Goa BJP News, Sadanand Tanavade Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: मंडळ अध्यक्ष निवडीत 'आमदारां'च्या मर्जीलाच झुकते माप; प्रदेशाध्यक्षपदासाठी 'तानावडें'साठी लॉबिंग?

BJP Mandal Presidents Appointments: राज्यात प्रदेशाध्यक्ष पदासाठी सात जणांच्या नावांची यादी केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आली आहे. परंतु या पदासाठी आता लॉबिंग सुरू झाल्याचा संशय येऊ लागला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

BJP Goa State And Mandal President Selection

पणजी: प्रदेश भाजपच्या वतीने जाहीर केल्याप्रमाणे सर्व मंडळांच्या अध्यक्षांच्या निवडी जवळपास निश्चित झाल्या आहेत. त्यातील काहीजणांची नावे टप्प्याटप्प्याने जाहीर होत असून, सर्व नावांची यादी ७ तारखेला जाहीर होण्याची शक्यता आहे.

परंतु मंडळ अध्यक्षांच्या निवडीमध्ये प्रामुख्याने ज्याठिकाणी भाजपचा आमदार आहे, त्याठिकाणी तेथील आमदार समर्थकांची वर्णी लागली आहे. या निवडीत निष्ठावानांना डावलल्याचा सूर जाहीरपणे व्यक्त झालेला नाही. संघटनात्मक निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय निरीक्षक म्हणून अरुण सिंग हे गोव्यात दाखल झाले आहेत. दुसऱ्या बाजूला प्रदेशाध्यक्ष पदासाठी सदानंद शेट तानावडे यांचे नाव काही मंत्री आणि आमदारांनी पुढे रेटल्याने या पदाविषयीसुद्धा लॉबिंग सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

भाजपकडून देशपातळीवर मंडळ व प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार गोव्यातही मंडळांच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया गेल्या आठवड्यात म्हणजे डिसेंबरच्या अखेरीस सुरू झाली होती. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी इच्छुकांकडून अर्ज मागविले असले तरी स्थानिक नेतृत्वाला डावलून जाण्याचे धाडस कोणी केलेले नाही. त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आमदारांनी आपल्याच मर्जीतील कार्यकर्त्याच्या नावाचा अर्ज या पदासाठी भरल्याचे स्पष्ट झाले होते.

रविवारी काही नावांची यादी जाहीर झाली आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष तानावडे हे नूतन अध्यक्षांच्या सत्कार समारंभास उपस्थित राहिले. त्यामुळे पक्षाकडून सर्व नावांची यादी आजच जाहीर होणार की काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याविषयी प्रदेशाध्यक्ष तानावडे यांच्याशी ‘गोमन्तक’ने मोबाईलवर संपर्क साधला. मात्र, त्यांनी तो कॉल स्वीकारला नाही. त्यामुळे जाहीर झालेली अधिकृत संख्या उपलब्ध झाली नाही.

राज्यात प्रदेशाध्यक्ष पदासाठी सात जणांच्या नावांची यादी केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आली आहे. परंतु या पदासाठी आता लॉबिंग सुरू झाल्याचा संशय येऊ लागला आहे. कारण सत्ताधारी भाजपच्या मंत्रिमंडळातील वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी प्रदेशाध्यक्षपदी सदानंद शेट तानावडेच असावेत, अशी इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. गुदिन्हो यांच्यापूर्वी आमदार संकल्प आमोणकर यांनीही असेच मत व्यक्त केले होते.

अरुण सिंग घेणार निवडणुकांचा आढावा

संघटनात्मक निवडीसाठी राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग सायंकाळी गोव्यात दाखल झाले असून, पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांचा ते आढावा घेणार आहेत. ‘गोमन्तक’च्या हाती आलेल्या माहितीनुसार, रविवारी १९ मंडळांचे अध्यक्ष जाहीर झाले आणि त्यांचा सत्कार समारंभही झाला. आता उर्वरित २१ मंडळांच्या नावांची यादी अध्यक्ष सिंग यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे.

...या सातजणांपैकी असेल प्रदेशाध्यक्ष

भाजपने केंद्रीय समितीच्या आदेशानुसार जी इच्छुकांच्या नावांची यादी पाठविली, त्यात दयानंद मांद्रेकर, दिलीप परूळेकर, चंद्रकांत कवळेकर, ॲड. नरेंद्र सावईकर, दयानंद सोपटे, दामू नाईक आणि गोविंद पर्वतकर यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे या यादीतीलच व्यक्ती प्रदेशाध्यक्ष होणार, असे प्रथमदर्शनी दिसते. मात्र, पक्षातील नेत्यांकडून पुन्हा तानावडे यांच्या नावाचा गजर सुरू झाल्यामुळे पक्षातील अनेकांना याचा धक्का बसला असणार आहे. शिवाय इच्छुकांमध्येही चलबिचल वाढीस लागू शकते.

काय आहे नियम?

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी पक्षाच्या राज्यघटनेनुसार सलग दोनवेळा हे पद स्वीकारता येते, असा नियम आहे. भाजपने १२ जानेवारी २०२० रोजी तानावडे यांची भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. विनय तेंडुलकर यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यावेळी विनय तेंडुलकर राज्यसभेवर होते. तेंडुलकरांची खासदारपदाची कारकिर्द संपल्यानंतर तानावडे राज्यसभेवर गेले. लोकसभा निवडणुकीपूर्वी संघटनात्मक निवडणुका घेणे शक्य नव्हते. त्यामुळे पक्षाने त्यांच्याकडेच हे पद ठेवले होते.

नरो वा कुंजरोवा

आता संघटनात्मक निवडणुकीसाठी भाजपने सदस्य नोंदणी व इतर प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे तांत्रिक बाबी लक्षात घेतल्या तर तानावडे यांचे नावही ऐनवेळी पक्षाकडून अध्यक्ष म्हणून जाहीर होईल, असे पक्षातील काही वरिष्ठांना वाटते. मात्र, सातजणांच्या नावांची जी यादी पाठविली आहे, त्यापैकीच एकाचे नाव पक्ष जाहीर करेल, असेही त्यांचे मत आहे.

...तर भाजपला निवडणूक जड ; माविन

भाजपमध्ये सध्‍या तरी प्रदेशाध्‍यक्ष पदासाठी योग्‍य व्‍यक्‍ती दिसत नाही. साऱ्यांना पुढे घेऊन जाणारे प्रदेशाध्‍यक्ष तानावडे यांच्‍याचकडे या पदाची धुरा राहणे आवश्‍‍यक आहे; अन्‍यथा पुढील विधानसभा निवडणूक भाजपला जड जाईल, असे माविन म्हणाले.

सदानंद तानावडेंचे नाव यादीत नाही!

प्रदेशाध्यक्ष पदासाठी जी यादी दिल्लीला पक्षश्रेष्ठींकडे पाठविली आहे, त्यात तानावडे यांचे नाव नाही. त्यामुळे रविवारी ज्या पद्धतीने त्यांचे नाव आमदार-मंत्र्यांकडून पुढे आले, यावरून या पदासाठी लॉबिंग सुरू झाले की काय, असा संशय येऊ लागला आहे.

माविनच्या मतावर चर्चा

मंत्री गुदिन्हो यांनी प्रदेशाध्यक्षपदी तानावडे हेच असावेत. त्यांच्या व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष झाल्यास पक्षालाच त्रास होईल, अशी भीतीही व्यक्त केली आहे. गुदिन्हो हे कार्यकारिणी सदस्य आहेत आणि पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या मतावरही सिंग यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT