सासष्टी : सोनसोडो कचरा प्रकल्पात वर्षभरापूर्वी अग्नितांडव झाले होते. त्यात सुमारे ४० लाखांची विद्युत उपकरणे जळून खाक झाली होती. त्यानंतर पालिकेने ही उपकरणे या प्रकल्पात बसवलेली नाहीत. तसेच कचरा व्यवस्थापन शेडमध्येही कायमस्वरूपी वीज पुरवठ्याची व्यवस्था केलेली नाही.
सध्या सोनसोडो कचरा प्रकल्पाचा प्रश्र्न उच्च न्यायालयात असून नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी ही उपकरणे तसेच ट्रान्स्फार्मरची व्यवस्था करण्यात येईल, असे न्यायालयाला वकिलामार्फत सांगितले आहे. वीज उपकरणे व ट्रान्स्फार्मर मिळून नगरपालिकेला ५० ते ६० लाखांचा खर्च येणार असून नगरपालिका प्रशासनाने संचालनालयाकडे त्यासंदर्भात अर्ज केला असून हा अर्ज तातडीने मंजूर करून घेणार असल्याचेही न्यायालयाला सांगितले आहे. परंतु दोन महिन्यांच्या आत ट्रान्स्फार्मर बसवा, असे न्यायालयाने नगरपालिकेला कळविले आहे.
न्या. एस. एस. सोनक आणि न्या. वाल्मिकी मिनेझिस यांच्या खंडपीठासमोर नगरपालिकेने सोनसोडोसंदर्भात कृती योजना सादर करताना विद्युत उपकरणे पुरविणे व ट्रान्स्फार्मरची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
सर्व सुविधा महिन्यात पुरवणार सोबत आग विझविण्याच्या उपकरणांची व्यवस्था करणे, सोनसोडोच्या बाजूला असलेल्या बोअरवेलमधून ५० हजार लिटर क्षमता असलेल्या टाकीत पाणी साठविणे, त्यासाठी ४० अश्वशक्ती पंपची व्यवस्था करणे, सहा फायर हायड्रंट्सची सुविधा उपलब्ध करणे, सुरक्षा गार्डची व्यवस्था करणे, या सर्वांसाठी खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून एक महिन्याच्या आत सर्व सुविधा उपलब्ध करणे, असे कृती योजनेत नमूद केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.