Viral video on Goa Ferry: गोव्यात सोमवार, २१ जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून, १५ दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत. अधिवेशनाच्या तोंडावर, राज्याचे समाज कल्याण आणि नदी नेव्हिगेशन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी नुकत्याच सुरू झालेल्या रो-रो फेरीसेवेबद्दल माध्यमांशी संवाद साधला आहे.
काही दिवसांपूर्वीच मोठ्या गाजावाजाने सुरू झालेल्या चोडण ते रायबंदर या रो-रो फेरीच्या उद्घाटनानंतर तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एका प्रवाशाने फेरीची स्थिती खराब असून, स्वच्छतागृहाची सोय व्यवस्थित नसल्याची तक्रार केली होती. हा व्हिडिओ बराच चर्चेत राहिल्यानंतर, आता मंत्री सुभाष फळदेसाई यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री फळदेसाई यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, "काही लोकं केवळ व्हिडिओ बनवण्यासाठी स्वच्छतागृहांची दुरवस्था करून रो-रो फेरीची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत." त्यांनी पुढे आव्हान दिले की, "जर स्थानिक पंचायत सदस्य किंवा निवडून आलेले प्रतिनिधी मला लेखी निवेदन देऊन सांगतात की ते रो-रो सेवेवर नाखूष आहेत आणि जुन्या फेरी व्यवस्थेकडे परत जाऊ इच्छितात, तर आम्ही रो-रो फेरी बंद करण्यास आणि जुन्या, अधिक सोयीस्कर फेरी प्रणालीकडे परत जाण्यास तयार आहोत."
मंत्र्यांनी आरोप केला की, ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ तयार केला, त्या व्यक्तीने मुद्दामहून स्वतःहून फेरीच्या स्वच्छतागृहाचा वापर केला आणि त्यानंतर व्हिडिओ बनवला. व्हिडिओमध्ये टॉयलेट कव्हर जोरजोरात हलवून ते कसे निकामी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे ते म्हणाले. "तुम्ही घरी टेबल देखील असेच हलवत ते निकामी आहे असे म्हणाल का?" असा सवाल उपस्थित करत त्यांनी व्हिडिओ बनवणाऱ्याच्या हेतूंवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.
रो-रो फेरीचा हा प्रकल्प २५ कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेला नसून, तो करार पद्धतीने तयार करण्यात आला आहे, असेही मंत्री फळदेसाई यांनी स्पष्ट केले. या करारानुसार, राज्य सरकारला काही त्रुटी आढळल्यास हा करार मागे घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे, जर स्थानिक नागरिक या सेवेवर खूश नसतील, तर त्यांनी लेखी स्वरूपात माहिती द्यावी, सेवा बंद केली जाईल, असे मंत्री फळदेसाई यांनी ठामपणे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.