Jusuit Dainik Gomantak
गोवा

सासष्टीतील पहिली जेझुइट्स जोडगोळी

1560 साली सासष्टीत पहिल्यांदा जेझुइट्सची जोडगोळी स्थानिकांचे ख्रिस्तीकरण करण्यासाठी पाठवण्यात आली होती, असे लुईस फ्रॉइस यांनी 1 डिसेंबर 1560 रोजी पोर्तुगालमधील त्यांच्या सहकाऱ्याला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मागील लेखात आपण पाहिले की, कशा पद्धतीने हिंदूनांच त्यांची देवळे पाडण्यास भाग पाडण्यात आले. इतक्यावरच हे थांबले नाही. स्थानिकांना अगदी त्यांच्या स्वत:च्या घरातही मूर्तीची पूजा करण्यास मनाई होती. हिंदू धर्मगुरूंना तुरुंगात टाकण्यात आले.

हिंदू संस्कृतीतील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमास बेकायदेशीर ठरवण्यात आले होते. मंदिरांच्या दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीवर बंदी घालणे आणि हिंदूंना फारच कमी सूचनेवर प्रदेश सोडण्याचे आदेश यांसह पुढील वर्षांमध्ये विविध उपायांनी सांस्कृतिक दडपशाहीचे न थांबणारे सत्र सुरू झाले.

१५४३पासून सासष्टी (आणि बार्देश) पोर्तुगिजांच्या पूर्णपणे ताब्यात आले. १२ डिसेंबर १५४८ रोजी, रुई बारबोदोने राजा जुआंव तृतीय यांना लिहिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, त्यांना सासष्टीत फार कमी ख्रिश्‍चन आढळले.

१५४९साली संपूर्ण भारतात जेझुइट्सचे फक्त ३० पंथोपदेशक होते. १५५४साली ख्रिस्तीकरणासाठी सासष्टीत जेझुइट्सना नेमण्यात आले होते. त्यांच्याकडे सासष्टीत ख्रिस्तीकरण करण्यासाठी फारच कमी माणसे उपलब्ध होती.

सासष्टीचे नवनियुक्त कॅप्टन, डिओगो फर्नांडिस रॉड्रिग्ज, यांनी सासष्टीच्या गावांमध्ये दवंडी पिटली की, ज्यांना ख्रिश्चन पंथ स्वीकारण्याची इच्छा आहे त्या सर्वांना सर्वतोपरि मदत केली जाईल. यामुळे अनेक लोक ख्रिश्‍चन झाल्याचे सांगण्यात येते.

सासष्टी भागाची स्थिती जाणून घेण्यासाठी प्रांतीय जेझुइट गोंसालो डी सिल्वेरा यांनी पेरो दा आल्मेदा यांना त्या मे १५५८मध्ये सासष्टीत पाठवले. राजधानीला परत येत असताना, पेरोने सासष्टीतील काही स्थानिकांना ख्रिस्तपंथाची शिकवण दिली आणि त्यांचा बाप्तिस्मा केला.

२६ डिसेंबर १५५८ रोजी लिहिलेल्या पत्रात, जुने गोवे येथील सेंट पॉल कॉलेजिओत बाप्तिस्मा घेतलेल्या सासष्टीतील अनेक लोकांना भेटल्याचे लिहिले आहे. परंतु, बाप्तिस्मा घेतलेले सासष्टीतले हे लोक त्यांच्या मूळ हिंदू लोकांसोबतच राहत असत. बाप्तिस्मा झाल्यामुळे त्यांचे केवळ नाव बदलले होते, पण त्यांच्या प्रथा, संस्कृती सगळे हिंदूंचेच होते. (संदर्भ : ए. दा सिल्वा रेगो, डोक्युमेंतसाओ, खंड ६, पृष्ठ २१५, २६० आणि ४८२).

१५४३साली सासष्टी तालुका पोर्तुगीज प्रदेश बनल्यानंतर बिशप गॅस्पर जॉर्ज दा लिओ परेरा दा ऑर्नेलास या तत्कालीन पंथगुरूंनी मडगाव आणि राशोलमध्ये मोठ्या प्रमाणावर ख्रिस्तीकरण करून या प्रदेशांची पुनर्रचना केली. पोर्तुगालमधील एव्होरा येथे १५५९साली त्यांची गोव्याचे मुख्य बिशप म्हणून नियुक्ती करण्यात आली.

१५ एप्रिल १५६० रोजी लिस्बनहून भारतासाठी समुद्रमार्गे प्रवास करत असताना त्यांना सासष्टीतील येथील परिस्थितीची जाणीव झाली. त्यावेळी सासष्टीतील लोकसंख्या ५०,००० ८०,०००च्या आसपास होती. पैकी तिसवाडीत येऊन बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या १,००० होती. त्यांचा फक्त बाप्तिस्मा झाला होता. त्यांना ख्रिस्तीपंथाविषयी तसे ज्ञान व माहिती नव्हती.

ते जरी हिंदूंपासून वेगळे राहत असले तरी हिंदूंमध्येच राहत असल्याने, त्यांचा पुन्हा हिंदू होण्याचा धोका अधिक होता. तसे होऊ नये यासाठी अधिकाधिक जेसुइट्सना सासष्टीत पाठवण्याची विनंती आर्चबिशप ऑर्नेलास (१५६०-६७ आणि १५७४-७६) आणि व्हाईसरॉय कॉन्स्टँटिनो दा ब्रागांझा (१५५८-६१) यांनी जेसुइट प्रांतीय, फादर आंतोनिओ दा क्वाद्रोस (१५५९-७१) यांच्याजवळ केली होती.

१५६०साली सासष्टीत पहिल्यांदा जेझुइट्सची जोडगोळी स्थानिकांचे ख्रिस्तीकरण करण्यासाठी पाठवण्यात आली होती, असे लुईस फ्रॉइस यांनी १ डिसेंबर १५६० रोजी पोर्तुगालमधील त्यांच्या सहकाऱ्याला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. फादर पेरो मस्करेन्हास आणि त्यांचे सहकारी बंधू मॅन्युएल गोम्स, सासष्टीचे कॅप्टन, दिओगो फर्नांडिस रॉड्रिग्ससह ओल्ड गोव्याहून राशोलला परतत होते (मॅन्युएल गोम्स यांच्या पत्रानुसार १ डिसेंबर १५६०).

त्यांनी झुआरी नदी पार करून सेंट जेम्सच्या फेस्तादिवशी म्हणजे १ मे १५६० रोजी कुठ्ठाळी तीर गाठले. पूजेत वापरले जाणारे व श्राद्धात पवित्रक करण्यासाठी वापरले जाणारे कुश नावाचे गवत फार मोठ्या प्रमाणात या गावात उगवत असे म्हणून त्याचे नाव ‘कुशस्थळी’, असे होते. त्याचाच अपभ्रंश नंतर कुठ्ठाळी असा झाला. कुठ्ठाळी हे गोव्यातील सर्वांत प्रमुख गावांपैकी एक होते.

कुठ्ठाळीत त्यांनी लहानशी झोपडी उभारली व फादर पेरो मास्कारेन्हास यांनी मास साजरा केला. त्यांनी त्या ठिकाणी क्रॉस लावला, जिथे विद्यमान चर्चच्या जवळ एक चॅपल नंतर बांधले गेले. (क्रॉस अखेर उद्ध्वस्त झाला पण त्याचा दगड जवळच्या चर्चमध्ये जतन केला गेला आहे.) नंतर ते राशोलच्या किल्ल्यावर गेले.

जिथे या जोडगोळीला किल्ल्याचे तत्कालीन कॅप्टन व्हिसेंट डायस (दिओगो फर्नांडिस रॉड्रिग्ज हे सासष्टीचे कॅप्टन होते) यांनी एका घरात तात्पुरते राहण्याची परवानगी दिली. ३ जानेवारी १५६६ रोजी व्हाईसरॉय अँटाओ दा नोरोन्हा (१५६४-६८) यांनी ते घर, शेजारील मोकळ्या जमिनीसह हे चर्चच्या नावे कायम केले. मास्कारेन्हास हा राशोलचे पहिले नियमित पंथगुरू बनले. या जेसुइट जोडीने स्थानिकांचे ख्रिस्तीकरण करण्यास सुरुवात केली

( वाल्मिकी फोलेरो)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT