Full Schedule Now Available for Upcoming Serendipity Arts Festival 2024
१५ ते २२ डिसेंबर या दरम्यान होणाऱ्या सेरेंडिपिटी कला महोत्सवातील कार्यक्रमांची यादी महोत्सवाच्या संकेतस्थळावर जाहीर झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत प्रत्येकाला ज्यातून आनंद आणि आगळ्या आविष्कारांचा अनुभव घेता येईल असे कार्यक्रम सेरेंडिपिटीत आहेत. नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला, कथाकथन, इन्स्टॉलेशन्स, विशेष प्रकल्प, पाककला, माती बांधकाम कला, स्टँड अप कॉमेडी, कलाविषयक कार्यशाळा, बोलक्या बाहुल्या, विणकाम, पार्श्वध्वनी निर्मिती, कला प्रदर्शने अशा विविध कला-रोमांचांना यंदाच्या सेरेंडिपिटीतही कलारसिक सामोरे जाणार आहेत.
पणजी शहरातील जुने गोवा मेडिकल कॉलेज संकुल इमारत, कला अकादमी, डायरेक्टोरेट ऑफ अकाउंटसचे नियंत्रण कक्ष, बांबोळी येथील नागाळी हिल, करंजाळे समुद्रकिनारा, दोनापावला पार्किंग, काम्पाल आर्ट पार्क, सांता मोनिका जेटी, आझाद मैदान या महत्त्वाच्या स्थळांवर सेरेंडिपिटीचे विविध कार्यक्रम आयोजित होणार आहेत.
यातील बहुतेक कार्यक्रम विनामूल्य आहेत. मात्र जुने गोवा मेडिकल कॉलेज संकुल आणि कला अकादमीत आयोजित होणाऱ्या काही कार्यक्रमांसाठी नाममात्र तिकीट आकारण्यात येणार आहे. मर्यादित जागेत हे कार्यक्रम सादर होणार असल्यामुळे प्रेक्षकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षीच्या महोत्सवात देखील तिकीट आकारण्यात आले होते. यंदा अशा कार्यक्रमांना आकारण्यात येणाऱ्या तिकिटाचा दर २९९ रुपये आहे. नाट्य आणि नृत्य या विभागातील काही सादरीकरणांसाठी हा तिकीट दर ठेवण्यात आलेला आहे.
या महोत्सवातील कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी अर्थातच प्रेक्षकांना नोंदणी करावी लागेल, जी सेरेंडिपीटीच्या संकेतस्थळावर जाऊन मोफत करता येते. एकदा नोंदणी झाली की संकेतस्थळावर नोंदलेल्या आपल्याला हव्या त्या कार्यक्रमाचे आरक्षणही करता येते. सेरेंडिपिटीतील पाककला विभाग अत्यंत लोकप्रिय असल्याने त्यातील कार्यशाळाचे आरक्षण अधिक जलद गतीने होते. या महोत्सवातील नाट्य आणि संगीत हा विभागही अतिशय लोकप्रिय आहे. गेल्या वर्षी, पाककला कार्यशाळा, नाट्यप्रयोग आणि संगीतावर आधारित अनेक कार्यक्रम हाऊसफुल झाले होते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर स्वतःच्या नावाची नोंदणी करून कार्यक्रमांचे आरक्षण करणे हे योग्य ठरेल. कार्यक्रमांच्या आरक्षणाला कधीच सुरुवात झाली आहे.
यंदाच्या महोत्सवात आयटम, ग्लिच इन द मीथ, डू यू नो धिस सॉंग?, मत्तीहा २२:३९, द हाऊस ब्लू, बरीड ट्रेजर्स, रिलीफ कॅम्प, बी-लव्हड, शकुंतलम, मुडिएट्टू (लोककला प्रकार), सा पा रे सा पा सा, गाब्रियल्स ट्रायल ही वेगवेगळ्या भाषांमधील आणि अनोख्या शैलीतील नाटके सादर होणार आहेत. या नाटकांचे वैशिष्ट्य म्हणजे क्युरेटर क्वासार ठाकोर पदमसी आणि शंकर व्यंकटेश्वरन यांनी त्यातील प्रयोगशीलता आणि आशयातील वेगळेपणा हेरून देशभरातून त्यांची निवड केली आहे. सेरेंडिपिटी महोत्सवात सादर होणारी नाटके आतापर्यंत नेहमी आशय संपन्न अशीच राहिली आहेत. यंदाही महोत्सवातील नाटके पाहण्यासाठी प्रेक्षकांची झुंबड नक्कीच उडेल.
यंदाच्या पाककला विभागातही विविध वैशिष्ट्यपूर्ण पाककृती सादर होणार आहेत. गोव्याच्या किनारपट्टीवरील सर्वात कमी माहितीची पण सर्वात आकर्षक वनस्पती म्हणजे समुद्री शेवाळ. गोव्यात १४० पेक्षा अधिक प्रजातींची शेवाळे आहेत. यापैकी काही शेवाळे अनेक रेस्टॉरंटमध्ये विशेष पाककृतीत वापरण्यात येतात.
ही वनस्पती उगवणाऱ्या जागेला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या संबंधात जाणून घेणे हा आगळा अनुभव असेल. त्याशिवाय टोमॅटो, पपईच्या साली, नारळाचा लगदा, अंड्याची टरफले, बाकी राहिलेले उष्टे यांचा उत्तम वापर कसा करता येतो हे आपल्याला या विभागातील कार्यशाळा शिकवतील. अन्नसाखळीत मधमाशांचे असलेले महत्त्वही आपण अशाच एका कार्यशाळेत जाणून घेऊ शकाल. त्याशिवाय विविध अन्नपदार्थांची परंपरा आणि बनवायची माहिती आपल्याला या विभागात हमखास कळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.