मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि कृषिमंत्री रवी नाईक यांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या साखळी आणि फोंडा नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज राज्य निवडणूक आयोगाने केली. या निवडणुका पक्षीय चिन्हांवर लढवल्या जाणार नसल्या, तरी त्या मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघांत होणार असल्याने तेथे त्यांच्या प्रतिष्ठेचा कस लागणार आहे.
या दोन्ही पालिका निवडणुकांचे वेळापत्रक आज राज्य निवडणूक आयुक्त डब्ल्यू. व्ही. रमणमूर्ती यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी साहाय्यक निवडणूक अधिकारी सागर गुरव उपस्थित होते. या दोन्ही नगरपालिकांसाठी 5 मे रोजी मतदान होणार असून 7 मे रोजी मतमोजणी होईल. यासाठीची संपूर्ण तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.
निवडणूक आयुक्त रमणमूर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून या दोन्हीही शहरांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली असून 10 ते 18 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जातील, तर 19 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल. 20 एप्रिल रोजी अर्ज मागे घेता येतील आणि 20 एप्रिललाच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरचा काळ उमेदवारांसाठी प्रचारासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा लागणार कस
भाजपची कृषी मंत्र्यांवर मदार
फोंडा पालिका निवडणुकीसाठी भाजप, कॉंग्रेस आणि मगोपनेही कंबर कसली आहे. अनेक उमेदवारांनी आतापासूनच फिल्डिंग लावली असून जिंकून येण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.
मात्र, उमेदवार निवडीचे मोठे आव्हान या तीन पक्षांसमोर आहे. सध्या फोंडा पालिकेत भाजपची सत्ता असून भाजपच्या कृषिमंत्र्यांचे सुपुत्र रितेश रवी नाईक हे नगराध्यक्ष आहेत, तर कॉंग्रेसकडून राजेश वेरेकर आणि कॉंग्रेस गटाध्यक्ष विल्यम आगियार यांनीही सर्व प्रभागांमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार उभे राहतील आणि ते निवडणूक जिंकतील, असा दावा केला आहे.
साखळीत कोण ठरणार शिरजोर!
साखळीत आतापर्यंत विरोधकांनी बाजी मारून ही पालिका आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. मात्र, यंदा विरोधकांची ही खेळी अयशस्वी करण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. येथे कॉंग्रेसला मानणारे राजेश सावळ हे नगराध्यक्ष आहेत.
त्यांच्या विरोधात सत्ताधारी गटाने अनेक क्लृप्त्या लढवून हे पद काढून घेण्याचे अखेरपर्यंत प्रयत्न केले होते. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. साखळी हा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा मतदारसंघ असल्याने ही पालिका आपल्याकडे राहावी, यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे, तर कॉंग्रेसनेही हा गड आपल्याकडे ठेवण्यासाठी डावपेच आखले आहेत.
फोंड्यात निष्ठावंतांना लॉटरी
ही पालिका निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवली जाणार नसली तरी या पक्षांचे समर्थक ही निवडणूक लढवत असल्याने साहजिकच राजकीय पक्षांचे वलय या निवडणुकीला राहते.
फोंड्यात सध्या भाजपचे रवी नाईक तसेच रितेश नाईक, मगोचे डॉ. केतन भाटीकर तर काँग्रेसचे राजेश वेरेकर यांनी फोंडा पालिकेवर ताबा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. उमेदवार ठरवतानाही या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना सध्या तरी अडचणीचे ठरत असून निष्ठावंतांवर अधिक भर दिला जात आहे.
साखळीत 12, तर फोंड्यात 15 प्रभागांमध्ये रंगणार आखाडा
फोंड्यात तिरंगी लढतीचे संकेत
फोंड्यात भाजप, काँग्रेस तसेच मगो पक्ष पुढे सरसावला असून बहुतांश प्रभागांत तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. फोंडा पालिकेवर सध्या भाजपचा झेंडा असून येथील आमदारही भाजपचे असल्याने सध्या पालिकेला विकासकामे करणे सुलभ झाले आहे. या वर्षात फोंडा मतदारसंघातून भाजप उमेदवार रवी नाईक निवडून आल्यानंतर पालिकेची अनेक कामे मार्गी लागली आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख : 10 ते 18 एप्रिल
उमेदवारी अर्जांची छाननी : 19 एप्रिल
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख : 20 एप्रिल
मतदान : 5 मे (सकाळी 8 ते सायंकाळी 5)
मतमोजणी : 7 मे (सकाळी 8 वाजल्यापासून)
उमेदवार निवडीचे आव्हान : फोंड्यात उमेदवार ठरवतानाही या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना सध्या तरी अडचणीचे ठरत असून निष्ठावंतांवर अधिक भर दिला जात आहे.
कोरोना रुग्णांसाठी अखेरचा एक तास राखीव ठेवण्यात येईल.
शनिवारपासून आदर्श आचारसंहिता लागू
साखळीत विरोधकांसाठी भाजपचे डावपेच
फोंड्यात कृषिमंत्री रवी नाईक यांच्यावर भाजपची मदार
दोन लाखांची खर्च मर्यादा
या निवडणुकीसाठी उमेदवारांना 2 लाख रुपयेे खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने घातली असून या निवडणुका राजकीय चिन्हांवर होणार नाहीत. त्या वैयक्तिक स्तरावर लढवल्या जातील. याशिवाय या निवडणुकामध्ये मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.