पणजी: रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य संशयित जेनिटो कार्दोजच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सत्र न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. सरकारी वकिलांनी जेनिटोला जामीन देणे तपास प्रक्रियेसाठी घातक ठरेल, असा ठाम युक्तिवाद मांडत, ‘जर तो निर्दोष असेल, तर त्याने आपल्या मोबाईलचा डेटा फॉरमॅट का केला?’ असा सवाल उपस्थित केला. तर रामा यांनी जेनिटो कार्दोज याचे नाव कुठेच घेतले नाही वा तक्रारही दिलेली नाही, असा युक्तिवाद जेनिटोच्या वकिलांनी केला.
सुनावणीदरम्यान वेळ संपल्याने पुढील युक्तिवाद शनिवारी (ता. १८) सकाळी ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी ‘अटकेचे कारण’ दिले नाही. ‘अटकेचा हेतू म्हणजे अटक का करायची हे स्पष्ट करणे गरजेचे असतो; परंतु तो हेतू देखील स्पष्ट करण्यात आला नाही.
मोबाईल फोन फॉरमॅट केल्याबद्दल भारतीय न्याय संहिता कलम २३८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि तो जामिनपात्र गुन्हा आहे,’ असेही जेनिटोतर्फे न्यायालयात नमूद करण्यात आले.
जेनिटोने आपला ‘मोबाईल फॉरमॅट’ केल्याने तो गुन्ह्यात थेट सहभागी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे त्याच्यावर भारतीय पुरावा अधिनियमातील कलम ८ (उद्देश) आणि कलम १० (कटकारस्थान) अंतर्गत गुन्हा दाखल होतो.
त्याला जामीन दिल्यास तपासात अडथळा येईल आणि महत्वाचे म्हणजे अनेक साक्षीदारांचे जबाब अजून नोंदवायचे आहेत, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. जेनिटो हा समाजासाठी धोकादायक आहे.
हिंसाचारातून आपले उद्दिष्ट साध्य करणारा टोळीप्रमुख म्हणून त्याची ओळख आहे. तो पोलिस कोठडीतून फरार झाला होता. त्यामुळे तो सुटल्यास पुरावे नष्ट करेल, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व संशयितांची न्यायालयीन कोठडी शनिवारी (ता.१८) संपणार असल्याने त्यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात येईल.
जेनिटोतर्फे वकिलांनी स्पष्ट केले, की या गुन्ह्याशी जेनिटोचा काहीही संबंध नाही आणि त्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर आहे. स्वतःचा बचाव करताना कार्दोजनी आपल्या अटकेची वैधता आणि तपास प्रक्रियेलाच आव्हान केले. मी घटनास्थळी नव्हतो, असे स्पष्ट केले.
जेनिटोच्या वकिलांनी जेनिटो हा अट्टल गुन्हेगार होऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला. त्यांनी म्हटले की, पाच वर्षांत तीन वेळा गुन्हा केला तरच त्याला अट्टल गुन्हेगार म्हणून संबोधले जाते; परंतु गेल्या पाच वर्षात जेनिटोकडून तसे गुन्हे झालेले नाहीत. जेनिटोच्या विरुद्ध नऊ प्रकरणे होती, त्यातील केवळ दोनच प्रलंबित आहेत. एक सत्र न्यायालयात सुरू असून, दुसरे सर्वोच्च न्यायालयात अपील म्हणून प्रलंबित आहे.
गेल्या पाच वर्षांत जेनिटोविरोधात तीन आरोपपत्रे दाखल झाली आहेत.
जेनिटो शिरदोन दुहेरी खून प्रकरणात दोषी ठरला असून, उच्च न्यायालयाने त्याला १० नोव्हेंबरपूर्वी आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयातील अपील ‘नोंदणी स्तरावरच’ आहे, त्यावर अजून सुनावणी झालेली नाही.
पहिला गुन्हा २००५ मध्ये नोंदवला गेला असून दोन दशकांनंतरही त्याच्या वागण्यात बदल नाही.
एका वकिलावर हल्ला केल्याचाही आरोप जेनिटोवर आहे.
मोबाईलचा डेटा का पुसला? याचे कोणतेही समाधानकारक उत्तर त्याने दिले नाही. म्हणजेच काहीतरी लपवले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.