Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; गोवा वाचवा बॅनर

Khari Kujbuj: विरोधकांना सत्ता हवी आहे की फक्त निवडणुकीत जाग व्हायची सवय आहे? असा चिमटा काही जण काढतात, तर विरोधकांना ‘लोकांचा विश्वास जिंकायचा प्लॅन आहे का?’

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा वाचवा बॅनर!

सध्या राज्यभर कुठे ना कुठे आंदोलनाचं बॅनर फडकतंय आणि प्रत्येकाचं घोषवाक्य वेगळं असलं तरी अर्थ मात्र एकच ‘गोवा वाचवा!’ त्यामुळे चहाच्या टपरीपासून ते व्हॉट्सॲप ग्रुपपर्यंत एक चर्चा रंगतेय, आता गोवा वाचवायला किती गावे लागणार? काहीजण हसत म्हणतात, सगळे आंदोलक आपापल्या मुद्द्यांसह एकाच बॅनरखाली आले, तर बॅनर लावायला तरी जागा मिळेल का? पडद्यामागे हालचाली सुरू असल्याच्या चर्चेमुळे उत्सुकता आणखी वाढली आहे. आज छोटे आंदोलन, उद्या मोठा मोर्चा, आणि परवा इतिहास? अशी कल्पनाशक्ती काहींची जोरात धावतेय. तर दुसरीकडे, हे सगळं एकत्र आलं तर सरकार काय करणार संवाद, समिती की ‘पाहूया पुढे’? असा सवालही मिश्किल पद्धतीने विचारला जातोय. एकंदरीत, गोवा वाचवण्याच्या नावाखाली सध्या राज्यात फक्त घोषणा नाहीत, तर अंदाज, टोमणे आणि हळूच हसूही आहे. मोठं आंदोलन पडद्यावर कधी येणार, आणि ते आल्यावर कोणाची धावपळ जास्त होणार—आंदोलकांची की सरकारची याचीच खमंग चर्चा सध्या सगळीकडे ऐकू येतेय. ∙∙∙

विरोधक कुठे हरवले?

राज्यात पुन्हा एकदा ‘सरकार तुमच्या दारी’चा गजर सुरू झाला आणि गल्लोगल्ली लोकांच्या मिश्किल चर्चांना उधाण आलं. निवडणूक दूर नाही, म्हणून सरकार जवळ आलं, अशी एक टोमणेबाजी ऐकू येते, तर आधीही हा उपक्रम झाला होता, तेव्हा किती लोकांच्या दारी खरंच सरकार पोहोचलं? असा सवालही काही जण मिश्किलपणे हसत विचारतात. सरकार आपले प्रयत्न दाखवत असल्याचं चित्र एका बाजूला उभं राहत असताना, दुसऱ्या बाजूला विरोधक कुठल्या दारी, कुठल्या रस्त्याने, कुठल्या वेळी पोहोचणार याचीच चर्चा रंगतेय. विरोधकांना सत्ता हवी आहे की फक्त निवडणुकीत जाग व्हायची सवय आहे? असा चिमटा काही जण काढतात, तर विरोधकांना ‘लोकांचा विश्वास जिंकायचा प्लॅन आहे का?’ अशी चर्चाही कानावर पडते. एकंदर काय, सरकार दारी येतं की मतदारांना दारी उभं करतं, आणि विरोधक नेमके कुठे हरवलेत, यावर सध्या राज्यभर चर्चा रंगल्या आहेत. ∙∙∙

पाटकरांचा षटकार

आगामी विधानसभा निवडणुकीत विराेधी पक्षांच्‍या युतीवरुन गोव्‍यातील काँग्रेसमध्‍ये दोन मतप्रवाह चालू असताना काही दिवसांपूर्वी केपेचे आमदार एल्‍टन डिकॉस्‍ता यांनी पाटकर यांना युतीचे महत्‍व समजायचे असेल तर आधी त्‍यांनी निवडणूक जिंकावी असा घरचा अहेर दिला होता. काल मडगावात पाटकर आले असता, त्‍यांना याबद्दल पत्रकारांनी छेडल्‍यावर त्‍यांनी अगदी ठेवणीतल्‍या शद्बांनी एल्‍टनचा समाचार घेताना एकप्रक़ारे षटकारच लगावला. पाटकर म्‍हणाले, एल्‍टन हे माझ्‍या मोठ्या भावासारखे. त्‍यामुळे त्‍यांना मी निवडणूक जिंकून आमदार व्‍हावे, असे वाटत असावे. मात्र एल्‍टन हे आपल्‍या एका केपे मतदारसंघापुरते विचार करतात. मात्र अध्‍यक्ष या नात्‍याने मला चाळीसही मतदारसंघांचा विचार करावा लागतो. कुठलेही अपशद्ब न वापरता पाटकरांनी एल्‍टन यांना त्‍यांची याेग्‍य जागा दाखवून दिली, असे म्‍हटल्‍यास ती अतिशयोक्‍ती होईल का? ∙∙∙

बाबांचे आश्वासन पूर्णत्वास येणार?

राजकारणी जी आश्वासने देतात ती मोडण्यासाठीच असतात का? असा प्रश्न आम जनतेला अनेकदा पडतो. काणकोण आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव आहे, म्हणून काणकोणकर गेल्या अनेक वर्षांपासून आवाज उठवत आहेत.या आरोग्य केंद्रात स्त्री रोग तज्ज्ञाची नेमणूक करा. एक्स रे तज्ज्ञाची नेमणूक करा, आवश्यक डॉक्टरांची व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक व्हायला हवी ही जनतेची मागणी पूर्ण करणार, अशी आश्वासने जनतेला वारंवार मिळत आहेत. काल एका कार्यक्रमावेळी आरोग्य मंत्र्यांनी काणकोणकरांना पुन्हा एकदा आश्वासन दिले आहे.ज्या जनतेच्या मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्यात येणार तीस दिवसांच्या आत अहवाल मिळाल्यानंतर काणकोण आरोग्य केंद्र पूर्ण शक्तीने पूर्ण दर्जाचे आरोग्य सुविधा केंद्र बनविणार आहे,असे आश्वासन बाबाने काणकोणकरांना दिले. ते पूर्ण होणार, अशी जनतेची भाबडी आशा आहे. ∙∙∙

तिरुमलाचा तिढा सुटणार?

तिरूमला तिरूपती सहकारी पत संस्थेचा तिढा आता सुटणार आहे. त्या संस्थेवरील कारवाईमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. काहींना सरकार बेकायदेशीरपणाला थारा देत नाही असे वाटू लागले होते. त्या संस्थेचे पिग्मी एजंटसह बरेचजण सत्ताधारी तंबूशी संबंधित, जवळीक असलेले आहेत. आपला रोजगार बुडेल यामुळे त्यांनी आपले वजन वापरणे सुरु केले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात तो विषय बाजूला पडेल अशी चर्चा सहकार वर्तुळात आहे. त्यासाठीच हा तिढा आता सोडवण्यासाठी पावले पडू लागली आहेत. ∙∙∙

वीरेशची स्कॉटलंडवारी

चिंबल येथे प्रशासन स्तंभ व युनिटी मॉल नको, या मागणीसाठी चिंबलवासीयांचे उपोषण सुरूच आहे. त्यांना आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची आहे. त्यांच्यासोबत सुरवातीपासून असलेले सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर सध्या कुठे आहेत, असा प्रश्न पडू शकतो. वीरेश सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. ते स्वींडनहून आता स्कॉटलंडला पोचले आहेत. स्कॉयलंड यार्डचे पोलिस हे गुन्हे उकल करण्यात जग प्रसिद्ध आहेत. त्यामुळे विधानसभेच्या येत्या अधिवेशनात वीरेश यांच्याकडून पोलिस तपासावर बोलताना स्कॉडलंड यार्ड पोलिसांचा उल्लेख आला तर आश्चर्य नको. ∙∙∙

भाटीकरांचा 'डॅशिंग अॅप्रोच’

फोंड्यात काल झालेल्या ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमात बाजी मारून गेले ते डॉ.केतन भाटीकर. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात भाटीकरांनी फोंड्यातील अनेक समस्यांसह नुकत्याच नियुक्त झालेल्या कला मंदिराच्या समितीवरही हात घातला. या समितीवर कलाकार नेमा, अशी कळकळीची मागणी करून त्यांनी कलाकारांच्या भळभळणाऱ्या जखमांना वाट करून दिली. त्यामुळे तिथे उपस्थित अनेकांना कला मंदिराचा ‘राजकीय आखाडा’ या शीर्षका खाली आज याच सदरात प्रसिद्ध झालेल्या ‘खरी कुजबूज’ची आठवण झाली. आणि त्यावर लोक बोलताना दिसू लागले. कला मंदिराचे जे राजकीय व्यासपीठ करण्याचा प्रयत्न चालला आहे, त्यावरही लोक चर्चा करत होते.पण भाटीकरांनी घेतलेल्या भूमिकेमुळे तिथे उपस्थित कलाकारांना दिवंगत रवी नाईकानंतर हाच आपला खरा तारणहार, असे वाटू लागले आहे. आता त्यांचे वाटणे किती खरे ठरते, हे भविष्यात कळेलच पण आज मात्र भाटीकरांचा ‘डॅशिंग ॲप्रोच’ उपस्थितांची दाद घेऊन गेला ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मला गेमिंगची आवड, पण कुणी समजून घेत नाही"? वाळपईच्या विद्यार्थ्याने थेट साधला PM मोदींशी संवाद; पंतप्रधांनांनी दिला मोलाचा सल्ला

Tirumala Tirupati Goa: ..अखेर ‘तिरुमला-तिरुपती’चे अध्यक्ष गोव्यात! सोसायटीविषयी कागदपत्रे केली सादर; सहकार मंत्र्यांसोबत बैठक

NIT Theft: 'मी प्राध्यापक आहे'! चोरट्याने केली भलतीच बतावणी, कॉलेजमध्ये घुसून पळवले लॅपटॉप; संशयिताला आंध्रप्रदेशमधून अटक

Cooch Behar Trophy: गोव्याची भेदक गोलंदाजी! केरळला स्वस्तात गुंडाळले; कर्णधार यश, समर्थचा प्रभावी मारा

सर्पदंश प्रतिबंधाचे बनावट औषध बाजारात, 150चे इंजेक्शन विकले दीड हजार रुपयांना; फार्मसीमालकाला नोटीस

SCROLL FOR NEXT