पणजी: धनादेश न वटल्याप्रकरणी पणजी प्रथमश्रेणी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला सरोजा विश्वास नाईक ऊर्फ सरोज बोरकर ऊर्फ सरोज देवराई नाईक हिने आव्हान दिले होते. तिचा आव्हान अर्ज पणजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावत तिची शिक्षा कायम केली. तिने १० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी २.३० वा. शिक्षा भोगण्यास न्यायालयाला शरण जावे, असे न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
पणजी प्रथमश्रेणी न्यायालयाने सरोजा नाईक हिला २५ जुलै २०२४ रोजी शिक्षा ठोठावली होती. तिला ५ लाख २० रुपयांची भरपाई तसेच तीन महिने साधी कैद असे निवाड्यात नमूद केले होते. या निवाड्याला तिने पणजी जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. ही शिक्षा कायम करताना अतिरिक्त सत्र न्यायालयाने तिने जर भरपाईची रक्कम न भरल्यास तिला आणखी तीन महिने साधी कैद ठोठावली आहे. या सर्व शिक्षा तिने एकाचवेळी भोगायच्या आहेत.
सरोजा नाईक हिने तक्रारदार आवेलिनो नुनीस याच्याकडून ५ लाखाची रक्कम कर्ज म्हणून घेतले होते. या कर्जावर व्याज आकारण्यात आले नव्हते, तिने ती रक्कम हप्त्याने एका वर्षात परत करायची होती. त्याबदल्यात सरोजा हिने कोरा धनादेश स्वतःच्या सहीने दिला होता. हा धनादेश न वटल्याने तक्रारदाराने कायदेशीर प्रक्रिया केली, मात्र तरीही ही रक्कम परत न केल्याने न्यायालयात नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्याच्या कलम १३८ खाली तक्रार दाखल केली होती. या धनादेशावर ५ लाखांची रक्कम लिहिण्यात आली होती ते हस्ताक्षर तिचे नसल्याचा दावा संशयित सरोजा हिने केला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.