Vishwajit Rane: राज्यातील २० वर्षे किंवा त्याहून जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांना इमारत पुनर्बांधणीवेळी वाढीव चटई क्षेत्र, इमारतीची वाढीव उंची आणि काही तरतुदींमध्ये सूट देण्याचा निर्णय नगर नियोजन मंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला.
नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत राज्यातील जनतेला लाभदायी ठरणारा हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती राणे यांनी दिली.
या बैठकीला मुख्य नगर रचनाकार राजेश नाईक, वर्तिका डागर, सदस्य डॉ. दिव्या राणे आदी उपस्थित होत्या. या बैठकीत गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे आणि वास्तुरचनाकार मिलींद रामाणी यांचे स्वागत करण्यात आले.
राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक बाबींवर चर्चा झाली. बैठकीस खास निमंत्रितही उपस्थित होते.
हृदयविकाराच्या आणि इतर आणीबाणीच्या प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेऊन, स्वयंचलित बाह्य डिफिब्रिलेटरसाठी बहु-कौटुंबिक निवासस्थानांमध्ये जागा उपलब्ध करून देण्याचा सक्रियपणे विचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रकल्प मंजुरीवेळीच याची काळजी घेतली जाणार आहे. तशा सूचना शाखा कार्यालये आणि संबंधितांना देण्याचे ठरले आहे.
जीवनमान उंचावणार
२० वर्षांवरील गृहनिर्माण सोसायट्यांमधील सर्व इमारती आणि मालमत्ता, ज्यांना पुनर्विकासाची आवश्यकता आहे, त्यांना नगर नियोजन मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यभरात वाढीव चटई क्षेत्र आणि उंची यात एकसमान सूट दिली जाईल. या धोरणामुळे गोव्यातील लोकांना फायदा होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल, असे सरकारचे मत आहे.
...अखेर उल्हास तुयेकरांच्या प्रयत्नांना यश
वाढीव चटई क्षेत्राचा मुद्दा नावेलीचे आमदार उल्हास नाईक तुयेकर यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. शहरात मोठे चटईक्षेत्र नगरनियोजन खाते देते. मात्र, शहराला लागून असलेल्या पंचायत क्षेत्रात समान चटईक्षेत्र मिळत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.
यासाठी मडगाव शहर आणि लगतच्या नावेली भागाचे उदाहरण त्यांनी दिले होते. त्यावर नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी वाढीव चटईक्षेत्र देण्याचा विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता नगरनियोजन मंडळाच्या बैठकीत प्रत्येक अर्जनिहाय यासंदर्भात विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.