोवा कुठल्‍या दिशेने जातो आणि गोव्‍यात सामाजिक नीतिमत्ता ही शाश्वत आहे का? असे विचारण्‍याची वेळ आली आहे, असे मत बाल समुपदेशन कार्यात मोलाचे काम केलेल्‍या बायलांचो एकवोट या संघटनेच्‍या निमंत्रक आवडा व्‍हिएगस यांनी व्‍यक्‍त केले. पालक, शिक्षक आणि पोलिस या तिघांकडेही लहान मुलांचे रक्षक म्‍हणून पाहिले जाते. त्‍यांच्‍याकडूनच जर असे अत्‍याचार होत असतील, तर ते का होत आहेत आणि ते कसे थांबविता येणे शक्‍य आहे यावर गंभीरतेने विचार करण्‍याची गरज त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

महिला व बाल तस्‍करी क्षेत्रात पुनर्वसनाचे काम करणाऱ्या ‘अर्ज’ या संघटनेचे अध्‍यक्ष अरुण पांडे यांनी जवळच्‍या नातेवाइकांकडून आणि विशेषत: वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक अत्‍याचारामागे दारूच्‍या व्‍यसनाचा संबंध आहे का यावर सखोल अभ्‍यास व्‍हायला पाहिजे. असा अभ्‍यास झाला तरच या समस्‍येवर तोडगा काय हे ठरविता येणे शक्‍य आहे, असे मत व्‍यक्‍त केले.

15 ते 16 वर्षांच्‍या मुलींना सर्वांत आधी वेश्या व्यवसायात आणले जाते. मात्र, देशात पॉक्‍सो कायदा आल्‍यानंतर अशा मुलींना सरळ या व्‍यवसायात न आणता त्‍यांना कुठेतरी दडवून ठेवून खास ग्राहकांना पुरविले जाते. गोव्‍यात असे प्रकार आहेत की नाही हे कळणे कठीण आहे. कारण आत्तापर्यंत ज्‍या युवतींची या व्‍यवसायातून सुटका करण्‍यात आली आहे, त्‍यात एकही अल्‍पवयीन मुलगी सापडलेली नाही. - अरुण पांडे, अध्‍यक्ष, अर्ज

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT