सासष्टी: माजी मुख्यमंत्री व माजी कृषिमंत्री स्व. रवी सिताराम नाईक हे केवळ राजकीय व्यक्तिमत्व नव्हते , तर गोव्याच्या आत्म्याशी एकरुप झालेले जननेते होते. त्यांची गरीबाप्रति करूणा, राहण्यातील साधेपणा आणि लोकसेवा आजही सर्वांना प्रामाणिकपणे समाज हितासाठी काम करण्याची प्रेरणा देत राहील.
अशा शब्दांत स्व. रवी नाईक यांना ‘मडगावचो आवाज’तर्फे आयोजित रिमेंबरिंग पात्रांव शोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. ते खऱ्या अर्थाने समाजसेवक होते. त्यांनी समाजकारणातूनच राजकारण चालवले, असेही वक्त्यांनी या प्रसंगी म्हटले.
या शोकसभेत वक्त्यांनी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाच आठवण करुन दिली. त्यांच्या जिवनातील प्रवास समजून घेऊन व त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून गोवा व गोमंतकीयांच्या हितासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे वक्त्यांनी सांगितले. बहुजन समाजासाठी ते दीपसस्तंभ होते. त्यांनी या समाजाला दिशा दाखवली, असे संजीव नाईक यांनी म्हटले.
ते निश्र्चयाचा महामेरू होते असे म्हाळू नाईक म्हणाले. कुंडई येथील तपोभुमीसाठी कोमुनिदादची जमीन देण्यास स्व. रवी नाईक यांचे योगदान महत्वाचे असेही नाईक यांनी सांगितले. प्रदीप नाईक, विनोद शिरोडकर, रोहिदास नाईक, गुरुदास कामत, योगेश नागवेकर, दत्तराज फोंडेकर यांनी स्व. रवी नाईक यांच्याबद्दलचे आपले मनोगत व्यक्त केले.
सभेचे सूत्रसंचालन अनिल पै यांनी केले. ‘मडगाव चो आवाज’चे निमंत्रक प्रभव नाईक यांनी स्वागत केले. उपस्थितांनी स्व. रवी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. सुरवातीला एक मिनीट स्तब्धता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
रवी नाईक यांनी कधी दुसऱ्यांवर आपले नेतृत्व लादले नाही. पण त्यांच्या सर्व क्षेत्रातील कार्य पाहूनच लोकांनीच त्यांना आपला नेता मानला, असे प्रा. रामराव वाघ यांनी सांगितले. त्यांचे कृषी क्षेत्रातील काम लक्षात घेऊन जुने गोवे येथे बांधण्यात येत असलेल्या कृषी महाविद्यालयाला त्यांचे नाव द्यावे, अशी विनंती वाघ यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.