Goa Village Panchayat Gramsabha  Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोव्यात स्थानिकांचा हल्लाबोल! ग्रामसभांमधून व्यक्त केला संताप; वाचा संपूर्ण प्रकरण

Goa Village Panchayat Gram Sabha: अनेक पंचायतींच्‍या ग्रामसभांमधून मेगा प्रकल्‍प तसेच सरकारच्‍या जनहितविरोधी निर्णयांविरोधात संताप व्‍यक्त करण्‍यात आला. सांकवाळ, हरमल, तोरसे, कळंगुट येथील सविस्तर वृत्तांत वाचा.

गोमन्तक डिजिटल टीम

Gram Sabhas Express Anger Against Mega Projects and Government Decisions

पणजी: सांकवाळ येथील ‘भूतानी’ प्रकल्‍पाचा विषय दिवसेंदिवस उग्र रुप धारण करू लागला आहे. शेकडो लोकांनी पंचायतीसमोर एकत्र जमून उपोषणास बसलेले प्रेमानंद नाईक यांना पाठिंबा दर्शविला. अनेक सामाजिक कार्यकर्तेही उपस्‍थित होते. दरम्‍यान, अनेक पंचायतींच्‍या ग्रामसभांमधूनही मेगा प्रकल्‍प तसेच सरकारच्‍या जनहितविरोधी निर्णयांविरोधात संताप व्‍यक्त करण्‍यात आला.

सांकवाळ येथील ‘भूतानी’ प्रकल्‍प

सांकवाळ येथील ‘भूतानी’ प्रकल्‍पाविरोधात गेल्‍या सात दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसलेले माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांच्यावर विनाकारण आरोप करून त्यांची बदनामी करू नये. तसेच या प्रकल्पाला दिलेला बांधकाम परवाना ताबडतोब रद्द करावा, अशी मागणी शेकडो ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर एकत्र जमून केली.

तसेच प्रेमानंद नाईक यांच्‍या उपोषणाला पाठिंबा दर्शविला. त्‍यांची प्रकृती खालावत चालली आहे. यावेळी ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्त्यांचीही मोठी उपस्थिती होती. ‘सांकवाळ अगेन्‍स्‍ट मेगा प्रोजेक्‍ट’ या बॅनरखाली ग्रामस्‍थ आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले. त्‍यांनी शांततापूर्ण आंदोलन केले.

गोवा फॉरवर्डचे मोहनदास लोलयेकर यांनी नाईक यांच्‍या आंदोलनास समस्‍त गोमंतकीयांनी पाठिंबा देण्‍याचे आवाहन केले. आमचा पक्ष हा प्रकल्प रद्द करण्यासाठी एकत्रितपणे लढेल, असेही त्‍यांनी सांगितले.सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्‍हो, पर्यावरणप्रेमी ओलेन्‍सिओ सिमॉईस, अरुणा वाघ यांच्‍यासारख्या इतर प्रमुख व्यक्तींनी देखील या आंदोलनात सहभागी होत एकात्मतेचा संदेश दिला.

हरमलमध्ये जमीन रूपांतरणाविरोधात वज्रमूठ

हरमल पंचायत क्षेत्रातील जमिनींचे कोणत्‍याही परिस्थितीत रूपांतरण करू देणार नाही, असा इशारा ग्रामस्‍थांनी आज झालेल्‍या ग्रामसभेत दिला. त्‍यानंतर तसा ठराव एकमताने संमत करण्यात आला. उपस्थित सुमारे ४०० ग्रामस्थ तसेच सरपंच, पंचांनी हात उंचावून या ठरावास समर्थन दिले. संतोष कोरखणकर यांनी हा ठराव मांडला होता.

भटवाडी भागातील डोंगर जमीन सर्व्हे २४२/० व २७५ तसेच नवीन २४२/१ मधील अंदाजे साडेतीन लाख चौरस मीटर जमिनीचे सेटलमेंटमध्ये रूपांतरण केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी बहुमताने ठराव मंजूर केला.

दरम्‍यान, या कचरा, वीज, वाहतूक कोंडी, सरकारी योजना आदी विषयांवरही ग्रामसभेत चर्चा करण्‍यात आली. गेस्ट हाऊस, कचरा शुल्क आदी विषयांवरही गरमागरम चर्चा झाली. या ठरावांवर चर्चा न करताच परस्पर निर्णय घेतल्याने उपस्थित ग्रामस्थांनी ग्रामसभेचे कामकाज रोखून धरले. मागच्या शुल्क आकारणीस फक्त १० टक्के वाढ करण्यास सहमती दर्शवली व ठराव मंजूर झाल्यानंतरच ग्रामसभा पुन्हा सुरू झाली.

कळंगुट ग्रामसभेत दाेन गट आमनेसामने

नवीन मार्केट प्रकल्पावरून कळंगुटची ग्रामसभा बरीच गाजली. एक गट प्रकल्पाच्या समर्थनार्थ तर दुसरा गट प्रकल्पाविरोधात उभा ठाकला. त्‍यामुळे काही काळ वातावरण तंग बनले.

कळंगुटमधील नवीन मार्केट प्रकल्‍प व्यावसायिकांसाठी वरदान ठरणार असल्याचे एका गटाचे म्हणणे आहे, तर या प्रकल्पामुळे परप्रांतीय लोकांचे लोण कळंगुटमध्‍ये आणखी वाढेल, असे दुसऱ्या गटाला वाटते. यावेळी बराच वेळ चर्चा झाली. शेवटी तो काही काळासाठी स्थगित ठेवण्यात आला. एक ग्रामस्‍थ डेन्‍झिल डिसोझा यांनी नवीन मार्केट प्रकल्पात स्थानिक मच्छीमार तसेच लहान दुकानदारांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

त्‍यावर बोलताना सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी सांगितले की, सर्व गोष्टींचा विचार करूनच नवीन मार्केट प्रकल्पाला परवानगी द्यायची की नाही हे ठरविले जाईल. दरम्यान, किनारी भागात सुळसुळाट झालेले दलाल, टाऊट्स, भाडेकरू तपासणी, भटकी जनावरे, कुत्री तसेच अन्‍य विषयांवरही या ग्रामसभेत चर्चा करण्यात आली.

फार्महाऊसवरुन तोरसे ग्रामसभेत हंगामा

तोरसे पंचायत क्षेत्रातील बेकायदा फार्महाऊस कायमचे बंद करण्यात यावे, असा ठराव तोरसे पंचायतीच्या ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच रस्त्यालगतच्‍या बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी करण्‍यात आली.

सरपंच छाया शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. काही महत्त्‍वाच्‍या विषयांवर चर्चा होणार असल्‍यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. पण अनुचित प्रकार घडला नाही. ६ हजार ५०० चौरस मीटर जमिनीत सदर फार्महाऊस उभारण्‍यात आले आहे.

खाण व्यवसायावरून मयेच्‍या ग्रामसभेत हमरीतुमरी

खाण विषयावरून मये-वायंगिणी पंचायतीची ग्रामसभा तापली. अनिर्बंध खनिज व्यवसायामुळे गावातील शेतीव्यवसाय संकटात आला आहे. तर, दुसऱ्या बाजूने बेकायदेशीर सुरू असलेल्या या व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यास पंचायत अपयशी ठरत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला.

माजी सरपंच आणि खाण अवलंबित कामगारांमध्ये हमरीतुमरीही झाली. आज सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही ग्रामसभा दुपारपर्यंत चालली. सरपंच सीमा आरोंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पंचायत इमारतीतील सभागृहात ती पार पडली.मये भागात मोकाट गुरांची समस्या गंभीर आहे. सरपंच आरोंदेकर यांनी ही समस्‍या सोडविण्‍याचे आश्‍‍वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 24 November 2024: केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याचा दिवस,कामाच्या ठिकाणी स्थिती उत्तम असेल; जाणून घ्या आजचे भविष्य

Goa Trip: तर आता कन्फर्म कराच!! डिसेंबर जवळ आलाय; गोव्याला फिरायला जायचं आहे ना?

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

SCROLL FOR NEXT