Sanquelim : गोव्याचे प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलापूर-साखळी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या परिसरात आषाढी एकादशीनिमित्त जणू भक्तांचा महापूरच आला होता. मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी टाळमृदंगाच्या गजरात विठ्ठलापूर नगरी दणाणून सोडली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्नीसह मंदिरात अभिषेक व पूजा केली, तर सकाळीच आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी स्वहस्ते श्रींच्या मूर्तींवर मानाचा अभिषेक करून श्रीचरणी सेवा रुजू केली.
सकाळपासूनच साखळी, डिचोली, सत्तरी भागातून अनेक वारकरी मंडळे, दिंडी पथके, महिला मंडळे, क्लब, संस्था व इतर वारकऱ्यांनी गट करून विठ्ठलापूरच्या प्रतिपंढरपुरात पायपीट केली. साखळी, कारापूर परिसरातील विविध शाळा, हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या दिंडी पथकांनी या भक्तीमय वातावरणात अधिक भर घातली.
संतमहंतांचे वेश परिधान केलेल्या लहानग्या विद्यार्थी वारकऱ्यांनी या परिसराला पंढरपुराचे स्वरूप प्राप्त करून दिले. विठुरायाच्या गजर, जयघोषाने अवघी विठ्ठलापूर नगरी दुमदुमून गेली होती.
भाविक-भक्तांसाठी पर्वणीच
गोव्याचे प्रतिपंढरपूर असलेल्या या पवित्र अशा ठिकाणी दरवर्षी साजरी होणारी आषाढी एकादशी ही गोव्यातील भाविकभक्तांसाठी एक पर्वणीच आहे. मोठ्या संख्येने भक्त या मंदिरात येतात आणि सेवा रुजू करतात. मंदिर समितीचे पदाधिकारीही मोठ्या उत्साहाने लोकांची सुरळीत व्यवस्था व्हावी यासाठी कार्यरत असतात. या दिवसाच्या सर्व गोमंतकीयांना शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.