

महानगरपालिकेत ३० पैकी ३० जागा निवडून आणायच्याच याच उद्देशाने सध्या मंत्री बाबूश मोन्सेरात कामाला लागले आहेत. ज्यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे, त्यांना बोलावून सध्या त्यांच्या बैठका घेण्यावर त्यांनी सपाटा लावला असल्याची चर्चा आहे. उमेदवारांकडून जनमानस घेण्याचा, त्याचबरोबर काही उमेदवार पत्रकारांशी संधान बांधून कानोसा घेत आहेत. त्याची इत्तंभूत माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली जात असावी, असा संशय विरोधी इच्छुक उमेदवारांना येऊ लागला आहे. ज्यांचा पत्ता कापला गेला आहे, त्या नगरसेवकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमदार गटाच्या उमेदवाराला त्यांच्याकडून दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही झाले विरोधी पॅनल निवडणुकीत असणार याची शक्यता धरूनच सध्या बाबूश यांचे डावपेच सुरू आहेत, त्याचाच हा एक बैठकांचा भाग मानता येईल. ∙∙∙
आपल्यावर नियमित ह्या ना त्या कारणावरुन टीका होत असते. पण आपण कधी टीका करणाऱ्याला प्रत्युत्तर देत नसतो. कधी कधी केलेली टीका सकारात्मक असते व त्याचा फायदा आपल्याला होतो, आपल्याकडून काही राहून गेले किंवा चूक झाली तर ती आपल्या नजरेस येते व त्यात सुधारणा करण्याची संधी आपल्याला मिळते. त्याचसाठी आपण या मताचा आहे की, निंदकाचे घर असावे शेजारी. हे मत दुसऱ्या तिसऱ्या कुणाचे नसून मडगावचे आमदार व सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांचे आहे. त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होतच असते पण ते कधी त्याबद्दल बोलताना दिसत नाहीत. त्यामुळेच की, काय शेवटी टीका करणारेसुद्धा हताश होऊन गप्प बसतात. दिगंबरबाबनी सदैव हे तत्व पाळले आहे, म्हणूनच राजकारणात ते यशस्वी झाले, अशी मडगाववासीयांत चर्चा आहे. ∙∙∙
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केपेचे आमदार एल्टन डिकोस्ता व हळदोणेचे आमादार कार्लुस फेरेरा यांच्यासोबत नुकतीच पत्रकार परिषद घेवून आगामी विधानसभा अधिवेशनासाठी लोकांच्या समजून घ्यायला ‘आवाज तुमचो सांगात आमचो‘ अशा लोकसंपर्क संकल्पना जाहीर केली. त्यासाठी एक ईमेल आयडी तसेच एक फोन क्रमांकही देण्यात आला. मात्र, आज पहिल्याच दिवशी दिलेला मोबाईल क्रमांक ‘स्विच्ड ऑफ'' असल्याचा अनुभव अनेकांनी आला. विदेशातील एका क्रुझ नामक गोंयकाराने याची वाच्यता तथा तक्रारच म्हणा सरळ ‘राहुल गांधी सपोर्टर्स'' या ग्रुपवर केली व कॉंग्रेसच्या समाजमाध्यम प्रमुखांना चांगलेच धारेवर धरले. आता नंबरच बंद असेल तर कोण काय करू शकतो? मात्र, पहिल्याच दिवशी ‘कनेक्ट विथ सीएलपी डिस्कनेक्ट'' झाला, अशी म्हणण्याचीच वेळ आली ∙∙∙
पणजी महापालिका निवडणुकीत उत्पल पर्रीकर यांनी आपले पॅनल उभे करण्याचा मनसुबा जाहीर केल्यापासून राजकारण रंगू लागले आहे. त्यांना कोणा कोणाचा पाठिंबा मिळेल, याकडे अनेकांचे लक्ष आहे. मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनल विरोधात केवळ एकच पॅनल असेल याची काळजी विरोधक घेणार का, हा लाखमोलाचा प्रश्न बनला आहे. बाबूश यांनी याखेपेला ३० पैकी ३० जागा जिंकून दाखवू म्हणून दंड थोपटले आहेत. कॉंग्रेसने उत्पल यांना पाठिंब्याची भाषा वापरून राजकीय पटलावर तरंग उठवले आहेत. भाजपला कॉंग्रेसचे आमदार चालतात तर उत्पल यांना कॉंग्रेसचा पाठिंबा का चालू नये, अशी विचारणा खासगीत का होईना होऊ लागली आहे. ∙∙∙
गत पावसाळी अधिवेशनाआधी लोकांचे प्रश्न प्रत्यक्ष ऐकून घेऊन ते विधानसभा सभागृहात मांडण्यासाठी आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी प्रत्येक तालुक्यात जनता दरबारांचे आयोजन केले. आपला ‘आवाज’ कुणीतरी ऐकतोय हे कळाल्याने जनतेनीही सरदेसाईंच्या दरबाराला उत्स्फूर्तपणे हजेरी लावत आपले प्रश्न, समस्या मांडल्या. त्यानंतर विजयनी विविध सत्रांच्या माध्यमातून त्या सभागृहात मांडून त्यातील अनेक समस्यांवर सरकारकडून तोडगाही काढून घेतला. आता विधानसभेचे १४ दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ६ मार्चपासून सुरू होत आहे. त्यासाठीही विजयनी असाच कार्यक्रम सुरू केलेला आहे. परंतु, त्यासाठी त्यांनी लोकांना ई–मेल आयडी देत, त्याद्वारे प्रश्न, समस्या मांडण्यास सांगितलेले आहे. आमदारांना प्रश्न मांडण्यास २५ फेब्रुवारीपर्यंतचा वेळ असतानाही गतवेळेप्रमाणे जनता दरबार न घेता विजयनी ‘ऑनलाईन’ प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय का घेतला? अशा प्रश्न अनेकांकडून उपस्थित होत आहे. ∙∙∙
फॉर्म्युला ४ या मोटार शर्यतीवरून राजकारण तापू लागले आहे. धारगळमध्ये होऊ घातलेली ही शर्यत कोण जिंकेल तो जिंकेल पण त्यातील राजकीय शर्यत कोण जिंकेल यावरून पेडण्यात आता चर्चा जोर धरू लागली आहे. पणजीतील सत्ताधारी तंबूला कोण जवळचा, कोण तंबूत असून परका असा या चर्चेचा सूर आहे. यामुळे सरकार दरबारात कोणाला किती मान याविषयीही उलटसुलट बोलले जात आहे. पेडण्यात प्रकल्पांचे स्वागत कोण करतो आणि कोणाला मनात नसतानाही टाळ्या पिटाव्या लागतात याविषयी खोचकपणे बोलले जात आहे. तुये इस्पितळानंतर आता फॉम्युला ४ सर्वांच्या तोंडी आहे. ∙∙∙
चार वर्षानंतर नियुक्त झालेली फोंड्याची राजीव गांधी कला मंदिराची समिती सध्या फोंड्यात चर्चेचा विषय बनलेली दिसत आहे. या समितीवर कलाकारापेक्षा राजकीय व्यक्ती अधिक असल्यामुळे ही समिती म्हणजे ''राजकीय आखाडा'' बनल्यासारखे अनेकांना वाटायला लागले आहे या समितीत भाजपचे पंच, माजी सरपंच, माजी झेडपीसह फोंडा भाजपचे प्रमुख पदाधिकारी असलेले एक नगरसेवकही आहेत. आता बोला. त्यामुळे यातील बहुतेक सदस्यांचे कलेला ‘योगदान’ काय, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सध्या सुरू झालेले दिसत आहेत. दिवंगत रवी नाईक असते तर असे झाले नसते,असे अनेक कलाकारांना यामुळेच वाटू लागले आहे. रवी कला मंदिराचे अध्यक्ष असताना त्यांच्या समितीवर फक्त कलाकार व साहित्यिकच असायचे याची आठवणही अनेक जण काढताना दिसत आहेत. काही का असेना, पण फोंडा पोटनिवडणुकीच्या तोंडावर नियुक्त केलेल्या या समितीमुळे फोंड्याच्या कलाकारांत सध्या तीव्र रोष पसरलेला दिसत असून या रोषाचे परिणाम येणाऱ्या पोटनिवडणुकीत दिसू शकतात, असे बोलले जात आहे. काय होईल ते निवडणुकीत कळेलच. पण सध्या या समितीमुळे तवा बराच ‘तापला’ आहे एवढे नक्की!. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.