मडगाव: सरकारला सहकार्य करा, अन्यथा जेटी सील करू, असा निर्वाणीचा इशारा पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिल्यानंतर बोटवाल्यांनीही नमते घेत स्वत:हून कुटबण जेटीवरील बोटी बुधवारी क्रेन लावून हटविल्या.
जेटीजवळ पार्क करून ठेवलेल्या बहुतेक सर्व लहान डिंगी बाेटी हटविल्या असून अन्य ४६ बाेटी जेटीवर पार्क केल्या आहेत. त्यापैकी २४ बाेटी हलविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
कुटबण जेटीवरील बोटमालकांमध्ये दोन गट पडल्यामुळे जेटीची हाताळणी न्यायालयाने मच्छीमार खात्याकडे सोपविली होती. परंतु खाते ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नाही, अशी तक्रार सध्या बाेटमालक करीत आहेत. दोन्ही गट एकत्र येऊन त्यांनी सरकारकडे मागणी केल्यास हा प्रश्न सुटू शकतो.आलेक्स सिक्वेरा, पर्यावरणमंत्री.
कुटबण जेटीवरील कामगारांच्या मृत्यूनंतर मत्स्योद्योग खाते सक्रिय झाले आहे. खात्याने राज्यातील कुटबण तसेच जवळच्या मत्स्योद्योग खात्याच्या जेटींवर नांगरून ठेवलेल्या आणि अकार्यान्वित अशा लहान-मोठ्या १७४ बोटी पुढील सात दिवसांत काढण्याचे आदेश दिले आहेत. या मुदतीत बोटमालकांनी आपल्या बोटी काढल्या नाहीत तर कोणतीही नोटीस न देता त्या भंगारात काढल्या जातील, असा इशाराही खात्याने दिला आहे.
यापूर्वी पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी या बेकायदेशीर नांगरून ठेवलेल्या बोटींवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. अशा बोटमालकांना दरमहा एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार असेही त्यांनी सांगितले होते. कुटबण जेटीवर कॉलराचा फैलाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई हाती घेण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी कुटबण जेटीवरील चार तर मोबोर येथे एका कामगाराचा कॉलरा साथीच्या आजाराने मृत्यू झाला होता. यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुटबण जेटीची पाहणी केली होती. त्यांनी जेटीवरील अतिक्रमणे हटवण्यासह कामगारांच्या आरोग्यासाठी सुविधा उभाराव्यात, अशा सूचना केल्या होत्या. भविष्यात कामगाराचा मृत्यू झाल्यास बोटमालकाला २५ लाखांचा दंड तसेच बोटीचा परवाना दोन वर्षांसाठी रद्द केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पर्यावरणमंत्र्यांनी केली कुटबण जेटीची पाहणी
पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आज कुटबण जेटीला भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली. आम्हाला कायद्याचा वापर करून मच्छीमारांना संकटात टाकायचे नाही. त्यामुळे त्यांनीच सहकार्य करावे, अशी भूमिका आम्ही घेतली होती. बोटमालकांनीही स्वत:हून बोटी काढण्यास सुरूवात केली आहे, असे ते म्हणाले. जेटीवर स्वच्छतेचे काम सुरू आहे.
या ठिकाणी जी १३ शौचालये होती, ती स्वच्छ केली आहेत. शिवाय ३० पोर्टेबल शौचालये जेटीवर आणली आहेत. आणखी ५० शौचालये बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. कामगारांना आंघोळीसाठीही सोय केली असून जेटीवर पाण्याचे वेगळे कनेक्शन देण्याचे ठरविले आहे. बोटमालक संघटनेकडून अर्ज आल्यावर सार्वजनिक बांधक़ाम खाते पाण्याची जोडणी देईल, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
बहुतांश बोटी विनावापर; जाळीही जेटीवर पडून
कुटबण जेटीवरील १७४ पैकी ३५ बोटी या मत्स्योद्योग खात्याच्या इमारतीजवळ नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. यातील १४ बोटींवर नावे नाहीत. कुटबण जुन्या जेटीवरील १० अकार्यान्वित बोटींपैकी ४ बोटींवर तर नव्या जेटीवरील ८४ अकार्यान्वित बोटींपैकी ४७ बोटींवर नावे नाहीत.
याच जेटीवर ४५ नोंदणीकृत मोठ्या बोटी अकार्यान्वित आहेत. शिवाय पडून असलेली ३० पर्सेसीन जाळी काढण्याचे आदेशही मत्स्योद्योग खात्याने दिले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.