Goa motorcycle pilots Dainik Gomantak
गोवा

Rapido In Goa: मोटरसायकल पायलटांवर संक्रांत! गोव्यात होणार ‘रॅपिडो’ची एंट्री; पारंपरिक व्‍यवसाय धोक्‍यात येण्याची चिन्हे

Goa Motorcycle Pilots: ‘रेंट अ बाईक’ने पायलटसेवेचा लचका तोडल्यानंतर आता उरलासुरला पायलट व्यवसाय घशात घालण्‍यासाठी ‘रॅपिडो’ ही ॲपवर आधारीत दुचाकीसेवा सज्ज झाली आहे.

Sameer Panditrao

पणजी: ‘रेंट अ बाईक’ने पायलटसेवेचा लचका तोडल्यानंतर आता उरलासुरला पायलट व्यवसाय घशात घालण्‍यासाठी ‘रॅपिडो’ ही ॲपवर आधारीत दुचाकीसेवा सज्ज झाली आहे. पारंपरिक टॅक्सी व्यावसायिकांसमोर ॲपवर आधारीत टॅक्सी सेवेचे संकट घोंगावत असतानाच गोमंतकीयांच्या हातून हा दुसरा व्यवसायही निसटण्याच्या मार्गावर आहे.

राज्यात गेली अनेक दशके स्थानिक वाहतुकीचा अविभाज्य भाग ठरलेली दुचाकीची ‘पायलट सेवा’ आता एका महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपली आहे. सरकारच्या नव्या ट्रान्सपोर्ट अ‍ॅग्रिगेटर मार्गदर्शक तत्त्वांमुळे अ‍ॅप-आधारित दुचाकी सेवांना अधिकृत मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्‍यामुळे ‘रॅपिडो’सारख्या देशव्यापी कंपन्यांना गोव्यात आपली सेवा सुरू करता येईल.

गोव्यात पारंपरिक वाहतुकीच्या संकल्पना अजूनही जिवंत आहेत. अ‍ॅप-आधारित कंपन्यांचे आगमन हे तांत्रिक प्रगतीचे लक्षण असले तरी स्थानिक रोजगारावर त्याचा परिणाम होऊ शकतो. ‘रॅपिडो’ने गोव्यात सेवा सुरू केली तर पर्यटक व युवकांना अधिक सुलभ पर्याय मिळेल. मात्र त्‍याचवेळी पारंपरिक पायलटांच्‍या अस्तित्वासाठीही योग्य तोडगा काढावा लागेल.

‘रॅपिडो’चे सहसंस्थापक पवन गुंटूपल्ली यांनी अलीकडेच राष्ट्रीय दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीत गोव्यातील प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले होते. ‘‘गोवा हे प्रसिद्ध पर्यटनस्‍थळ असून, तेथे वाहतुकीची मागणी अधिक आहे. आम्ही तेथे सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक ती तयारी करत आहोत’’ असे त्यांनी स्पष्ट केलेआहे.

नवीन ट्रान्सपोर्ट अ‍ॅग्रिगेटर मार्गदर्शक तत्त्वे

भारतीय परिवहन मंत्रालयाने २०२० मध्ये अ‍ॅग्रिगेटर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. त्‍यानुसार दुचाकी, ऑटो व कार यासाठी अ‍ॅप-आधारित सेवा देणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकारांकडून नोंदणी घेणे आवश्यक आहे.

पारंपरिक पायलटांमध्‍ये अस्वस्थता

या नव्या बदलांमुळे पारंपरिक पायलटांमध्‍ये नाराजीचे वातावरण आहे. ‘‘आम्ही वर्षानुवर्षे ही सेवा देत आहोत. आता अ‍ॅप कंपन्यांशी स्पर्धा करावी लागली तर आमचे उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट होईल’’ अशी प्रतिक्रिया पायलट संघटनेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी दिली आहे. ‘रॅपिडो’ वा तत्सम कंपन्यांना परवानगी देताना पारंपरिक पायलटांच्‍या हितांचे रक्षण करावे, असेही ते म्‍हणाले. दरम्‍यान, काहींनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा विचारही व्यक्त केला आहे.

दर साधारणपणे पुढीलप्रमाणे (शहरानुसार फरक होतो)

सुरुवातीचे २ किलोमीटर : २५ रुपये

पुढील दर प्रत्‍येक किलोमीटर : १० ते १५ रुपये

रात्रीच्या वेळेस व मागणीनुसार दरात वाढ

अ‍ॅपवर डिजिटल पेमेंटची सुविधा. प्रवाशांना ट्रॅकिंग, फीडबॅक व विमा संरक्षण.

मार्गदर्शक तत्त्वांतील महत्त्वाच्या तरतुदी

प्रत्येक अ‍ॅग्रिगेटरने चालकांसाठी प्रशिक्षण, विमा व वर्तन नियमांचे पालन करणे बंधनकारक.

दरनियमनासंबंधी पारदर्शकता ठेवणे

प्रवाशांचा डेटा सुरक्षित ठेवणे

प्रवासदरांमध्ये सरासरी दर निश्‍चित करणे

सेवा सुरू करायला राज्य शासनाच्या परवानगी आवश्‍‍यक.

अ‍ॅग्रिगेटर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणाऱ्या दुचाकी कंपन्यांना गोवा सरकारने सेवा सुरू करण्यास हरकत नसल्याचे संकेत दिले आहेत.

कशी असेल ‘रॅपिडो’ची सेवा?

‘रॅपिडो’ ही कंपनी सध्या भारतातील शंभरांहून अधिक शहरांत दुचाकी आणि ऑटो सेवा पुरवते. त्यांच्या सेवेत मोबाईल अ‍ॅपद्वारे प्रवासी आपल्या स्थानिकतेनुसार दुचाकी बुक करू शकतात. यामध्ये प्रवाशाला ड्रायव्हरचा (कॅप्टन) फोटो, वाहन क्रमांक, अंदाजे प्रवास वेळ व भाडे आधीच दिसते.

पायलट सेवेचा गोव्यातील इतिहास

गोव्यातील पायलट सेवा ही देशातील दुचाकीवरील प्रवासी वाहतूक क्षेत्रातील एक अनोखी संकल्पना ठरली आहे. सुमारे ८० वर्षांपूर्वी ही सेवा सुरू झाली. सुरुवातीला ही सेवा विशेषतः स्थानिकांसाठी होती, परंतु पर्यटनवाढीनंतर त्‍याचा वापर पर्यटकही मोठ्या प्रमाणावर करू लागले.

सध्या गोव्यात अंदाजे ३५०० पेक्षा अधिक नोंदणीकृत पायलट आहेत. स्थानिक परिवहन खात्याकडून दिला जाणारा ‘पायलट बॅज’ मिळाल्यानंतरच ही सेवा करता येते. या पारंपरिक व्यवस्थेत ठरावीक दरही ठरलेले आहेत. उदाहरणार्थ, दोन-तीन किलोमीटरसाठी ५० ते १०० रुपयांदरम्यान भाडे घेतले जाते.

गोव्यातील ‘पायलट’ म्हणजे पिवळे हेल्मेट घातलेला चालक आणि त्याच्या काळ्या-पिवळ्या दुचाकीवर प्रवासी. हे चालक स्वतंत्रपणे काम करतात. कोणत्याही अ‍ॅपवर ते आधारित नाहीत. प्रवासी रस्त्यावरूनच त्यांना थांबवतात. या सेवेला स्थानिक लोकांचा मोठा पाठिंबा असून, अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह त्‍यावर अवलंबून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Paper Leak Issue: विद्यापीठातील प्रश्‍नपत्रिकांची चोरी उघड; चौकशी समितीचा भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, डीन, रजिस्ट्रार, कुलगुरूंवर ठपका

Rashi Bhavishya 17 July 2025: प्रवासाचे योग, प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील; मान-सन्मान वाढेल

Delhi Goa Flight: विमानात तांत्रिक बिघाड; दिल्लीतून गोव्याला येत असलेले विमान मुंबईला वळवले

पावसाळी अधिवेशनापूर्वी आमदार विजय सरदेसाई अडचणीत; सभापती तवडकरांबाबत जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिस तक्रार

Israel Syria Attack: दमास्कसमधील 'ड्रोन हल्ला' लाइव्ह! स्फोट होताच टीव्ही अँकरची उडाली भंबेरी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT