Goa: राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे शाळांमधील प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची शिफारस डॉक्टरांच्या तज्ज्ञ समितीने जरी केली असली तरी कृती दल (Goa Task Force) समिती अंतिम निर्णय घेईल. त्यानंतर शिक्षण खाते शाळा व्यवस्थापनांना विश्वासात घेऊन त्याची अंमलबजावणी करील. कृती दल समितीची बैठक लवकरच होईल. त्यामुळे नियमित वर्ग (Regular Classes) दिवाळीपूर्वीही सुरू होऊ शकतात अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) यांनी दिली.
आज पर्वरी येथील एका कार्यक्रमावेळी पत्रकारांनी राज्यातील शाळांचे नियमित वर्ग कधीपर्यंत सुरू होतील याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यातील शाळांचे नियमित वर्ग सुरू करताना कोविड - १९ च्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. ९ ते १२ ची वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील. त्यानंतर प्रॅक्टीकल्सही सुरू करण्यात येतील असे त्यांनी सूचित केले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण तसेच कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण बरेच नियंत्रणात आले
आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्वांचा विचार करून गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या अध्यक्षतेखालील डॉक्टरांच्या तज्ज्ञ समितीने राज्यातील शाळांतील वर्ग प्रत्यक्ष व हायब्रिड पद्धतीने सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या समितीने हा अहवाल सरकारच्या कृती दल समितीकडे पाठविला आहे. या समितीची लवकरच बैठक होईल त्यानंतरच शाळा सुरू होण्याचा निर्णय होणार आहे.
राज्यातील धार्मिक स्थळांना पूर्ण बंदी घालण्यात आलेली नाही मात्र कोविड - १९ मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी काही निर्बंध घालण्यात आले आहेत. या सूचनांचे पालन करून सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्यास सरकारने परवानगी दिलेली आहे. सिनेमागृहांना त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गावातील नाटकांनाही ही परवानगी लागू आहे. मात्र त्यांनीही ५० टक्के क्षमता याचे पालन करावे असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
पर्यटक मोठ्या प्रमाणात गोव्यात येऊ लागले आहेत मात्र ते कोविड - १९ मार्गदर्शक सूचनांचे पालन करत नाहीत. काही पर्यटकांचा तर समुद्रकिनारी पाण्यामध्ये दुचाकी चालवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे यावरून पर्यटक कायद्याचे उल्लंघन करूनही ठोस कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, समुद्रकिनारी पर्यटक रक्षक, दृष्टीचे जीवरक्षक तसेच पोलिस सुरक्षा आहे. पर्यटकांनी गोव्यात आल्यावर कोविड - १९ च्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच कायद्याचे पालन करणे सक्तीचे आहे. त्यांनी जर त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईला त्यांना सामोरे जावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.