कुळे: धारबांदोडा-बेतुल-प्रतापनगर या ठिकाणी वसलेली वस्ती तयार झाली ती २०१२ साली. धारबांदोड्यात तत्कालीन प्रशासकीय अधिकारी होते, तेव्हाच या सर्व गोष्टी झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील बेतुल - प्रतापनगर भागात प्रचंड प्रमाणात डोंगर कापणी करून घरे बांधण्याचे सत्र सध्या सुरू आहे. या प्रकारामुळे वायनाडसारखी स्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात धारबांदोडा उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण गोवा भरारी पथकाने बेतुल प्रतापनगर व धुलैय येथे पाहणी केली, तसेच जे काही व्यवहार सुरू आहेत ते बंद करण्याचा आदेशही दिला. यात जो कोणी गुंतलेला आहे, त्याला कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचे धायगोडकर यांनी सांगितले.
मंगळवारी, (ता. १३) दैनिक ‘गोमन्तक’च्या वृत्ताची दखल घेऊन दक्षिण गोवा भरारी पथकांना बोलविण्यात आले. सकाळी धारबांदोडा उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर, मामलेदार कार्यालयाचे सर्वे अधिकारी संदीप पेरणे, तलाठी विश्वनाथ गावकर, तसेच भरारी पथकाचे अधिकारी उपस्थित होते.
बेतूल प्रतापनगरात बऱ्याच वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात घरे बांधली गेली आहेत. या ठिकाणी ही वस्ती झाली ती सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती आहे; पण तेव्हाच्या अधिकाऱ्यांनी काहीच का केले नाही, असा प्रश्न सरपंच बालाजी गावस यांनी केला. घरे बांधून झाल्यावर या लोकांनी जेव्हा घर नंबरसाठी पंचायतीकडे अर्ज केला, तेव्हा आम्ही सर्व कागदपत्रे पाहून या घरांना इएचएन नंबर दिला. त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे असल्याचेही धारबांदोडाचे सरपंच बालाजी गावस यांनी सांगितले.
धारबांदोडा पंचायत क्षेत्रात चोहोबाजूंनी अनेक डोंगर आहेत. काही ठिकाणी डोंगर कापून लोकांनी प्लॉट पाडले आहेत. असाच एक नवीन प्रकार धारबांदोडा जंक्शनजवळ सुरू असून काही लोकांनी प्लॉटही विकत घेतले आहेत. या पंचायत क्षेत्रातील आजी-माजी राजकीय नेते यात गुंतल्याचे लोकांनी सांगितले.
धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील दुसरे प्रकरण म्हणजे धुलैय गावात रस्त्याच्या बाजूला लाखो चौरस मीटर जमिनीचे सपाटीकरण करून प्लॉट पाडले आहेत. या प्लॉटमध्ये अनेक सागवानी तसेच अन्य झाडे आहेत. काही झाडांच्या आजूबाजूची माती काढल्याने ती उन्मळून पडली आहेत. यात स्थानिक व्यक्तीसह एका बड्या राजकीय नेत्याचा हात असून त्याच्या सांगण्यानुसार येथे प्लॉट पाडले जात असल्याचे सांगण्यात आले.
बेतुल-प्रतापनगर येथील सर्वे नंबर २४/१ ही मूळ जमीन फोंडा येथील सुखटणकर यांची. नंतर वाचासुंदर नामक व्यक्तीने ही जमीन विकसित केली. तेथे १०८ प्लॉट तयार केले. सध्या या ठिकाणी २६ पक्की घरे बांधली आहेत, तसेच रस्ते डांबरीकरण केलेले आहेत. काही ठिकाणी डोंगर पोखरून मातीही नेली असल्याचे दिसते. या सर्व बाबी लक्षात घेऊन संबंधितांविरुद्ध तक्रार नोंद केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी डोंगरकापणीला तलाठ्यांना जबाबदार धरणार, असे सांगितले तरी त्यावेळी जो तलाठी व संबंधित प्रशासकीय अधिकारी आहे, त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. यंदा पडलेला पाऊस असाच सुरू राहिल्यास गोव्यात वायनाडसारखी पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित अधिकाऱ्यां याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे धारबांदोडा येथील ग्रामस्थांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.