फोंडा : विधानसभा निवडणूक (gov Assembly elections) जवळ येत असतानाच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या केंद्रात आणि राज्यातही सत्तेवर असलेल्या भाजपचे सर्वांनाच आकर्षण असून या पक्षामध्ये अनेक दिग्गज प्रवेश करत आहेत. शुक्रवारी गोवा फॉरवर्डचे (Goa forward parti) जयेश साळगावकर हे आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपवासी झाले, तर आता फोंड्याचे आमदार रवी नाईक (Fonda MLA Ravi Naik) हेसुद्धा रविवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
यासंबंधी अधिकृत दुजोरा देण्यात आला नसला तरी ‘ऑल सेट’ असल्याची माहिती मिळाली आहे. रवी नाईक यांच्यापाठोपाठ गोवा फॉरवर्डचे आणखी एक आमदार तथा माजी मंत्री विनोद पालयेकर हेही भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा शुक्रवारी रंगली. फोंड्याचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक हे सध्या काँग्रेसचे आमदार असले तरी गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा काँग्रेसशी थेट संबंध राहिलेला नाही. रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र फोंड्याचे नगरसेवक रितेश नाईक तसेच रॉय नाईक हे यापूर्वीच भाजपवासी झाले आहेत. मात्र, रवी नाईक यांनी आपण भाजपमध्ये जाणार की नाही, याबाबत कोणतीच वाच्यता केली नव्हती.
आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच अन्य भाजप नेत्यांनी रवी नाईक यांची भेट घेऊन पक्षात येण्यासंबंधी गळ घातल्याने शेवटी रवी नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, यासंबंधी रवी नाईक यांनी काहीच बोलण्यास नकार दिला. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी रवी नाईक हे कदाचित शनिवारी आमदारकीचा राजीनामा देतील आणि रविवारी भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. सध्या रवी नाईक यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. रविवारी फोंड्यात भव्य महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे. भाजपमध्ये प्रवेश करून रवी नाईक या मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
तीन महिन्यांपूर्वीच रवी नाईक यांनी आपण मडकई मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जाहीर करून राजकीय बाँब टाकला होता. मडकई मतदारसंघात आपल्याएवढी अन्य कुणी विकासकामे करू शकलेला नाही, असा दावा करताना आजही मडकईवासीय आपली आठवण काढतात, असे त्यांनी सांगितले होते. पक्षच नव्हे, तर अपक्ष उमेदवारीदेखील दाखल करू शकतो, असे सांगून त्यांनी अनेकांची हवा काढली होती.
आमदार रवी नाईक यांच्या वाढदिनी 18 सप्टेंबरलाच भाजपचे नेते त्यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले होते. फोंड्यातील रवी नाईक यांचा हा वाढदिन सोहळा कोरोनामुळे मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचे ठरवले होते. वाढदिनाची निमंत्रणेही कुणाला दिली नव्हती. पण या दिवशी रवी नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी उसळलेली मतदार व हितचिंतकांची गर्दी बरेच काही सांगून गेली. विशेष म्हणजे काँग्रेसचे एक-दोन पदाधिकारी वगळता अन्य कुणी शुभेच्छा देण्यास उपस्थित राहिले नाही. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहिल्याने रवी नाईक भाजपमध्ये जाणार, अशी हवा निर्माण झाली होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात हा विषय मागे पडला. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री व इतर भाजप पदाधिकारी स्वतः रवी नाईक यांना भेटायला आल्याने नाईक यांच्या भाजप प्रवेशाला दुजोरा मिळाला आहे.
भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाची ध्येयधोरणे ज्यांना पटली, तो कुणीही या पक्षात प्रवेश करू शकतो. रवी नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यासंबंधी अधिकृतरित्या काहीच नसले तरी भाजपमध्ये कुणी प्रवेश करीत असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. शेवटी हा पक्षाचा निर्णय आहे. अस मत नेते सुनील देसाई यांनी व्यक्त केले आहे.
फोंड्याचे आमदार रवी नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करणार यासंबंधी अधिकृतरित्या तसे काहीच कळवलेले नाही. शेवटी हा निर्णय पक्षाच्या नेत्यांचा आहे. सुरवातीपासून मी भाजपचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. आज या पक्षानेच मला मोठे केले. त्यामुळे पक्ष काय निर्णय घेईल, तो मला मान्य आहे. पक्ष एखादा उमेदवार जाहीर करील, त्याला समर्थन हे असेलच. अस मत नेते विश्वनाथ दळवी यांनी व्यक्त आहे.
रवी नाईक यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर त्यांना फोंडा मतदारसंघ की मडकई मतदारसंघात तिकीट देण्यात येईल, याबाबत अधिकृतरित्या काहीच कळलेले नाही. रवी नाईक हे बहुजन समाजाचे नेते आहेत. त्यांनी आतापर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार आदी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. फोंड्यातील विकास हा रवी नाईक यांच्याच कारकिर्दीत झाला आहे, हे कुणीही मान्य करील. त्यामुळे रवी नाईक यांची स्वतःची वैयक्तिक अशी मते आहेत. हा आकडा समाधानकारक असल्याने हे मतदार तसेच भाजपची एकगठ्ठा मते यांच्या जोरावर यावेळेला फोंड्यात भाजपचे कमळ फुलेल, असा विश्वास खुद्द भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यानुसारच रवी नाईक यांना ही गळ घातल्याचे समजते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.