वास्को: कोविडमुळे गेली दोन वर्षे बंद ठेवण्यात आलेल्या शाळा आज विद्यार्थ्यांच्या किलबिलाने गजबजून गेल्या. काही विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते तर काही विद्यार्थी हिरमुसलेल्या अवस्थेत होते. तर शाळा सुरू झाल्याने पालकांनी सुटकेचा श्वास सोडला. (Schools in Goa start again after Corona crisis)
झाली बाबा एकदाची शाळा सुरू असे म्हणत आज पालकांनी सुटकेचा श्वास सोडला. सकाळच्या सत्रात लहान मुलांच्या खेळाने गजबजून असलेले रस्ते आज ओसाड पडलेले दिसले. रस्त्यावर शुकशुकाट होता. गेली दोन वर्षे शाळा बंद होत्या. कोविडचा प्रसार कमी झाल्याने आज शाळा दोन वर्षानंतर पूर्ववत सुरू करण्यात आल्या. दिवसभर खेळात व्यस्त असलेली मुले आज सकाळी सकाळी दप्तराचे ओझे घेऊन शाळेत जाताना दिसली. सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत शिक्षकांकडून स्वागत करण्यात आले.
आज सकाळी शाळेची पहिली घंटा वाजली आणि 2022-23 शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. पालक आपल्या पाल्यांना शाळेच्या आवारात आपली मूले शाळेत जाई पर्यंत गर्दी करून होते. शाळेत सोडल्यानंतर ते घरी परतल्यानंतर दुपारी परत शाळेत येऊन आपल्या पाल्यांना घेऊन घरी गेले. विद्यार्थीं वर्गांमुळे शालेय परिसर गजबजून गेला होता. प्रत्येक शाळांकडे वाहनांची मोठी वर्दळ होती. पालक आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी व नेण्यासाठी आले असता काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना बराच त्रास झाला.
वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी काही शाळांनी विशेष काळजी घेतली होती. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला नाही. मात्र शाळा आवाराबाहेर वाहतूक कोंडीची समस्या जाणवली. त्यामुळे याचा त्रास विद्यार्थी व पालकांच्या वाहनांबरोबर इतर वाहनांना झाला. प्रत्येक ठीकाणी चारचाकी व दुचाकी वाहनांची मोठी वर्दळ होती.
दरम्यान आज शाळा सुरू झाल्याने पालकांनी आनंद व्यक्त केला. कारण गेली दोन वर्षे शाळा बंद असल्याने शिक्षणाचा बोजवारा निर्माण झाला होता. त्यामुळे पालक वर्ग चिंताग्रस्त होते. कधीकाळी शाळा सुरू होणार आहे या प्रतिक्षेत पालक वर्ग होते. गेली दोन वर्षे ओसाड पडलेला शालेय परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता. दरम्यान भाग शिक्षक धारकां- - - कडून उपलब्ध करून देण्यात येणारी शालेय पुस्तके अजून उपलब्ध झाली आहे. पुस्तके कधी मिळणार या प्रतिक्षेत शाळेचे मुख्याध्यापक आहेत. ही पाठ्यपुस्तके आल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येईल असे एका मुख्याध्यापकांने सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.