Khari Kujbuj  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज: फोंड्यात नो डॅडी, ओन्‍ली पात्रांव

Khari Kujbuj Political Satire: गोवा क्रिकेट असोसिएशनची यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होण्याची चिन्हे होती.

Sameer Panditrao

फोंड्यात नो डॅडी, ओन्‍ली पात्रांव

फोंड्याचे माजी नगराध्‍यक्ष विश्‍वनाथ दळवी यांना डॅडी म्‍हणून ओळखले जाते. दळवी हे भाजपचे सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते. मात्र रवी पात्रांवच्‍या समर्थक नगरसेवकाला नगराध्‍यक्षपदी आणण्‍यासाठी त्‍यांना पायउतार व्‍हावे लागले. याच डॅडीने यावेळी फोंडा मतदारसंघाचा भाजप मंडळ अध्‍यक्षांसाठी शैलेश बोरकर यांचे नाव सुचविले होते. मात्र पात्रांवने आपले वजन वापरल्‍याने शैलेशचे नाव मागे पडून हरेश नाईक यांचे नाव पुढे आले आणि या नावाला खुद्द मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिल्‍याने त्‍यांचीच निवड झाली. त्‍यामुळे फोंड्यात डॅडींचा प्रभाव कमी झाला हे स्‍पष्‍ट झाले. फोंड्यात फक्‍त पात्रांवचाच शब्द चालतो, यावर या घटनेने एक प्रकारे शिक्‍कामोर्तब केले आहे. ∙∙∙

मुख्यमंत्र्यांचा अदृश्य हात

गोवा क्रिकेट असोसिएशनची यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होण्याची चिन्हे होती. प्रकरण पार उच्च न्यायालयापर्यंत पोचले होते. विपुल फडके यांनी तलवार उपसली होती. रोहन गावस देसाई अडचणीत येतील, की काय अशी क्रिकेट वर्तुळात चर्चाही सुरू झाली होती. मात्र तसे काही घडलेच नाही. काही मिनिटांतच सभा पार पडली. सभेत फडके यांनी तर तलवार म्यान केल्याचे जाणवल्याशिवाय राहिले नाही. फडके यांचे समर्थन करण्यासाठी तेथे आलेले विविध क्लबचे प्रतिनिधीही अवाक झाले. हे कसे झाले कोणाला काही समजलेच नाही. यामागे खरेतर मुख्यमंत्र्यांची जबरदस्त ख़ेळी असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. आधी त्यांनी चेतन देसाई यांना हाताशी धरले आणि नंतर बाळू फडके यांच्याशी यशस्वी बोलणी केली. याचा परिणाम म्हणून रोहन गांवस देसाई यांच्या समर्थक प्रशिक्षकावरील संकट दूर झाले. याच न्यायाने आता कुडचड्यातून ते विधानसभेवर कधी पोचतात याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांना लागून राहिली आहे. अलीकडेच कुडचड्याचे आमदार नीलेश काब्राल यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाची जाहीर खिल्ली उडवली होती, आपणास तसे काही म्हणायचे नव्हते, असे सांगत नंतर त्यांनी सारवासारव केली असली तरी मुख्यमंत्र्यांनी जी नोंद घ्यायची ती घेतली आहे. ∙∙∙

पर्यटक संख्येचे गौडबंगाल

गोव्यात नाताळ-नववर्ष मोसमात अपेक्षीत संख्येने पर्यटक आले नाहीत, असा घोषा सध्या अनेकांनी लावला आहे. समाजमाध्यमांवर तसा अपप्रचार केला गेल्याचेही सांगितले जात आहे. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्या मागील कारणही तसेच आहे. या हंगामात मोठ्या संख्येने विमाने आले. त्यांचे प्रवास भाडे नेहमीपेक्षा दुप्पट तिप्पट होते, अशा तक्रारी आहेत. सर्व भागांतील हॅाटेल फुल्ल होती व त्यांचे दरही विमानभाड्याप्रमाणेच अनेक पटींनी वाढले होते. गोव्यात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर दोन दिवस आधीपासूनच वाहनांच्या लांबलचक रांगा होत्या. तसेच सगळ्या किनारी भागांत प्रचंड संख्येने वाहने पार्क केलेली होती. सीमा नाक्यावर गोव्यात येणा-या वाहनांची झालेली नोंद पाहिली तरी ते लक्षांत येते मग पर्यटक आले नाहीत, असे म्हणणे म्हणजे कोणाची तरी मुद्दाम दिशाभूल करण्यासारखीच आहे. हे नेमके कोण करते त्याचा तपास घेण्याची मागणीही आता होऊ लागली आहे. सर्व किनारी भागांत आयोजित केलेल्या पार्ट्या, सनबर्न महोत्सवात उसळलेली गर्दी पाहिली, तर ती नेहमीपेक्षा अधिक असल्याचा कयास निघतो. मग पर्यटक रोडावले म्हणणे म्हणजे नेमके काय? अशी विचारणा होऊं लागली आहे.∙∙∙

सिक्‍वेरा भाजपसाठी डोईजड!

नुव्याचे आमदार आणि पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा हे भाजपला नकोसे झालेत का? असे वाटण्याजोगी स्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीत ते नुवे मतदारसंघातून अपेक्षित मते भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांना मिळवून देऊ शकले नव्हते. त्यांना मंत्री करून भाजपचा काय फायदा? अशी विचारणा अलीकडे खासगी का होईना भाजपचे नेते करू लागले होते. आता सेंट फ्रांसिस झेवियर पवित्र अवशेष दर्शन सोहळाही संपला आहे. सरकार आणि चर्च यांच्यातील समन्वयाचे काम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्याकडे सोपवले होते. सोहळा संपल्याने सिक्वेरा यांची सरकार आणि भाजपला असलेली उपयुक्तता संपली की काय? प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी जाहीरपणे सिक्वेरा यांच्याविषयी असलेली नाराजी व्यक्त केली आहे. सिक्वेरा मंत्री असल्याने पदाचा मान ठेवण्यासाठी संयत शब्दांचा वापर तानावडे यांनी केला असला तरी त्यांना काय म्हणायचे आहे, हे दडून राहिलेले नाही. आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांची मुख्यमंत्र्यांनी केलेली स्तुती आणि सिक्वेरांविषयी तानावडेंची नाराजी यातून सासष्टीतील भाजपचे राजकारण पुन्हा बदलत असल्याचे संकेत मात्र जरूर मिळत आहेत. ∙∙∙

नाराजीही प्रत्यक्षपणे उघड

भाजपच्या मंडळ अध्यक्ष निवडीवेळी कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांनी त्यांच्या मतदारसंघात रखडलेल्या कामाबाबत बोलताना नाराजी व्यक्त केली. मंत्री असताना सुरू केलेली कामे अजूनही पूर्ण होत नाही. सरकारचेच त्याकडे दुर्लक्ष होत आहे. ‘भिवपाची गरज ना’ असे म्हणणारे मुख्यमंत्रीही या कामाबाबत गंभीर नाहीत, अशी शंका काब्राल यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी पक्षामधील मतभेद हे चार भितींच्या आतच सोडवण्याची गरज आहे, ते जाहीरपणे मांडण्याची गरज नाही, असा टोला आज मंडळ अध्यक्ष कार्यक्रमावेळी लगावला, तो बरोबर आमदार काब्राल यांना बसला. त्यांना सरकारवर टीका करायची नव्हती, तर मतदारसंघातील जी कामे रखडली आहेत व ती लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न होत आहे, त्याला यश येत नाही. मतदारसंघातील लोकांना स्थानिक आमदार म्हणून तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांनी सत्यपरिस्थिती त्यांनी सरकारच्या नजरेस आणून देण्याचा प्रयत्न केला व त्यातून त्यांची मुख्यमंत्र्यावरील नाराजीही प्रत्यक्षपणे उघड केली. ∙∙∙

चला गांजा शोधूया..!

पणजीतील सांतिनेज परिसर सध्या गांजामुळे चर्चेत आला आहे. या परिसरात स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या सुशोभित झाडे लागवडीच्या सुविधांमध्ये सध्या गांजाची रोपे आढळू लागली आहेत. शनिवारी येथील एका मॉलसमोर गांजाचे रोप आढळले आणि ते वृत्त समाजमाध्यमात एवढे व्हायरल झाले की त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. पुन्हा एक दिवसाआड सोमवारी सांतिनेज परिसरातच गांजाचे लहानसे रोप आढळले आणि पुन्हा हा परिसर चर्चेत आला. सांतिनेज परिसरातच गांजाची रोपे का आढळतात, असा सवाल उपस्थित होत असला तरी पोलिसांना मात्र आता गांजाची रोपे शोधण्याचे काम लागू नये म्हणजे मिळवले. कदाचित गुपचूपपणे हे कामही होऊ शकते. जर यूट्यूब व्हिडिओ वृत्तवाहिन्यांच्या नजरेत रोप सापडल्याची बाब आली तर मात्र नेटकऱ्यांना आणखी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्याची संधी मिळेल.∙∙∙

‘आरटीओ’च्या लक्षात कधी येणार?

मडगावात वाहतूक खात्याकडून पूर्व बगलरस्त्यावर आर्लेम कृषीपणन संस्थेच्या बाहेरच्या वाहनांचे पासिंग केले जाते. खरे तर तो नियमभंग आहे, पण आरटीओला त्याबाबत जाब कोण विचारणार अशी एकंदर स्थिती आहे. या पासिंगमुळे गोवा बागायतदार ते तब्बल आर्लेम जंक्शनपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात व अन्य वाहतुकीचा खोळंबा होतो, पण प्रकरण आरटीओचे असल्याने कोणीच त्याबाबत आवाज करत नाहीत. खरे तर हे पासिंग कोणत्याही आडरस्त्यावर करता येते, तशा जागा व रस्तेही मडगावात भरपूर आहेत, पण आरटीओवाल्यांना त्याची फिकीर नसते. बरे सकाळी कार्यालयीन वेळा सुरू होताना, लगेच हे पासिंग करता येते. पण हे साहेब अकरा वाजल्याशिवाय येत नाहीत. त्यामुळे पासिंगसाठी आलेल्या वाहनांची रांग मारुतीच्या शेपटीप्रमाणे लांबते. त्यामुळे मोठ्या रहदारीच्या रस्त्यावर तर खोळंबा होतोच, पण अंतर्गत येऊन बगलरस्त्याला मिळणाऱ्या रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांचीही गैरसोय होते, पण ती आरटीओच्या लक्षांत येत नाही. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT