सांगे: पहलगाम-काश्मीर येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सांगे शहरात सांगे भाजप मंडळाने मेणबत्ती मोर्चा काढला. दहशतवादी आणि खासकरून पाकिस्तानच्या नावाने यावेळी हल्लाबोल करण्यात आला.
या मोर्चात समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, सांगेच्या नगराध्यक्ष संतीक्षा गडकर, इतर नगरसेवक, सरपंच, पंच व नागरिक सहभागी झाले होते.
दरम्यान, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर यांनी पहालगाममध्ये झालेला हल्ला हा भ्याड हल्ला आहे. देशभरातून काश्मीर पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची धर्म विचारून गोळ्या घालून हत्या केल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून भारत सरकारने या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
पहलगाममधील हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदला घ्यावा, अशी मागणी देशभरातून होत आहे. हीच मागणी सांगेच्या नागरिकांनीही केलेली आहे. ही एक ठिणगी असून गरज पडल्यास दहा हजारपेक्षा अधिक नागरिकांचा निषेध मोर्चा काढण्यास आम्ही मागे हटणार नाही, असे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक संगमेश्वर नाईक, नगराध्यक्ष संतिक्षा गडकर, उपनगराध्यक्ष सय्यद इक्बाल यांनी दहशतवाद्यांना भारत सरकारने धडा शिकवावा, असे आवाहन केले. यावेळी सरपंच राजेश गावकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी निष्पाप बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.