Goa Birsa Munda Jayanti 2024
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भगवान बिरसा मुंडा या अवघ्या २५ वर्षीय युवकाचे कार्य प्रेरणादायी आहे. बिरसा मुंडा यांनी आपल्या समाजबांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना अंधश्रद्धेवर प्रहार केले. जल, जंगल, जमीन ही आपली संपत्ती असून त्यापासून कोणतीही शक्ती आम्हाला परावृत्त करू शकत नाही. आपल्या न्याय्य हक्कांसाठी केवळ धनुष्यबाणाच्या आधारे जमीनदार, इंग्रजांना सळो की पळो करून सोडण्याचे काम बिरसा मुंडा यांनी केले. त्यांनी समाजाला एकतेचे महत्त्व सांगितले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे केलेले हे स्मरण.
बिरसा मुंडा यांचे विचार आजही प्रेरणादायी असून त्यांची विचारधारा आत्मसात करण्याची गरज आहे. बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सांगेतील खेड्यापाड्यांतील जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आपले प्रशासन सज्ज असल्याचे उपजिल्हाधिकारी मिलिंद्र वेळीप यांनी स्पष्ट केले.
भगवान बिरसा मुंडा यांचा १५०व्या जयंतीनिमित्त सांगे भागात शासकीय पातळीवर ‘जनजातीय गौरव दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सांगेच्या नगरपालिका सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सांगे भागातील शासकीय सेवक तसेच एसटी बांधव सहभागी झाले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी बोलत होते.
यावेळी सांगेच्या युनियन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केल्यानंतर नेत्रावळी येथील श्री बेताळेश्वर सेल्फ हेल्प ग्रुपने समई नृत्य तर वाटमार्गी सेल्फ हेल्प ग्रुप वर्गण-नेत्रावळीने कळशी नृत्य सादर सादर केले. यावेळी सांगेचे उपजिल्हाधिकारी मिलिंद्र वेळीप, मामलेदार सिद्धार्थ प्रभू, गोवा राज्य अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळाचे अध्यक्ष वासुदेव मेंग गावकर, राजेंद्र मिरजकर, देविदास गावकर, सांगेच्या नगराध्यक्ष अर्चना गावकरसहित इतर नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी शालेय पातळीवर भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर ‘फेन्सी ड्रेस’ स्पर्धा घेण्यात आली. मान्यवारांच्या हस्ते समई प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी सांगे चार रस्ता येथून शासकीय सेवकांनी मिरवणुकीने सभागृहात प्रवेश केला. याप्रसंगी माजी आमदार वासुदेव मेंग गावकर यांनी भगवान बिरसा मुंडा यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून सातत्याने कार्यरत राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात शासकीय कर्मचारी वर्ग सहभागी झाले होते.
अगदी लहान वयातच समाजकार्य सुरू करणे, स्वातंत्र्यासाठी लढणे हे बिरसा मुंडा यांचे कार्य प्रेरणादायी आहे. सर्व समाजाची उन्नती झाली तरच गोवा सुधारेल. जमिनीच्या रक्षणार्थ कठोर कायदा ही काळाची गरज आहे. या समाजाला १२ टक्के आरक्षण मिळायलाच हवे. त्यासाठी नवीन चळवळीला युवावर्गाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
गोवा राज्य सरकार आदिवासी कल्याण संचालनालय व काणकोण उपजिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १५ रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन चावडी येथील लता मंगेशकर कलांगणात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जलसंसाधन मंत्री सुभाष शिरोडकर, ट्रायबल असोसिएशनचे अध्यक्ष दीपक करमळकर, नगराध्यक्ष सारा देसाई, पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, प्रमुख वक्ते शिक्षक संजय तवडकर, नगरसेवक रमाकांत नाईक गावकर, लक्ष्मण पागी, धीरज नाईक गावकर, नीतू देसाई, हेमंत नाईक गावकर, अमिता पागी, नार्सिस्को फर्नांडिस, श्रीस्थळच्या सरपंच सेजल गावकर, काणकोण उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर, सासष्टी उपजिल्हाधिकारी रमेश गावकर आदी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
१. प्रमुख वक्ते संजय तवडकर यांनी सांगितले की, धरती आबा, क्रांती सूर्य, भगवान बिरसा मुंडा म्हणून लोकांनीच उपाधी दिली आहे. सरकारी विविध उपक्रमांना त्यांचेच नाव देण्यात आले आहे. त्यांना शिक्षणाकरता आपला धर्म बदलावा लागला. मात्र, त्यानंतर त्यांनी समाजासाठी मोठी क्रांती केली. १८९५ ते ९८ पर्यंत तुरुंगात डांबले.
२. मात्र, तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी अधिक जोमाने काम केले. एका झाडाखाली आराम करत असताना दगा देऊन त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ‘हा माझा देश आहे, हे माझे राज्य आहे,’ असे म्हणत बिरसा मुंडा अमर झाले.
आपले आदिवासी बांधव आणि भगिनींनी भारताच्या निर्मितीत अमूल्य योगदान दिले आहे. त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण केले आणि मौल्यवान परंपरा व ज्ञान जिवंत ठेवले. आपण भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंती वर्षाची सुरुवात करत असताना, त्यांची प्रेरणादायक कथा आपल्याला आपल्या आदिवासी समुदायांची शक्ती, धैर्य आणि गौरव यांची आठवण करून देते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
ओडिशातील भुवनेश्वर येथील जनता मैदानावर आयोजित जनजातीय गौरव दिनानिमित्त कार्यक्रात नाईक बोलत होते. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माजी, उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंग देव, खासदार अपराजिता सारंगी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या दिवसाची प्रेरणा आपल्याला आदिवासी समुदायांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प देईल आणि एक समावेशक, सशक्त भारत निर्माण करूया, असे आवाहन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी यावेळी केले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या सन्मानार्थ, पंतप्रधानांनी २ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष योजना’ सुरू केली, असे नाईक म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.