Sancoale Well Water Fuel News Dainik Gomantak
गोवा

VIDEO: अजब प्रकार! सांकवाळमध्ये विहिरीचे पाणी घेऊ लागले पेट; इंधनाच्या वासामुळे भीतीचे वातावरण

Sancoale Well Water Fuel News: कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांनी संबंधित सर्व सरकारी यंत्रणांना माहिती दिली असून, इंधनाचा स्त्रोत शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को : सिंदोळी-सांकवाळ येथील अवर लेडी ऑफ हेल्थ चर्च परिसरातील विहिरीतील पाण्याला इंधनाचा वास येऊ लागल्याने तसेच इंधनमिश्रित पाणी पेट घेत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांकवाळमधील इतर विहिरी व नाल्यांमध्येही इंधन मिसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांनी संबंधित सर्व सरकारी यंत्रणांना माहिती दिली असून, इंधनाचा स्त्रोत शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, विहिरीत इंधन कशामुळे मिसळले याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.

अवर लेडी ऑफ हेल्थ चर्च परिसरातील ही विहीर पिण्याच्या पाण्यासाठी तसेच दैनंदिन वापरासाठी वापरली जाते.

जानेवारी महिन्यात या पाण्याला वेगळा वास येत असल्याचे निदर्शनास आले होते. सुरुवातीला विहिरीची साफसफाई न झाल्यामुळे वास येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे विहिरीतील पाण्याचा उपसा करण्याचे ठरविण्यात आले;

मात्र त्यापूर्वी संबंधित खात्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने विहिरीतील पाण्यात इंधनाचे प्रमाण वाढत गेले.

परिणामी पाण्याला तीव्र वास येऊ लागला आणि परिसरातही दुर्गंधी पसरली. याबाबत चर्च समिती व इतर संबंधितांना माहिती देण्यात आली.

यापूर्वीही असे घडले होते...

नोव्हेंबर २०२३ मध्ये माटवे-दाबोळी येथेही अशाच प्रकारे इंधन विहिरी व शेतजमिनीत झिरपल्याने घबराट पसरली होती. तेथील इंधनमिश्रित पाणी टँकरद्वारे बाहेर काढण्यात आले होते. नंतर तपासात इंधनवाहिनीला झालेल्या नुकसानीमुळे हे प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले होते. सांकवाळमध्येही यापूर्वी अशाच घटना घडल्याची माहिती काही स्थानिकांनी दिली आहे.

स्रोताबाबत विविध शक्यता

चर्च समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते पीटर डिसौझा यांनी इंधनाचा स्त्रोत लवकरात लवकर शोधण्याची मागणी केली आहे. गावातील अनेक रहिवासी विहिरींच्या पाण्यावर अवलंबून असल्याने इतर विहिरींचीही तपासणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गावाच्या वरच्या भागात इंधनाच्या टाक्या तसेच दोन पेट्रोल पंप आहेत. त्यापैकी कुठेतरी इंधन झिरपून जमिनीतून झऱ्याद्वारे विहिरीत येत असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच वरच्या भागात सुरू असलेल्या महामार्गाच्या कामादरम्यान खोदकाम करताना एखाद्या इंधनवाहिनीला नुकसान झाले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

अधिकाऱ्यांना तपासणीच्या सूचना

आमदार आंतोनियो वाझ यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत संबंधित सर्व विभागांना तात्काळ तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विविध विभागांचे अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पाण्याचे नमुने गोळा करत आहेत. जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील इतर विहिरी व तळ्यांतील पाण्याचीही चाचणी सुरू केली आहे. विहिरीतील इंधनाचा स्त्रोत शोधण्यासाठी तपास सुरू असून, इंधनमिश्रित पाणी पेट घेत असल्याने आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

झाडांवर परिणाम

या विहिरीचे पाणी पिण्यासाठी तसेच दैनंदिन कामांसाठी वापरले जात होते. विहिरीतील पाणी झाडांना दिल्यामुळे काही दिवसांपासून झाडांवर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. पाने व फळे गळून पडत असल्याचे चर्चचे फादर यांनी सांगितले. पाण्याला वास येऊ लागल्याने सध्या पाणीपुरवठा विभागाकडून नळजोडणी घेण्यात आली आहे. मात्र, विहिरीतील पाण्यात इंधन नेमके कोठून येत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT