मुलींनी ठरवलं तर त्या काहीही करू शकतात. फक्त त्यांना चांगला पाठिंबा मिळायला हवा. म्हणून तर गीता बबीता फुगाट ज्यांना वडिलांनी लहानपणापासूनच मुलांसारखे वाढवले व त्यांना ट्रेनिंग देऊन घडवले. लोक काय म्हणतील याचा विचार नाही केला. ज्या राज्यात मुलींना खालचा दर्जा दिला जातो त्या राज्यात गीता बबीता फुगाट यांना वडील घडवतात. तसंच काहीसं माझं झालं. मी सीमा रामनाथकर. माझं बालपण हे मातृछाया ढवळी येथे गेले. साधारण मी पाचवीत असताना तबला वाजवण्यास शिकले. मी दहावीपर्यंतच शिक्षण लोकमान्य टिळक कवळे येथे घेतलं.
त्यानंतर आपल्या पायावर उभे राहायचे म्हणून मी एका मैत्रिणीच्या घरी तिच्या मुलाला सांभाळण्यासाठी राहत होते. तिचा मुलगा मोठा झाल्यावर मी डॉक्टर अनिता तिळवे,ज्या पूर्वी मातृछायेत सभासद होत्या, त्यांना फोन करून विचारले की मला कुठे घरी काम करण्यास आहे का?मग त्यांनी मला त्यांच्याच घरी त्यांची आई नाशिकहून आली होती तिच्यासोबत राहण्यास बोलावून घेतले.
मला आधीपासूनच गाडी चालवण्याची खूप आवड होती. मातृछायेत असतानाच मी स्कूटर चालवायला शिकले होते.पिंक रिक्षाची कन्सेप्ट आली तेव्हा रोटरी क्लबने मुलींना व बायकांना पिंक रिक्षा घेऊन द्यायचे ठरवले. त्याच वेळेस ताईंचे मिस्टर डॉक्टर संतोष तिळवे, यांना मी बाबा म्हणते रोटरी क्लबचे प्रेसिडेंट होते, त्यांनी मला विचारलं तू ऑटोरिक्षा चालवतेस का?आणि मला पिंक ऑटो रिक्षा रोटरीतर्फे घेऊन दिली. तसेच रोटरीचे सदस्य प्रकाश नाईक, रणवीर सडेकर दादांनी सुद्धा मला यासाठी खूप प्रोत्साहन दिले.खूप मदत केली.
मला रिक्षा चालवायला शिकवले ते बाबांनीच. ताई आणि बाबांनीच मला पूर्ण पाठिंबा दिला.''तू हे करू शकतेस'' हा माझा आत्मविश्वास माझ्यात आणून दिला. ताईंनी मला राहण्यास जागा दिली एवढेच नाही तर मला माझ्या नावाची ओळख पण ताई व बाबांनीच दिली. रिक्शा चालवायला बाबांनी तर शिकवलेच पण रिक्शा सर्विसिंग करण्यास वेर्णाला पण माझे सोबत यायचे. मुलगी म्हणून कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून त्यांचे माझ्यावर लक्ष असत.
मी सकाळी साडेपाच वाजता उठते. घरातील थोडं काम करून सात वाजता शाळेतील मुलांना पोहोचवण्यास जाते. पुन्हा घरी येते. पुन्हा साडेआठ वाजता मुलांना सोडवायला जाते. मुलांना शाळेत सोडणे व आणणे आणि घरातील कामे हे सर्व मॅनेज करते. पुन्हा दुपारी ट्युशनची मुले सोडणे आणि शिवाय बँकेत जॉब करणाऱ्या स्त्रियांना पण मी बँकेत नेऊन पोचवते.
सकाळी सात ते संध्याकाळी साडेसात पर्यंत मी रिक्षा चालवते.शाळेत जाणाऱ्या आठवी ते दहावीच्या मुलींच्या पालकांना काळजी नसते कारण सोबत रिक्षा ड्रायव्हर एक मुलगीच असते. दुसरे पॅसेंजर फक्त महिलाच असतील किंवा महिलेबरोबर तिचा पती असेल तरच मी त्यांना घेऊन जाते.एकदा माझे पॅसेंजर डॉक्टरकडे गेले होते. ते येईपर्यंत मी तिथेच रिक्षात बसले असताना एक व्यक्ती येऊन माझ्याशी बोलू लागली आणि म्हणाली "मला घरी सोडते का?" मी म्हणाले,"तुमची बायको असेल तरच मी सोडेल नाहीतर नाही."
माझ्याबरोबर जाताना महिलांना खूपच सुरक्षित वाटते. मी जास्तीत जास्त दहा किलोमीटरपर्यंत फोंडाच्या जवळपास पॅसेंजर नेते. माझे कामे करूनच मी रिक्षा चालवते.यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे. त्यामुळे बँकेचा हप्ता तर भरतेस शिवाय माझ्यासाठी मी सोन्याचे दागिनेही बनवले.काही पैसे सेविंगला पण टाकू शकते.लोक काय म्हणतील याचा विचार न करता मुलींनी व बायकांनीसुद्धा रिक्षा घेऊन आपल्या पायावर उभे रहावे.
यासाठी रोटरी क्लब हवी ती मदत करण्यास तयार आहे.यासाठी शिक्षणाचीही गरज नाही, शिवाय धावपळ करून ऑफिसलादेखील जायची गरज नाही. बायका आपला संसार सांभाळून हे काम करू शकतात.माझ्या ताई आवाहन करू इच्छितात की मुलींनी ज्यांचे शिक्षण दहावी ते बारावीपर्यंत झालेले आहे त्यांनी पुढे यावे. रोटरीतर्फे त्यांना सर्व मदत करण्यात येईल.
शब्दांकन - नागरत्ना कुडतरकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.