रवी हे धूर्त नेते म्हणून ओळखले जातात. राजकारणातील मोहरे कसे हलवावे हे रवींकडून शिकावे . काल तीन वर्षानंतर सनग्रेस गार्डन येथे साजरा झालेल्या त्यांच्या वाढदिवसाला लक्षणीय उपस्थिती लाभली. या शक्तिप्रदर्शनाद्वारे रवी यांनी मुख्यमंत्र्याना आपले मंत्रिपद काढून घेण्याचा विचार असेल तर तो बदलून टाका, असा इशारा दिल्याचे बोलले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला फोंड्यात त्यांच्या विरोधात अंतर्गत कारवाया करणाऱ्या ‘भाजपच्याच काही छुप्या रुस्तमना त्यांनी ‘हम किसीसे कम नही’ हे दाखवून दिले आहे. यालाच म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणे. रवी यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत असे बरेच तीर मारले आहेत म्हणा. पण या बाबीची चर्चा मात्र काल फोंड्यात सुरू होती. ∙∙∙
रविवारी इंजिनियर्स दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना अपशकुन करण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्र्यांविरोधात काही कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. हे आंदोलन एका टीव्ही वृत्तवाहिनीने ‘लाईव्ह’ दाखवले. वास्तविक हा माध्यम समूह सरकारविरोधात जाण्याचे धारिष्ट्य दाखवत नाही. परंतु ते आंदोलन साग्रसंगीत थेट प्रक्षेपित करण्यात आले व त्यांनी विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत दिले. इतके की मुख्यमंत्र्यांच्या विरोधात दिल्लीतही पक्षश्रेष्ठींकडे तिखटमीठ लावून माहिती पोचविण्यात आली. सध्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यांच्या पक्षाच्याच काही नेत्यांनी मोहीम उभारली आहे. ज्यांना या मोहिमेचा फायदा होणार आहे, त्यांच्यासाठी ही मार्चेबांधणी नाही ना? गोव्यात नेतृत्व बदल झाला तर या चॅनेलच्या संचालकांना - जे खाण मालक आहेत - त्यांना बक्कळ फायदा होऊ शकतो. यापूर्वीही याच खाण कंपनीने भाजपकडून एका ज्येष्ठ नेत्याला फोडून काँग्रेसचे मुख्यमंत्री बनविण्यात मोलाची भूमिका बजावली होती. आज ती व्यक्ती साळसूदपणे पुन्हा भाजपात परतली आहे. शिवाय मोठ्या पदाची वाट पाहत आहे! ∙∙∙.
राज्यभरात सध्या भूरूपांतरणाचा विषय गाजू लागला आहे. प्रादेशिक आराखड्यात चुकीच्या नोंदी दुरूस्त करण्याच्या मिषाने भूरूपांतरे होऊ लागली आहेत. नगरनियोजन कायद्यातील १७ (२) आणि ३९ अ कलमाविषयी जनतेत मोठी नाराजी आहे. याचे लाभार्थी म्हणून राजकारण्यांत श्रीपाद नाईक, विश्वजीत राणे, दिव्या राणे, आलेक्स सिक्वेरा, आवेर्तान फुर्तादो, प्रवीण आर्लेकर यांची नावे समाज माध्यमांवर फिरू लागली आहेत, यातून अधिकारी, उद्योजक हेही सुटलेले नाहीत. ∙∙∙
बाणावलीतील आप आमदार व्हेंझी यांनी साळ नदीत कॅसिनो (Casino) येऊ देणार नसल्याची गर्जना केली आहे. मात्र सासष्टीच्या केवळ किनारपट्टीतच नव्हे तर जागोजागी असलेल्या गाडेवजा दुकानांवर चाललेल्या जुगाराचे काय, अशी विचारणा अशा जुगाराने त्रस्त झालेले स्थानिक करताना दिसतात. अनेक हॅाटेलांतही मिनि कॅसिनो आहेत व त्यांत स्थानिक तसेच पर्यटक गर्दी करतात ते जुगारासाठीच, असे सांगितले जाते. जुगार केवळ कॅसिनोतच म्हणजे नद्यांत नांगरुन ठेवलेल्या जहाजातच खेळला जातो, असे नाही तर जमिनीवरील गाडे वा हॅाटेलवजा जागेत अधिक मोठ्या प्रमाणात चालत असतो.अनेक भागात टपरीवजा गाडे असतात. त्यांत कसलेच सामान नसते पण तेथे विशिष्ट वेळांत लोकांच्या रांगा लागतात. त्या कशासाठी त्याचे उत्तर शोधले तर बराच उलगडा होईल. अनेक राजकारणी मांडवीतील कॅसिनोंचा वारंवार उल्लेख करतात पण शहर वा तालुका ठिकाणांतील गाड्यांवर जो जुगार चालतो त्यावर कोणीच बोलत नाहीत. या गाड्यांवरील जुगार पाहिला तर वेगळ्या कॅसिनोंची खरेच गरज आहे का, असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. ∙∙∙
दैवयोगे झाला पाग्या।! त्याचे येळकोट राहिना । मूळ स्वभाव जाईना,असे म्हणतात. गोव्यातील काही वाचाळ आमदारांच्या बाबतीतही तसेच म्हणावे लागेल. काही दिवसांपूर्वी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी गोव्यातील रस्त्यावर जे बळी जातात त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते जबाबदार असे म्हणून अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडे बोट दाखविले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी मास्तराची भूमिका घेत कुठल्याही मंत्र्यांनी दुसऱ्या मंत्र्यांच्या खात्यावर जाहीर वक्तव्ये करू नयेत, अशी सूचना केली. मात्र या सूचनेला भीक न घालता मायकल लोबो यांनी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना पोलिस सतावतात, असे म्हणत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्याच खात्यावर बाण सोडला. गोव्यातील भाजपचे आता काँग्रेसीकरण झाले आहे असा जाे आरोप केला जातो तो खराच आहे, असे आता वाटत नाही का? ∙∙∙
राज्यात ट्रॅफिक पोलिसांकडून पर्यटकांचा छळ सुरू आहे, असे विधान कळंगुटचे आमदार मायकल लोबोंनी गुरुवारी केले. पोलिस पर्यटकांना अडवून त्यांची सतावणूक करतात व त्यांना ताटकळत ठेवतात, असा आरोपही त्यांनी केला. परिणामी पर्यटकांची संख्या घटत चालली आहे, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. मध्यंतरी देखील लोबोंनी असेच विधान केले होते. आता पुन्हा नवीन पर्यटन हंगाम सुरू होत असताना लोबोंच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. मुळात ट्रॅफिकसह इतर पोलिसांना वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे सरकारचेच निर्देश असतात. विशेष म्हणजे, पोलिसांना दिवसांचा कोटा असतो म्हणे. त्यांनी अमुक केस बूक केलीच पाहिजे. अशावेळी पोलिसांसाठी पर्यटक हे सोपे सावज असतात. त्यामुळे पोलिसवाले पर्यटकांची वाहने किंवा रेंट-अ-बाईक घेऊन फिरणाऱ्यांना अडवतात. आता लोबोंचे हे वक्तव्य नेमके कुणाला उद्देशून होते? कारण लोबो हे सत्ताधारी पक्षातील मोठे नेते. त्यामुळे सिस्टम कशी वर्क करते, हे त्यांना माहीत नसावे असे होणार नाही. दुसरीकडे या प्रकारामुळे पोलिसांचे सँडविच होते. कारण रस्त्यांवर उभे राहून केस करताना आधी लोकांच्या शिव्या खाव्या लागतात आणि दुसरीकडे केस कमी बूक केल्या तर वरिष्ठांकडून बोलणी खावी लागतात.. ∙∙∙.
राज्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे चतुर्थीपूर्वी संबंधित कंत्राटदारांकडून बुजवले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यानी केली होती. चतुर्थी होऊन गेली तरी हे खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदारांना मुहूर्त सापडत नाही व सरकारला त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसांत अनेकांना जीव गमवावा लागला. खड्ड्यामुळे एखाद्याला अपघात होऊन जीव गमावावा लागल्यास संबंधित कंत्राटदार तसेच त्या रस्त्याची पाहणी केलेल्या संबंधित अभियंत्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र ही घोषणाच होती असे सध्या तरी दिसून येत आहे. आतापर्यंत एकाही अभियंत्याविरुद्ध किंवा कंत्राटदाराविरुद्ध कारवाई झालेली नाही. रस्त्यांचीही डागडुजी झाली नाही. लोकांना हे खड्डे चुकविताना अपघाताला सामोरे जाण्याची पाळी येत आहे. या रस्ता अपघातासंदर्भात वाहतूकमंत्र्यांनी अभियंत्यांवर घसरून तोंडसुख घेतले. मात्र त्याची दखल कोण घेतोय, अशी परिस्थिती आहे. विरोधकांनी याविरुद्ध वेळोवेळी आवाज उठविला मात्र ठोस उपाययोजनांकडे दुर्लक्षच होत आहे. या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी मुहूर्त सरकार केव्हा शोधणार याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ∙∙∙
आपण जेव्हा गोव्याबाहेर जातो व हिंदी बोलण्याची वेळ येते तेव्हा आपण अस्सल हिंदीत बोलतो. पण गोव्यात गोमंतकीयांसमोर असताना हिंदी बोलताना कठीण जाते. हिंदी बोलता बोलता कोकणी किंवा इंग्रजी शब्द त्यात आपसूक मिसळतात. हे कोणी दुसरे तिसरे नसून स्वतः मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. तसेच हिंदीला गोव्यातही चांगले महत्व देण्यात येत आहे, असेही स्पष्ट केले. गोव्यात आता कोकणी, मराठी बरोबर हिंदी व कन्नड भाषेचाही प्रभाव वाढत असल्याचे ते म्हणतात. आता कोकणीबरोबर मराठी व रोमी कोकणीही राजभाषा करण्यासाठी काहींचा प्रयत्न चालू आहे. भविष्यात कन्नडलाही राजभाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी पुढे आली नाही म्हणजे मिळवले, अशी सभागृहात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.