Revolutionary Goans Manoj Parab : विधानसभेतील पटलावर अजून पोगो (पर्सन ऑफ गोअन ओरिजिन) विधेयक अजून चर्चेसाठी आलेले नाही. त्यामुळे फेटाळलेले नाही, पण आमदार वीरेश बोरकर यांनी मांडलेले खासगी सदस्य ठराव सत्ताधारी भाजप आमदारांनी या विधेयकावरून बनावट ड्रामा करून ते फेटाळले. अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी या विधेयकाबाबत घुमजाव केले. ते भाजपचे एजंट असल्याचा आरोप रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) प्रमुख मनोज परब यांनी केला.
पणजीतील रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेला आमदार वीरेश बोरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. परब पुढे म्हणाले की, गोमंतकीयांचे हक्क अबाधित राहण्यासाठी आरजी पक्षाने हे पोगो विधेयक विधानसभेत आणले आहे. त्यामुळे जेव्हा हे विधेयक विधानसभेत पटलावर येऊन त्यावर चर्चा होईल तेव्हा त्याला कोणाचा पाठिंबा आहे व कोणाचा नाही हे गोव्यातील जनतेला समजेल. हे विधेयक संमत करण्याचा प्रयत्न आरजीचे आमदार वीरेश बोरकर करतील.
विधानसभेत आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी पोगो विधेयकाबाबत घेतलेली भूमिका संशयास्पद आहे. त्यांनी हे विधेयक यापूर्वी आणल्याचे सांगत असले, तरी त्यातील मजकूर आरजीने मांडलेल्या विधेयकापेक्षा वेगळा होता. त्यांनी निवडणुकीपूर्वी मतदारांना अंधारात ठेवून इतर पक्षात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी लोकांना फसविले आहे. अखेर लोकांचा रोष बघून व राजकीय पक्षात प्रवेश मिळत नसल्याचे पाहून त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यांनी विधेयकात जो मजकूर घातला होता तो लोकांसमोर उघड करावा, तरच या विधेयकाला पाठिंबा आहे हे स्पष्ट होईल, असे आमदार विरेश बोरकर म्हणाले.
दरम्यान, यासंदर्भात आलेक्स रेजिनाल्ड यांना विचारले असता, ‘सत्य हे कटू असते आणि मी काय, हे वेळच सांगेल’, एवढीच प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
हे सरकार आपल्याला जे सोयीस्कर आहे त्याप्रमाणे वागत आहे. काही बाबींसाठी गोमंतकीय रहिवाशी दाखला 30 वर्षांपर्यंत सक्तीचा करण्यात आला आहे. गोमंतकीयांना हक्क मिळावा म्हणून असेल तर गोवा मुक्तिपूर्वीच्या गोमंतकीयांच्या सदस्यांनाच पहिल्यांदा हक्क मिळावा हे का नको असा प्रश्न मनोज परब यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.